सहावी दुर्गा - पद्मजा

*नवरात्र....नऊ दिवस.....नऊ कथा.....*
*---- शुभदा जगताप*
२२/१०/२०२०

आज नवरात्रीची सहावी माळ! आज देवीच्या कात्यायनी या रूपाची आराधना केली जाते.
देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट दर्शविणारे हे रूप आहे. यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत. आजच्या माझ्या कथेची जी नायिका आहे तिचं एक आगळेवेगळं वैशिष्ट्य अस आहे की मातृत्वाच्या रूपामध्ये तिने आपला सच्चा नातेसंबंध जपला. स्वतःच्या आत्म्याशी एकरूप होऊन अगदी मनापासून तिने दिलेले वचन पाळले होते. त्याच्याशी एकनिष्ठ राहिली आणि शेवटी तिच्या आयुष्याचा प्रश्न नियतीकडूनच चांगल्या रीतीने सोडवला गेला. पद्मजाची ही कहाणी चारचौघीपेक्षा निश्चितच खूप वेगळी आहे. तुम्हाला ती आवडेल अशी मी आशा करते.

*सहावी दुर्गा - पद्मजा*

त्या पाच जणींचा ग्रुप विशेष होता. इंजिनिअरिंग कॉलेजला तिघी एका शाखेत व उरलेल्या दोघी वेगळ्या तरी मैत्री घट्ट. एकमेकांविषयी आपलेपणा शेवटपर्यंत टिकून राहिला कॉलेज संपून बाहेरच्या व्यवहारी जगात प्रवेश केला तरीही!
शरण्या, कनिका, पद्मजा, सानिका आणि ऋजुता अशा या पाचही अगदी भिन्न स्वभावाच्या आणि भिन्न पार्श्वभूमीच्या मैत्रिणींचा मस्त ग्रुप होता. कॉलेजमध्येही सर्वांना आश्चर्य वाटायचे की एका शाखेत नसून एवढ्या कशा काय त्या नेहमी एकत्र दिसतात? कारण या सर्वांचाच एक गुणधर्म किंवा समान धागा असा होता की अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या व केवळ मेहनत आणि अक्कलहुशारी च्या जोरावर शिक्षणात चमकणाऱ्या त्या होत्या. तेव्हा तर मोबाईलही नव्हते. पण संवाद इतका छान व नेहमी समोरासमोर प्रत्यक्ष व्हायचा, त्यामुळे खूप चांगली बांधिलकी होती सगळ्याचजणींची एकमेकींशी.
एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात मोबाईलने प्रचंड उत्क्रांती घडवली. या पाचही जणींचा जगाशी प्रत्यक्ष व्यवहारी म्हणजे पैसा कमावण्याचा संबंध याच काळातला. प्रत्येकीला नोकरी मिळालेली आणि कालानुरूप मोबाईल ही प्रत्येकी कडे आला. पण तो हातात नसताना जेवढं बोलण व्हायचं त्याच्या निम्मही आता होत नव्हतं. मुंबईच जीवनच तसं घाईच असतं म्हणा. दिवसाचे २४ तासही पुरत नाहीत, स्वतःसाठीच वेळ मिळत नाही, ते इतरांना काय फोन करून बोलायचे? पण मैत्री घट्ट असली की तो भाव मनात कायमच असतो, ओला, एका कोपऱ्यात आणि मग कधीही कितीही वर्षांनी भेटण झालं तरी डोळ्यात ती चमक दिसते.
यथावकाश एक एक करून सगळ्या जणींचे दोनाचे चार हात झाले. शरण्या शेवटून दुसरी. आता फक्त पद्मजाच उरली होती. सगळ्याजणी तिच्याच बातमीची वाट बघत होत्या आणि एकदाचा तो गोड प्रसंग तिच्या आयुष्यात अवतरला. पद्मजा खुश होती पण त्याहीपेक्षा जास्त ती समाधानी होती. त्याला कारणही तसच भरभक्कम होतं म्हणा. सगळ्या प्रिय मैत्रिणींना फोन करून आग्रहाच आमंत्रण करून तिच्या दिवसाचा शेवट गोड झाला होता. सगळं आवरून दुसर्या खोलीत शांत झोपलेल्या आपल्या भावाकडे मायेने बघून तीही झोपायला गेली. पण विचारांचं काहूर मनात होतं मन तिच्याशी खूप खूप बोलत होतं आज. अगदी सुरुवातीपासूनच सगळं तिला आठवून देत होतं आणि मग तीही ते ऐकत होती व मनाशी हितगूज करण्यात गुंतून गेली इतकी की वेळेच भान च उरलं नाही!
मन सांगू लागलं जेव्हा ती अवघी सतरा-अठरा वर्षांची होती तेव्हा वडील अचानक वारले. आईने कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पद्मजाला दोन भावंडे. ती मधली, मोठी बहीण व लहान भाऊ पारस. आईच्या डोळ्यासमोर दोन मोठी चिंतेची कारणे होती की मोठ्या मुलीचे लग्न व पारस चे काय, कारण पारस स्पेशल चाईल्ड होता. त्याला सांभाळणे हे आईच करू शकते आणि माझ्या माघारी या दोघी लग्न होऊन निघून गेल्यानंतर त्याचे काय होणार? आईला पदमजावर पूर्ण विश्वास होता की ही सगळं सांभाळून नेईल. पद्मजाही घरच्या सगळ्या परिस्थितीमुळे वयापेक्षा खूपच जास्त समजूतदार झाली होती आणि पारस ची 'मी कधी बहीण तर कधी आई होऊन सांभाळ करेन' याची खूणगाठ मनाशी तिने पक्की केली होती.
कॉलेजला पद्मजा घाईतच यायची आणि घाईतच निघून जायची. कायम ती कुठल्यातरी ओढीने किंवा काळजीने ओथंबलेली असायची. इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात या पाचही जणांची ओळख झाली तेव्हा तिच्या बाबतीत फार काही ठाऊक नव्हतं. पण जसजशी मैत्री वाढत गेली तसतस एकमेकींना एकमेकींविषयी सगळं काही समजणे ओघाने आलच! शरण्या आणि ऋजुता वेगळ्या वर्गात तर कनिका, पद्मजा आणि सानिका एकाच वर्गात. आई नोकरीला गेल्यावर पारसला शाळेत सोडण्याची व परत घेऊन येण्याची जबाबदारी पद्मजा वर असे. तिची मोठी बहीणही नोकरी करायची. इंजिनिअरिंगचे शिक्षण, घर आणि पारस या तीनही आघाड्यांवर पद्मजा ची दमछाक व्हायची पण तरीही चेहऱ्यावर कायम हसू आणि उत्साह त्या चौघीसमोर तिचा असायचा. आवर्जून विचारपूस असायची आणि एवढं सगळं सांभाळून देखील ती वर्गात टॉपर होती. शरण्याला तिचं प्रचंड कौतुक होतं की कसं काय ही सगळं मॅनेज करते?
पद्मजा ठाण्याला राहायची तर बाकी चौघी कल्याण च्या पुढच्या. एकदा सेमिस्टर एक्झाम झाल्यावर त्या सगळ्या जणींनी ठाण्यात भेटायचं ठरवले. पद्मजा आपल्या भावाला सोबत घेऊन आली होती. पारसची शारीरिक वाढ इतर मुलांप्रमाणेच पण बाकीच्या प्रगतीचा वेग मात्र खूपच हळू होता. ज्या प्रेमाने पद्मजा त्याला सांभाळायची ते पाहून चौघींना ही भरून आलं होतं.
आता सगळ्याजणी नोकरीत व्यस्त झालेल्या. सर्वांचे एक एक करून लग्न झाले आणि मध्यंतरी कळले की पद्मजाची आई ही वारली. सांत्वनाचे फोन आले चौघांचेही पण भेटण काही झालं नाही. फक्त शरण्या मुंबईत होती बाकी तिघी परदेशी गेलेल्या. शरण्याने वेळ काढून तिला भेटायचे ठरवले. बाहेर कुठे शक्य नव्हतं म्हणून पद्मजाच्या घरीच दोघी भेटल्या. कडकडून गळाभेट झालेली. पारस होताच. मोठी बहीण लग्न होऊन निघून गेलेली.
आता त्या घरात पद्मजाच पारसची बहीण, आई आणि वडील ही!!
पण तिला डोकं टेकवण्यासाठी कुणाचा खांदा नव्हता. नातेवाईक होते, पण पद्मजा चांगली सत्तावीस अठ्ठावीस वर्षांची कमावती होती. विचारपूस सगळे करायचे पण हक्काचं मोठं कुणीही नव्हतं पद्मजाला.
दोघींच्या खूप गप्पा झाल्या आतलं बाहेरचं आवडतं आवडतं सगळ एकमेकींना सांगून झालं. लग्नाचा विषय निघाला तर पद्मजा म्हणाली अग पारस ला सोडून मी कशी कुठे जाऊ शकणार? मला असाच मुलगा आणि त्याच्या घरचे हवेत कीं जे पारस ला स्वीकारतील. तरच मी लग्न करेन अथवा जशी परमेश्वराची इच्छा! ते एकूण शरण्याला धस्स झालं कारण असे एखादे कुटुंब मिळणे महाकठीण काम होतं. पण त्याहीपेक्षा जास्त तिला पद्मजा च कौतुक वाटले आणि म्हणून तिला एक कडक शाबासकी दिली manaat. अरे ही पठ्ठीने स्वतःचं सगळं बाजूला सारून आईची जागा घेतली आहे. दिलेल्या वचनाशी बद्ध आहे आणि जन्म न देताही मातृत्व निभावतेय. त्या क्षणी शरण्या च्या मनात या ओळी तरळून गेल्या.....
*माय नसता घरीदारी बहिणीची होते ती आई ही मीच
सखी सोबती मैत्रीण वा प्रेयसी हृदयाची हाक ऐकते ती ही मीच...*
पद्माजा ला शुभेच्छा देऊन शरण्या निघून गेली. एक-दोन वर्षात तिचेही लग्न झाले. आता दुसरे दशक आलेले व स्मार्टफोन ही आलेले. त्यांनी अजून एक मोठी घुसळण झाली आणि त्यानंतर आलेल्या व्हाट्सअप नावाच्या वादळाने तर सगळ्याच लांब असणाऱ्या प्रियजनांना वर्च्युअल प्लॅटफॉर्मवर एका ठिकाणी आणून ठेवले.
आता या पाच जणींचा एक छान व्हाट्सअप ग्रुप होता आणि त्यावर पद्मजाने आपल्या लग्नाची डिजिटल पत्रिका सगळ्या जणींना पाठवली होती. खुप आनंद झाला होता सगळ्यांनाच! पारस चा विषय निघाला तेव्हा मोठ्या समाधानाने पद्मजा म्हणाली- हो ग सख्यानो माझ्या सहनशक्तीचा बांध मी तूटू दिला नाही. आणि त्या परमेश्वराला ही माझी दया आली. तो खूप कृपाळू आहे. मला असं कुटुंब मिळालं की जे माझ्यासोबत पारस चा ही स्वीकार करणार आहेत कायमसाठी. मी नुसतीच आनंदी नाही तर समाधानी आहे. भगवान के घर देर है पर अंधेर नही असं म्हणतात त्याचा प्रत्यय आता तिला आला होता.
स्वार्थापोटी असलेल्या जबाबदाऱ्याही झटकून देणारी अनेक लोकं या जगात आहेत. पण आपल्या आत्म्याशी सच्चेपणा राखणं, दिलं वचन n मोडणं आणि बंधुप्रेम हे बहिणीपेक्षाही आईच्या भूमिकेतून जास्त राखणं हे मातृत्वाचे वेगळं अंग आहे. जिथे भावंडे एकमेकांना पाण्यात बघतात तिथे आपल्या निरागस भावासाठी मातृत्व रूप घेऊन स्वार्थ बाजूला ठेवून सच्च्या नातेसंबंध जपणारी पद्मजा खरोखरच खूप वेगळी आणि आदरणीय ठरते. सगळं सांभाळून आज ती पतीबरोबर सहजीवनही उत्तम रित्या पार पाडतेय.
अशी ही आगळीवेगळी दुर्गा रूपातील पद्मजा नक्कीच कुठल्या एका परिमाणात न बसणारी v वेगळ्या उंचीला जाऊन पोहोचलेली आहे, नाही का?
*तिला वसाच दिला तो विधात्याने...*
*प्रेम माया निर्माण नि समर्पण*
*तिच्याच गर्भात असे जीवनाचे बीज*
*घेऊ श्वास शेवटचा निवांत*
*मायेची पृथाही असे तीच....*
*पद्मजास समर्पित!!!*

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य