आठवी दुर्गा - विशाखा

 

*नवरात्र....नऊ दिवस.....नऊ कथा.....*

                  *---- शुभदा जगताप*

 

२४/१०/२०२०

 

आज नवरात्रीची आठवी माळ! आज देवीच्या महागौरी या रूपाची आराधना केली जाते.

 गौर म्हणजे गोरा,सफेद.सफेद रंग शुद्धतेचे प्रतिक आहे. शुद्धता निरागसतेमधून येते. महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ. महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते.

 

*आठवी दुर्गा - विशाखा*

 

विशाखा आणि जयश्री यांची जोडी संपूर्ण हॉस्टेल मध्ये फेमस होती.  दोघी ही एकदम विरुध्द्व स्वभावाच्या, पण मैत्री झाली ती कायमचीच! इंजिनियरिंग करून विशाखा मास्टर्स साठी गुजरात च्या मोठ्या नावाजलेल्या कॉलेजात आलेली आणि जयश्री महाराष्ट्रातून आलेली. दोघी ही  सामान्य कुटुंबातल्या पण शिक्षणाचे महत्व खूप जाणून होत्या. त्यामुळे पदवीने नंतर खूप चांगली स्थळे आली तरी लग्नाच्या भानगडीत पडता आई   वडिलांना अगदी ठामपणे सांगितलं उच्च शिक्षणाची इच्छा आहे म्हणून. दोघींचेही  नशीब चांगले की विरोध  झाला नाही किंवा लग्नाचा दबाव आला नाही आणि यथावकाश दोघीही या युनिव्हर्सिटी मध्ये दाखल झाल्या. त्याचेच मुलींचे वसतिगृह होते त्यात दोघी एकमेकींना निव्वळ योगायोगाने भेटल्या.  नंतर गप्पा झाल्यावर लक्षात आले की ही पार्श्वभूमी दोघींचीही अगदी सारखीच.

 

 वर्णन काय करावे या दोघी मत्रिणींचे? विशाखा दिसायला अतिशय सुंदर , सालस आणि मितभाषी मुलगी होती. झटकन रिऍक्ट होणे किंवा तोडून बोलणे हे तिच्या रक्तातच नव्हतं.  अभ्यासातही व्यवस्थित होती पण खूप मेहनती. जयश्री खूप तल्लख बिद्धीची आहे हे ती जाणून होती आणि म्हणूनच तिच्याविषयी विशाखाला खूप अप्रूप वाटायचे  आणि आपण तिची खास मैत्रीण आहोत याचाही आनंद होता. जयश्री मात्र तिच्या अगदी उलट होती. बिनधास्त, भिडस्त, दिसायला सामान्य पण कुशाग्र बुद्धीच्या देणगीसह. जयश्री ला बोलायला खूप आवडायचं आणि अभ्यासावर चर्चा  आवडायची. थोडा अहंकारी आणि शीघ्रकोपी मात्र नक्कीच होता जयश्री चा स्वभाव. हॉस्टेल ला दोघीही आल्या तेव्हा २३ वय होत पण विशाखा वयापेक्षा लहान दिसायची. तिच्या डोळ्यातली निरागसता जयश्री ला खूप आवडायची.  कॉलेज ला काही मुले विशाखा च्या मागे पुढे करायची तेव्हा जयश्रीच असायची तिच्या मदतीला. मग मुले निघून जात, मनात जयश्री ला शिव्या घालत. 

 

कॉलेज हॉस्टेल ला वर्षे घालवायची होती. सुरुवातीला त्या दोघी शहरात आजूबाजूला दार रविवारी फिरायला जायच्या आणि महिन्यातून एकदा तरी घरी जाऊन येत. दोघींची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत राहिली. मग जरा हिम्मत करून विशाखा ने जयश्री ला रागावर कंट्रोल करायला शिकल पाहिजे तू, असं आवर्जून सांगितलं. पण जयश्री च्या स्वभावात काही फरक पडलेला नव्हता.

 

दिवसांमागुन दिवस जात होते. रोज हॉस्टेल ते कॉलेज पुन्हा परत येणे, मेस ला जेवणे, स्वतःची सगळी कामे, अभ्यास यात दिवस महिने कसे उलटू लागले ते कळलेच नाही. जयश्री ने मग स्कुटी घेतली आणि मग विशाखा सोबत मस्त कॉलेज ला जाऊ लागली. दोघीचा वर्गात कायम पहिला दुसरा नंबर असायचा, दुसरी विशाखा असायची. तिला त्याचा फार गर्व नसायचा पण जयश्री मात्र यासाठी फार महत्वाकांक्षी होती. एकदा हॉस्टेल मधून निघायला विशाखामुळे  उशीर झाला आणि जयश्रीला  गेट वर खूप वेळ वाट बघावी लागली. आज पहिले लेक्चर जाणार या विचाराने जयश्री कावरीबावरी झालेली आणि तितक्यात विशाखा समोर आली. सॉरी सॉरी म्हणत जयश्री च्या मागे स्कुटी वर बसणार तोच जयश्री ने सगळा  राग ओकला आणि मी नसेल तर तुझं काय होईल, कॉलेज ला कधीच वेळेवर जाऊ शकणार नाहीस, असं बोलत इतर मुलींसमोर जवाजवळ विशाखावर खेकसलीच. विशाखाला  हे अनपेक्षित होत आणि ती गोरीमोरी झाली. तशीच रूमवर परत गेली आणि जयश्री गेली कॉलेज ला, एकटीच.

 

संध्याकाळी होस्टेलवर परत आल्यावर जयश्री विशाखाला भेटायला गेली पण तिने भेटायचं टाळलं. इथून खरं तर त्यांच्या मैत्रीत दुरावा येऊ लागला. जयश्री ला कळत होत पण सॉरी म्हणणं तिच्या स्वभावात नव्हतं आणि विशाखाला तीच बोलणं हृदयाला जखम करून गेलं होत. विशाखा जास्तीत जास्त वेळ अभ्यास आणि स्वतःच्या मनाची शक्ती वाढविण्यात घालवत होती. उलटून बोलण्यापेक्षा आपलय कृतीतून समोरच्याला त्याची चूक दाखवून देऊ शकतो यावर तिचा जास्त  भर होता. जयश्री सोबत बोलणं सोडून आता बरेच दिवस झाले होते. तिलाही वाटत होत बोलावसं पण याच प्रसंगातून आपलय प्रिय ऎत्रिणीला काहीतरी चांगला संदेश आपण देऊ शकू असे तिला मनोमन वाटत होते.

 

पण जयश्रीत फार काही बदल झाला नाही. तिच्या मैत्रिणी बदलल्या आणि ती दिवंसेदिवस जास्त उर्मट होत चालली आहे हे दिसून येत होते. कॉलेजच्या शिक्षकांसोबतही तिचे खटके उडाले होते. आणि विशाखा स्वतःहून बोलत नाही याचा रागहि होता, पेक्षा जास्त तिचा अहंकार आडवा येत होता. सेमिस्टर जवळ असल्याने सगळेच अभ्यासात व्यग्र झालेले. परीक्षा संपल्या आणि काहीही सांगता विशाखा घरी गेलेली. जयश्रीला विशाखाइतकी मनाने निर्मळ  आणि निरागस मैत्रीण दुसरी कुणीही नाही मिळाली;  पण माफी मागायचा विचार काही जयश्री च्या मनी येत नव्हता.

 

अशातच काही दिवसांनी निकाल आला आणि या वेळी वेगळं घडलं. विशाखा नुसती वर्गातच नाही तर संपूर्ण एका विभागातुन ( विषय  शाखांचा एक विभाग) प्रथम आली होती. हा जयश्री ला खूप मोठा धक्का होता. अगदी  सणसणीत चपराक बसल्यासारखा, कारण तिला कुणीही मागे टाकू शकणार नाही हा तिला अतिआत्मविश्वास  होता. ज्या भ्रमाचा  भोपळा तिच्या प्रिय मैत्रिणीनेच  फोडला होता. आता तर राग आणि अहंकार अनावर झालेला आणि जिथे सर्वजण विशाखा चे अभनंदन करत होते तिथे ती जाऊन पोहोचली आणि तिला अद्वातद्वा बोलू लागली. विशाखा ने तिला येताना पाहिलं होतं  आणि आपली मैत्रीण आपलं कौतुक करायला येतेय अस वाटून ती मनोमन खुश होत होती पण घडलं खूपच विचित्र. मग मात्र विशाखा ला राहवलं नाही आणि तिने सर्वांदेखत जयश्री ला गप्प केलं हात दाखवून. जयश्री ला हे अनपेक्षित होत. विशाखा ने तिला सुनावलं - ' स्वतःच्या बुद्धीवर इतका गर्व कशासाठी, कारण आपल्यापेक्षाही कुणीतरी जास्त विद्वान असू शकत हे लक्षात ठेव.   आणि विद्या विनयेन शोभते. निरागस आणि शुद्ध मनाच्या व्यक्तीलाच विद्वत्ता शोभून  दिसते आणि जी तुझ्यात अजिबात नाहीये.  तू स्वतःला विद्वान समजतेस, पण माझ्या नजरेत तू रागाने डोकं भरून घेतलेली एक मूर्ख मुलगी आहेस. मैत्री तुटली तरी तुझा अहंकार कमी झाला नाही आणि आज तर तू तुझ्यापुढे जाणाऱ्या प्रिय मैत्रिणीलाही पाहू शकत नाहीस. माझ्या मनात आता तुझ्याबद्दल काहीएक जागा उरली नाही कारण तुझ्या वागण्याने ती तू घालवणं टाकली आहेस.'

 

विशाखा निघून गेली. पण तिचे वाक्य जयश्रीच्या कानात कायम घुमत राहिले. विनम्रता आणि निरागसता नसेल तर मैत्री टिकू शकत नाही हे तिला कळून चुकले होते. नुसतेच ज्ञान काय कामाचे जर त्यासोबत नम्रता नसेल आणि ते इतरांना वाटण्याची कुवत नसेल, इतरांच्याही यशाला दाद देता येत नसेल. ज्ञानाने लोक तुम्हाला आदर देतील पण जगायला माणसांची गरज लागते आणि अर्थपूर्ण आयुष्यासाठी  एक तरी हृदयाच्या जवळचा मित्र अथवा मैत्रीण हवी. विशाखाच्या तिच्या जीवनातून निघून जाण्याने जयश्रीला या नवीन पण मार्मिक ज्ञानाचा शोध लागला होता आणि तोच तिच्या यशस्वी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्वाचा मार्गदर्शक ठरला होता. जयश्री एक प्रेरणादायी वक्ता (मोटिवेशनल स्पीकर) म्हणून नावारूपाला येत होती. आपल्या व्याख्यानात ती तिच्या आयुष्यातील या प्रसंगाचा नेहमी उल्लेख करायची आणि प्रत्येकाने यातून काय शिकले पाहिजे हे आवर्जून सांगायची. विशेषकरून  कॉलेज ला जाणारी मुले  तिच्या या स्पीच ना गर्दी करत.

 

विशाखाने  जयश्री ला कळू देता तिच्यात योग्य तो बदल घडवून आणला होता. कॉलेज संपल्यावर आपल्या प्रिय मैत्रिणीच्या यशाचा चढता आलेख ती कायम बघत राहिली आणि मनोमन आनंदाने रुदन करीत राहिली. जयश्री च्या यशाची खरी शिल्पकार ही विशाखा होती हे जयश्री लाही मनोमन कळून चुकले होते. विशाखाच्या  या उदात्त आणि शुद्ध हेतूच्या विद्वत्तेला जयश्री ने मनोमन प्रणाम केला!!

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य