आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

 

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

                                                      ----------- शुभदा जगताप

 

१९९१ साली मराठी रंगभूमीवर आलेलं "बंडखोर नाटक" चारचौघी पुन्हा एकदा नव्या कलाकारांसह अवतरलं आहे आणि ते पाहण्याचा योग काल आला. सातारा  शहरातील पहिल्याच प्रयोगाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. संपूर्ण नाट्यगृह हाऊसफुल होतं आणि तीनही अंकात कमालीची शांतता होती प्रेक्षकांत. आजच्या झटपट च्या जमान्यात अंकी नाटक रसिकांनी मन लावून पाहावं, त्यास दाद द्यावी, आणि तेही ३१ वर्षांपूर्वीच्या नाटकाला, काय कमाल आहे नाही! लेखक प्रशांत दळवींच्या लेखणीची ताकद, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीची दमदार हाताळणी, कलाकारांची हुकुमी टीम आणि सगळंच काही, अशी मस्त भट्टी फार क्वचित जमून येते.... ९१ साली अवघी १० वर्षांची असताना आई- वडील या नाटकाविषयी चर्चा करतानाचे अंधुकसे आठवते. नंतर वय आणि समजण्याइतकं शहाणपण वाढल्यावरही ह्या नाटकाचा उल्लेख जेव्हा जेव्हा कानी पडायचा, तेव्हाची तेवढीच उत्सुकता काल नाटक सुरु होईपर्यंत कायम होती. खरेतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणल्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार. नाहीतर ती उत्सुकता कधीच शमली नसती.

 

'काळाच्या पुढचे नाटक' असे याचे वर्णन करता येईल आणि कदाचित त्यामुळेच ९१ सालचे हे नाटक आजही तितकेच ताजे वाटावे असे. अन्यथा सध्याच जीवन इतकं वेगवान आहे की १० वर्षापूर्वीचही खूप जुनं वाटावं. केंद्रस्थानी एका स्वतंत्र विचारांची  स्वतःच्या निर्णयांसोबत ठाम राहणारी एक स्त्री - मुलींची आई, जिने लग्न करता प्रेम या भावनेला जीवनात सर्वोच्च स्थान दिलं. नाटकात मोठ्या मुलीचे - विद्याचे  वय साधारण ३५ म्हणजे आईची भूमिका आणि तो कठीण निर्णय त्याआधी ३५ वर्ष घेतलेला (सर्वसाधारण चारचौघीनी तेव्हा हे नाटक बघताना कशा प्रतिक्रिया दिल्या असतील, याचा अंदाजही येत नाहीये मला).  दुसरी मुलगी वैजू आणि तिसरी विनी. या तिघींची आई या तिघी - अशा या चारचौघी, हा नाटकाचा मुख्य विषय. तत्कालीन काळाच्या खूप पुढचा, प्रातिनिधिक (?)  काहीसा. 

 

स्वतंत्र विचारसरणीच्या स्त्रिया, आज आपण जो काही समानता वैगेरे विषय चघळत असतो तो आणि स्त्रीच्याच बरोबरीची मुख्य जमात - म्हणजे पुरुष जात, या अनुषंगाने विषय मांडलेला आहे. पण तितका साधा सरळ नाही हा विषय. मुळात आजही २०२३ साली स्त्री-पुरुष समानता हा विषय मुख्य प्रहावात आहेच, याचा अर्थ विषमता आहेच अजून. नाहीतर चर्चा आणि तत्सम उपाय-योजना वैगेरे कशाला चर्चेत आल्या असत्या नाही? (असो, हा अजून एक वादविवादाचा संपणारा विषय!). चारचौघींसारखं साधं सरळ जीवन आपल्या वाट्याला आलेलं नाही, याची खंत ती आई बोलून दाखवतेच, पण तरीदेखील तिच्या मुलींच्या आयुष्यात पुरुषांमुळे आलेल्या वादळांना ती समर्थपणे तोंड देत उभी दिसते. मानलं पाहिजे त्या कणखरपणाला!!

विद्या, वैजू या समाजातील अनेक स्त्रियांचं प्रतिनिधित्व करतात. उच्चविद्याविभूषित दिसायलाही बऱ्यापैकी बरी असतानादेखील आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीची गरज का भासावी, हा विद्याचा प्रश्न! त्यातून तिच्या अस्मितेला बसलेला धक्का आणि तिने केलेला त्या घटनेचा निषेध एका ठाम निर्णयापर्यंत येऊन पोहोचतो, तेव्हा आपणही आपसूक विचार करू लागतो की तिची भूमिका योग्य की अयोग्य? आपला हाच विचार लेखक त्यातील प्रकाश आणि विरेन या पुरुष पात्रांच्या विचारातून दर्शवतो. एकाला विद्या योग्य वाटते तर दुसऱ्याला वाटतं की तिने नवऱ्याला माफ करून लग्न वाचवावं. विद्याचा उद्वेग काळीज चिरून जातो कारण तिच्या अस्मितेपेक्षाही तिच्या विश्वासाला दगाफटका झाल्याने ती घायाळ होते आणि म्हणून क्षमेचा ती विचारही करत नाही. आणि का करावा तिने? ज्याचं उत्तर त्यानेच शोधावं, कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असणार या बाबतीत.

 

वैजूचा विषयच वेगळा. प्रेमविवाह आणि त्यातून आलेलं नैराश्य. कारण बाह्य दिसण्याला भुलून ती ज्याची नवरा म्ह्णून निवड करते तो अत्यंत बेजवाबदार आणि काहीही काम न करता फुशारक्या मारणारा. तिचा उपहास आणि प्रश्न मात्र विचार करायला लावणारा. बायकोने कमावून आणावे यातच धन्यता मानणारे व बसून खाणारे 'अकार्यक्षम' पुरुषांसोबत राहणाऱ्या स्त्रियांची अवस्था तर इकडे आड अन तिकडे विहीर! सोडूही शकत नाही आणि धरुही वाटत नाही. मग त्यांचं हसणंही भेदक आणि भेसूर वाटतं ! अशा अनेक वैजूही आपल्या आजूबाजूला असतीलच. त्यांचं आयुष्य कसं असेल? मग ती का सोडत नाही त्या पुरुषाला? का दुसरा खेळ मांडण्यास ती कचरतो, कदाचित पुन्हा फसले तर सहन होणार नाही म्हणून? प्रश्न अनुत्तरीतच राहतात..... 

 

विनी ही आजच्या काळाच्याही किमान ५० वर्ष पुढचा विचार करणारी. एकाच वेळी दोन पुरुषांसोबत राहण्याची इच्छा बिनधास्तपणे बोलून दाखवणारी. लग्न करायलाच पाहीजे का, असा प्रश्न विचारणारी आणि शेवटी स्वतःच स्वतःच्या प्रश्नांचा धांडोळा घेणारी. नाटकाचा शेवट तिच्यात प्रश्नाने होतो, तिला विचारमग्न दाखवून.

 

या चारही स्त्रिया आपल्यातल्या चारचौघींचं प्रतिनिधित्व करतात आणि करतही नाहीत, एकाच वेळी. करतात ते या कारणाने की ह्यातील प्रश्न आपल्यालाही पडलेले असतातच, कधी ना कधी - हे असंच का आणि तसं का नाही? पुरुषाने केलेलं आपला समाज सहज स्वीकारतो आणि स्त्रीने केलेलं का अमान्य आणि व्यभिचार या नावाखाली ढकललं जातं ? मग समानता आली कुठे? आणि प्रतिनिधित्व करत नाही ते या कारणाने की - असे चौकट भेदणारे निर्णय स्त्रीने घ्यावेच कशाला जेणेकरून तिचे संपूर्ण जीवन कायम अस्थिरच राहील - असा व्यावहारिक सुज्ञ (?) विचारधारा असणारा समाज, मुख्यतः स्त्रियाच. बघायला गेलं तर दोन्ही बाजूंना अनेक कांगोरे आहेत. ज्याचा त्याचा दृष्टिकोन त्या त्या प्रश्नाचे उत्तर ठरवेल. 

 

पण या नाटकाने मात्र माझ्या मनात विचारांचं काहूर माजवलं! अनेक प्रश्न लाटांसारखे उसळले.

- मुळात लेखकाला ह्या विषयाची प्रेरणा कशी मिळाली असावी? असं म्हणतात की एखादी कथा जन्म घ्यायला तिचा अंश प्रत्यक्षात कुठेतरी घडलेला असतो.  मग असं कुटुंब असेल का त्यावेळी आणि त्यांचं जगणं कसं असेल?

- या नाटकाचा विषय तसा समजलेलाही, पण अनेक प्रश्न देऊन जाणाराही - यातून नेमकं काय सांगायचं आहे? स्त्री-पुरुष समानता? स्त्रीला विचारांचं आणि वागण्याचही स्वातंत्र्य? की अजून काही?

- विनी ज्या युगाच / पिढीचं प्रतिनिधित्व करताना दाखवली आहे, तसा काळ सहज रूढ झाला तर किती गुंतागुंत होईल? समाज ढवळून निघणार नाही का?

- बाहेर प्रकरण असणाऱ्या पुरुषाला माफ करून लग्न वाचविणं किती शहाणपणाचं ? तिनेच नेहमी का समजून घेऊन स्वत्व गमवायचं ? आणि पुरुष असेच वागत राहिले तर स्त्रियांचा लग्नसंस्थेवरचा विश्वास तर उडून जाणार नाही ना?

- येणाऱ्या काळात जशास तसे म्हणून स्त्रियाही बेजबाबदार वागू लागल्या तर?

 

असे एक ना अनेक प्रश्न. काहींची उत्तरं मिळतीलही कदाचित, पण बरेचसे प्रश्न अनुत्तरितच राहतील !!! कारण ठोस असं काही उत्तर या प्रश्नांना नाहीये सध्या तरी.

 

स्वातंत्र्य याचा अर्थ पुरुष काय किंवा स्त्री काय, दोघांनीही नीट समजून त्याचा योग्य वापर करावा हे अपेक्षित नाही का? नाहीतर संपूर्ण समाजाचाच समतोल ढासळेल.... कुणा एकाचही वर्चस्व राहता माणूस म्हणून जगणं किती सुंदर आहे. ते खरं सहजीवन, नाही का?

 

शुभदा जगताप

१७ मार्च २०२३, सातारा.

Comments

Popular posts from this blog

सहावी दुर्गा - पद्मजा