Posts

Showing posts from February, 2019

गे माय मराठी

गे माय मराठी माय मराठी वर  निस्सीम प्रेम करणाऱ्या ,माझ्या सारख्याच इतर ही जणांच्या मनीचा भाव या कवितेतून व्यक्त करण्याचा  एक छोटासा प्रयत्न.... आजच्या मराठी भाषा दिनी तुम्हा आंम्हा सर्वासाठी ..... या कवितेतही एक विशेष असे की प्रत्येक कडव्याची शेवटची ओळ तीन शब्द आणि ' र ' चे यमक जुळती झालेली आहे . *गे माय मराठी* गे माये तव ठाऊक माझीया मनाचा ठाव हृदयीचा आर्त आलाप तुजविण कोण जपणार? ||१|| कितीएक जणांनी कष्टाने तुज जपिले या लोकी पाया, भिंती झाले किती आनंदे कितीएक झिजणार ||२|| तुझीया कुशीत प्रथम हुंकर तुझीच अंगुली, माझी वाट आज मी चढतसे शिखरे यशाची  केवळ तुझ्याच अमृतपानावर ||३ || काय सांगू माझीया डोळा हर्ष जव पाहते तुज जपण्याची धडपड या इथे भारती अन विश्वात, खेळू तुझ्याच तालावर ||४ || नुरले आता प्रांत - देशी बंधन ध्वज मराठी उंच होतसे अन उत्स्फुर्त होऊनी तन  मन नाचे अखंड समुद्रापार ||५ || या आपण सगळेजण या मऱ्हाट देशी, आसमंतात वाजवू डंका ऊर भरून माय मराठी क्षितिजापार ||६ || कल्याणी (शुभदा जगताप) २७ फेब्रुवारी २०१९ - मराठी भाषा दिन