नववी दुर्गा - सानिका

*नवरात्र....नऊ दिवस.....नऊ कथा.....*

                  *---- शुभदा जगताप*

 

२५/१०/२०२०

 

आज नवरात्रीची नववी माळ! आज देवीच्या सिध्दिदात्री या रूपाची आराधना केली जाते. तुम्ही स्व मध्ये स्थिर असाल तेंव्हाच तुम्हाला सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होईल, तेंव्हाच समतोल ढळण्याची खात्री असेल. गुरुकृपेमुळेप्राविण्य आणि मुक्तीया सिद्धीधात्रीने दिलेल्या देणग्या आहेत.  माझ्या आजच्या कथेची नायिका ही अशीच स्व मध्ये स्थिर झालेली आणि गुरुकृपेने आपल्या क्षेत्रात प्राविण्य मिळविलेली अशी सानिका ... तुमच्या भेटीला. 

 

*नववी दुर्गा -  सानिका*

 

आज सानिकाने पुन्हा आपल्या करियरची सुरुवात केली, तब्बल १० वर्षांच्या गॅप नंतर. खूप वेगळं वाटत होत तिला, साहजिकच आहे म्हणा. इतकी वर्षे घरी राहून होममेकर च्या भूमिकेत स्वतःला सिद्ध केल्यानंतर आता ती करियरची दुसरी इंनिंग खेळण्यास सज्ज झाली होती. समिंश्र भावनांचे हिंदोळे मनात, आज पहिला दिवस होता ना ऑफिस चा.

 

दिवसाची सुरुवातच आज तिची धावपळीत होती कारण वेळेवर ऑफिस ला पोहोचायचं होतं तिला. पुन्हा एकदा 'फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट .... ' यावर तिला खर उतरायच होत. कसं असता ना स्त्रीच, भूमिकांची व्हरायटी काही संपता संपत नाही, नवनवीन सोंगं असतातच तयार तिच्या वाट्याला, मनाशीच पुटपुटत ती भराभर सगळं आवरत होती.

 

ऑफिसचा पहिला दिवस चांगला गेला. सिनियर पोस्ट मिळाली होती. सगळं काही  समजावून घेतलं होतं, टीम मेम्बर्स ना भेटून ओळख झाली होती आणि केबिन मध्ये बसून किती तरी वेळ 'आपण खरंच घरातून बाहेर पडून पुन्हा नोकरी करतोय' यावर पुन्हा खात्री करून शिक्कामोर्तब करून घेतलं तिने, मनाशीच. ऑफिसचे तास संपले, घरी आली आणि दारातच पिल्लांनी  कडकडून मीठी मारली तिला. सानिका ची दोन पिल्ले होती, मोठी मुलगी आता वर्षांची लहाना मुलगा  वर्षांचा. नवरा, सासू सासरे आणि घटस्फोटित नणंद ..... असा मोठा परिवार होता तिचा.

 

१० वर्ष संसारात गुरफटून गेलो होतो, बॅचलर जीवन किती मस्त असत, पण आई होण्याचं भाग्य आणि सुखही तितकाच किंबहुना इतर  कुठल्याही सुखापेक्षा उजवच, पिल्लाना रूममध्ये नेत ती मनाशीच बोलत होती. आज काय झालय मनाला माझ्या, किती बोलतयं, थकत नाहीये बरं? सानिका गालातच हसली, स्वतःशीच! शेखर तिच्याकडे बघतच राहिला आणि स्वतःला सावरून सानिका फ्रेश व्हायला गेली. जेवणाच्या टेबलवर सगळे तिचीच वाट बघत होते. रात्रीच्या स्वयंपाकाला बाई ठेवली होती. खूप वर्षांनी  आज तिला डिनर आयतं मिळत होत, आज काय बनवायचं या प्रश्नाने  तर सकाळीच काढता पाय घेतला होता. स्त्रियांना सर्वात जास्त कठीण असणारा आणि रोजच छळणारा तो ऐतिहासिक प्रश्न,आज काय बनवायचं ??

 

सगळे झोपी गेलेले पण सानिका ला झोप येत नव्हती, कारण तिचं मन अजूनही बोलायच्याच मूडमध्ये होत. सगळे झोपल्यावर ती छान त्यांच्या ओपन टेरेस मधल्या झोपाळ्यावर येऊन बसली. हलके हलके झोके घेत असताना तिचं मन तिच्यासोबतच अलगद भूतकाळात जाऊन बसलं. अगदी तिथे गेली जेव्हा ती १२ वी ला होती, सायन्स ला. एक मोठी तर एक लहान बहीण, ही मधली आणि एक अगदी लहान भाऊ. चार भावंडं, आई आणि वडील. साधं सामान्य कुटुंब. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणारं.  सानिका अभ्यासात सगळ्यात हुशार आणि खूप मेहनती. मेरिट वर इंजिनीरिंग ला प्रवेश मिळाला, कॉम्पुटर शाखेत, तिची इच्छा पूर्ण झालेली मेहनतीच्या जोरावर.

 

कॉलेज मध्ये शरण्या, कनिका, पद्मजा, सानिका आणि ऋजुता अशा या पाचही अगदी भिन्न स्वभावाच्या आणि भिन्न पार्श्वभूमीच्या मैत्रिणींचा मस्त ग्रुप होता. कॉलेजमध्येही सर्वांना आश्चर्य वाटायचे की एका शाखेत नसून एवढ्या कशा काय त्या नेहमी एकत्र दिसतात? कारण या सर्वांचाच एक गुणधर्म किंवा समान धागा असा होता की अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या केवळ मेहनत आणि अक्कलहुशारी च्या जोरावर शिक्षणात चमकणाऱ्या त्या होत्या. तेव्हा तर मोबाईलही नव्हते. पण संवाद इतका छान नेहमी समोरासमोर प्रत्यक्ष व्हायचा, त्यामुळे खूप चांगली बांधिलकी होती सगळ्याचजणींची एकमेकींशी. पद्मजा एकटी ठाण्याला राहणारी, बाकीच्या कल्याण च्या आणि त्या पुढे राहणाऱ्या. कल्याण ला एकाच लोकल ट्रेन ला त्या चौघी भेटायच्या, तेव्हा मोबाईल नव्हते तरी त्यांचं कोऑर्डिनेशन चुकायचं  नाही. अगदी क्वचितच कधीतरी मागे पुढे व्हायचं, पण पुढे बस स्टोपवर भेटायच्याच. सहवासाने दिवसेंदिवस त्यांच्यातलं बॉण्डिंग पक्क होत चाललेलं.

 

सेमीनार  एक्साम जवळ आलेल्या. दोन पेपर झाले आणि तिसऱ्या पेपर च्या दिवशी सानिका नेहमीच्या ट्रेन ला नव्हती. कॉलेजाला नेहमीच्या ठिकाणी बसून बाकीच्या वाट बघत असता ती आली आणि तिची देहबोली खूपच वेगळी जाणवली. सानिका येऊन बसली आणि शून्य नजरेने बघितलं सर्वांकडे. सगळ्यांच्या छातीत धडधडत होत, कारण सानिका खूप कमी बोलणारी असली तरी अशी कधीच नव्हती. तिचे वडील आदल्या दिवशी हार्ट अटॅक ने देवाघरी गेलेले, या सर्वांना असच अर्धवट सोडून. तिच्या मामाने तिला आपल्याकडे घरी आणलेलं आणि ती आज परीक्षेला आली होती. कमल होती तिची, त्या क्षणी तिने स्वतःला ज्या प्रकारे सावरलं होतं आणि ज्या  स्थिरतेने ती पेपर द्यायला आली होती. सानिकाच्या शांत आणि स्थिर स्वभावाची कसोटी घेणारा हा पहिला मोठा प्रसंग, पण मोठ्या धीराने तिने तो निभावून नेला. नुसती पासच नाही झाली सानिका, पण ६० टक्क्यांच्या वर मार्क्स मिळवलेले पठ्ठीने ! मला जे जे हवय ते ते मी नक्कीच प्राप्त करिन, माझ्या मेहनतीच्या आणि गुरुकृपेच्या जोरावर, या दृढनिश्चयाने सानिका चा प्रवास सुरु झालेला. सर्व चारही वर्षात उत्तमरीत्या पास होऊन एका मोठ्या कंपनीत सानिका नोकरीला लागली. वडील गेल्यानंतर आज त्या कुटुंबातील पहिली व्यक्ती - सानिका,  व्यवहारी जगाशी दोन दोन हात करण्यास सज्ज झाली होती.

 

आई आणि भावंडांवर नितांत प्रेम करणारीसानिका दिसायला ही छान होती. तिची हुशारी, सालस स्वभाव आणि देखणेपणा सहज डोळ्यात भरायचा कुणाच्याही. तिचा आधी मित्र असणारा आणि आता नवरा झालेला शेखर पहिल्या भेटीतच तिच्या प्रेमात पडला होता. लग्नाचा विषय निघाला तेव्हा मोठ्या ताईचे चे जमल्याशिवाय मी घरी सांगणारही  नाही आणि लहानीच शिक्षण मला पूर्ण करूनच काय तो निर्णय घ्यायचा आहे, असं तिने शेखरला स्पष्ट केलेलं आणि शेखर ही वाट बघेन पण तुझ्याशीच लग्न करेन यावर ठाम होता.

 

नोकरीत प्रगती उत्तम पण ताईचे लग्न जमायला खूप वेळ गेला पण सानिकाने  आपला समतोल ढळू दिला नाही. जणू काही वडिलानानंतर मीच या घराचा कर्ता पुरुष आणि भाऊ मोठा होईपर्यंत मी माझ्या जाबाबदाऱ्या योग्य रीतीने हासत खेळत पाऱ  पाडल्या पाहीजे, हा एक निश्चय ठाम होता तिच्या मनाशी. यथावकाश ताई चे लग्न झाले, आणि सानिका बोहल्यावर चढली. तोपर्यंत लहान बहिणीचे शिक्षण होऊन तिलाही चांगली नोकरी मिळालेली, त्यामुळे सानिका थोडी  रिलॅक्स झालेली. शेखर बरीच वर्ष अमेरिकेत होता त्यामुळे सानिकाही  लगेच त्याच्यासोबत निघून गेली. सुरुवातीचे गुलाबी दिवस संपले आणि त्यांच्या जीवनांत गोड बातमी आली. अमेरिकेतील जीवन दुरून डोंगर साजरे असल्यासारखेच, कारण स्वबळावर बरीच कामे उरकावी लागतात. घरी सपोर्ट देणारे असतील आई वडील किंवा सासू सासऱ्याच्या रूपात तर काहीसा स्ट्रेस कमी होतो, नाहीतर मजाच असते सगळी. इथे सानिकाच्या कसोटीचा दुसरा क्षण आला. कुणीही मदतीला नसल्याने तिने चांगली नोकरी सोडली आणि एका गोंडस मुलीला जन्म दिला. नोकरी सोडताना ताब्ल १० वर्ष लोटतील पुनरागमन करायला याची तिला स्वप्नातही कल्पना नव्हती. गणपतीची निस्सीम भक्ती आणि आराधना करायची, आणि त्यातून मिळणारा आनंद विश्वास हा कायम तिच्या सोबतीला होता.

 

यथावकाश वर्षांनी दुसरं बाळ ही त्यांच्या जीवनांत आलं आणि - वर्ष आपण घरी आहोत याची तिला प्रकर्षाने जाणीव झाली. ही वर्ष वाया अजिबात गेली नाही कारण बाळाच्या संगोपनासाठी हा काळ अतिशय महत्वाचा असून प्रत्येक पालकाने तो पूर्ण त्यासाठीच द्यायला हवा या मताची ती होती. अजून पुढची - वर्ष घरीच थांबायचं आणि मगच पुन्हा करियर ला सुरुवात करायची, या निर्णयावर ती आलेली. पण दुसऱ्या बाळंतपणात तिला मेडिकल प्रॉब्लेम्स आले आणि शेवटी भारतात परत जाऊया, हा विचार शेखर ला पटवून द्यायला तिला बरेच कष्ट घयावे लागले. हाकेसरशी घरचं कुणीतरी आपाल्या मदतीला येऊ शकेल भारतात, इथे नाही, हे ती समजून चुकली होती आणि आता तब्येत नीट करावयास आई सासू चा मानसिक आधार खूप गरजेचा  आहे हे कळलं. भारतात परत आल्यावरही बराच काळाने ती पूर्ववत झाली. आपल्या मायदेशी मात्र ती खरंच आनंदी होती आणि मुलांना आपल्या मातीतील संस्कार मिळतील याबद्दल समाधानीही होती. या सगळ्या प्रवासात तिची श्रद्धा आणि गुरुकृपेसाठीची साधना प्रार्थना तिला साथ देत होत्या.

 

बायको, सून, आई आणि उत्तम गृहिणी या सर्वच आघाड्यांवर ती पुरून उरत होती. तिच्या या बॅलन्सड व्यक्तिमत्वच सगळेच जण कौतुक करायचे. अशातच नणंदेच्या आयुष्यात वादळ आलं आणि घटस्फोट घेऊन ती शेखर कडे आली. सुरुवातीला सर्वांनाच टेन्शन आलेली की सानिका कशी रिऍक्ट करेल, पण नणंदेच्या मुलासकट तिने नणंदेला स्वीकाराल, एकाच अटीवर की लवकरात लवकर त्यांनी नोकरीला लागावं म्हणजे डोकं गुंतून राहील आणि सर्वांसाठी अजून मोठं घरही घेता येईल. कारण आता सानिकाच  कुटुंब अजून वाढलं होतं.

 

आता सानिकाचा  मुलगाही वर्षांचा होत आलेला आपल्याला पुन्हा करियर ला सुरुवात केली पाहिजे हा विचार तिच्या मनात डोके वर काढू लागला. मोठ्या निश्चयाने तिने घराच्या सर्वांना आपला निर्णय कळवला आणि इंटरव्हयू च्या तयारीला लागली देखील. तिच्या ज्ञानावर बसलेली धूळ झटकायला फार वेळ लागला नाही तिला आणि एका वेगळ्याच आत्मविश्वासाने ती इंटरव्हयूला सामोरी गेली. प्रामाणिकपणे सगळं सांगितलं आणि टेकनॉलॉजि पुढे गेल्याने काही बाबतीत मी मागे आहे पण मी स्वतःला लवकरच अद्ययावत  करीन आणि बेस्ट परफॉर्मन्स देईन, या तिच्या निश्य्यी उत्तराने तिने गड  जिंकला. सानिकाच्या हातात अपॉइंटमेंट लेटर होतं  आणि त्या क्षणी तिला तिच्या पहिल्या नोकरीच्या वेळेसच्या भावनांची पुनरावृत्ती झाली असे वाटले.

 

जे जे आपल्याला हवं ते ते आपण मिळवू शकतो, फक्त स्वतःवर विश्वास आणि श्रद्धा हवी त्या नियंत्यावर, आपण त्याच्या जोडीला आपले आई वडील गुरूंची कृपा हवी, मग काहीही असाध्य नाही, असं तिचं  मन तिच्याशी बोलून शांत झालं आणि सानिका भानावर आली. चला, उठा, झोपलं पाहिजे, उद्या ऑफिस आहे आपलं, हे विसरू नका बाई, कारण सवय व्हायला थोडा वेळ लागेल, अस स्वतःलाच बजावून सानिका शांत झोपी गेली, दुसऱ्या दिवशी दुप्पट ऊर्जेने काम करण्यासाठीच!!!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य