चौथी दुर्गा- नलिनी

 

नवरात्र....नऊ दिवस.....नऊ कथा.....

                  ---- शुभदा जगताप

 

आज नवरात्रीची चौथी माळ! या दिवशी देवीच्या कुष्मांडा या रूपाची आराधना केली जाते.  कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. हे पुनरुत्पादनाचे, निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे. हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे. कुश्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे. ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते. आजच्या माझ्या कथेची नायिका जी आहे तिचं नाव आहे नलिनी आणि तिचं आयुष्य हे देवीच्या आजच्या रूपाच्या  गुणधर्मांशी साधर्म्य राखणारे!

 

चौथी दुर्गा- नलिनी

 

आज नलिनीने वयाची 80 वर्षे पूर्ण केली होती.  खूप मोठा प्रवास झाला होता तिचा.  तिच्या त्या संस्थेच्या इमारतीत बसून ती आज सर्वांसोबत तिचा ८० वा वाढदिवस साजरा करीत होती.  इतक्या प्रेमाने प्रत्येकाने तिच्यासाठी काही ना काही तरी आणलं होतं.  फार काही त्या सगळ्यांची ऐपत नव्हती पण तरीही नलिनीसाठी असणार प्रेम हे कुठल्या ना कुठल्या तरी भेट वस्तूच्या स्वरूपात आपण नलिनीताईना द्यावं याच एका विचाराने प्रत्येकीने काही ना काही तरी  आणलं होतं.  आणि त्या सर्वांचे प्रेम बघून त्या सर्वांनी ज्या आपुलकीने तिचा हा सगळा वाढदिवसाचा सोहळा केला होता ते बघुन तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि जर मागील काही वर्षांचा संपूर्ण प्रवास तिच्या डोळ्यासमोर अगदी चित्रपटासारखा उलगडला.

 

 नलिनी एका  छोट्याशा खेडेगावात राहणारी एक अतिशय सालस मुलगी, आईवडिलांची एकुलती एक.  आई-वडिल अडाणी होते आणि साधी मजुरी करायचे त्याच्यात जो काही पैसा मिळायचा किंवा मजुरीच्या बदल्यात धान्य मिळायचं त्याने  त्यांचं घर चालायचं. नलिनी चे पालक  जरी अडाणी असले तरीदेखील 'मुलगा असता तर '  हा विचार मनात आणला नाही. तसे ते थोडेसे आधुनिक विचारांचाच म्हणायचे ना!  त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं पण आपल्या मुलीने शिकून खूप मोठं व्हावं,  आपल्यासारख मजुरी करावी लागू नये आणि चांगला तिने आपला संसार करावा आणि पुढील आयुष्य जगावं,  असाच ते दोघेही नेहमी विचार करीत असत.  नलिनीला इतका भरभरून प्रेम आपल्या आईवडिलांकडून मिळत होतं की इतर कुठल्या मैत्रिणीची तिला फार कधी गरज पडली नाही.  सगळं काही आई-वडिलांना सांगायचं आणि कोड कौतुक करून घ्यायचं तसंच त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकायची अशा रीतीने तिचं आयुष्य छान चाललं   होतं.

 अभ्यासात सुरुवातीला नलिनी फार काही हुशार नव्हती पण मेहनती मात्र भरपूर होती. गावातल्याच छोट्या शाळेत नलिनी जात होती आणि तिथे चौथीपर्यंतचे शिक्षण तिने घेतलं.  नंतर अजून दुसऱ्या गावी जाऊन सातवीपर्यंतचे शिक्षण घेतलं आणि अजून पुढे तालुक्याच्या गावी जाऊन तिने दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. तिच्या मेहनतीने तिला चांगले मार्क मिळाले होते आणि तिने पुढे शिकावं असे तिच्या शिक्षकांनी तिच्या आईवडिलांना सांगितले तेव्हा  मुलीला पुढे शिकवायचं पण पैसा लागेल कसं करणार हा विचार आला.  तरीदेखील त्यांनी हार मानली नाही. आपल्या मुलीचं भवितव्य उज्वल होण्यासाठी त्यांनी आपल्याकडे असेल नसेल ते दागिने आणि पैसा-अडका खर्चून तालुक्याच्या ठिकाणी तिचं कॉलेजात नाव घातलं आणि यथावकाश आपल्या मेहनतीने आणि हुशारीने नलिनी ग्रॅज्युएट झाली.

 

ज्या कॉलेजात नलिनी शिकली तिथल्याच मुख्याध्यापकांनी तिची मेहनती वृत्ती बघून आणि  घरची परिस्थिती समजून घेऊन तिला तिथेच नोकरी करण्यासाठी रुजू करून घेतलं.  नलीनीचा आणि आई-वडिलांचाही  आनंद गगनात मावेनासा झाला.  पहिल्यांदा त्यांच्या घराण्यात कोणीतरी नोकरी करून म्हणजे शिक्षणानंतर ची नोकरी करून पैसे कमावून घरात आणणार होतं. त्यांच्या समाजात मुली फार शिकत नव्हत्या त्यावेळी पण तरीदेखील नलिनीच्या  आई-वडिलांनी  त्यामानाने खूपच धाडसी निर्णय घेतला होता.  नलिनी रोज सायकल वर तालुक्याच्या ठिकाणी जाऊ लागली.

 

ज्या कॉलेजात नलिनी शिकली तिथल्याच मुख्याध्यापकांनी तिची मेहनती वृत्ती बघून आणि  घरची परिस्थिती समजून घेऊन तिला तिथेच नोकरी करण्यासाठी रुजू करून घेतलं.  नलीनीचा आणि आई-वडिलांचाही  आनंद गगनात मावेनासा झाला.  पहिल्यांदा त्यांच्या घराण्यात कोणीतरी नोकरी करून म्हणजे शिक्षणानंतर ची नोकरी करून पैसे कमावून घरात आणणार होतं. त्यांच्या समाजात मुली फार शिकत नव्हत्या त्यावेळी पण तरीदेखील नलिनीच्या  आई-वडिलांनी  त्यामानाने खूपच धाडसी निर्णय घेतला होता.  नलिनी रोज सायकल वर तालुक्याच्या ठिकाणी जाऊ लागली.

 

ज्या समाजात मुलांचच पदवीपर्यंत शिक्षण घेण्याची मारामार, त्या समाजात एक मुलगी पदवीपर्यंतचे शिक्षण घेते आणि आता तालुक्याच्या ठिकाणी नोकरीही करते ही बातमी आजूबाजूच्या पंचक्रोशीत पसरली. त्या गावच्या सरपंचांनी इतर  गावच्या सरपंच यांनाही बोलावून नलिनी चा सत्कार केला आणि असंच मुलींनी शिकावे व पुढे जावे व आपल्या आईवडिलांची मान अभिमानाने उंच करावी याकरिता तिला प्रोत्साहन दिले.  नलिनीला जणू गगन ठेंगणं झालं होतं. खूप आनंदात होती. त्या समारंभाला बाजूच्या गावातील आलेल्या एका  होतकरू तरुणाशी तिची भेट झाली. तो अभिनंदन करायला आला पण ती फार काही बोलू शकली नाही, कारण एवढ्या उघडपणे आणि बिनधास्तपणे मुलांशी बोलण्याइतपत नंदिनीची भीड अजून चेपली नव्हती. तिला अजून बरंच काही शिकायचं होतं. आपल काम आणि आपले आई-वडील आपलं घर एवढ्या गोष्टींमध्ये गुंतून असायची.

 

 त्या तरुणाने नलिनीच्या आई-वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि सरळ जाऊन नलिनी चा हात मागितला.  नलिनी सारखी मुलगी माझी जिवनसाथी म्हणुन मला खूप आवडेल, पण तिलाही मी पसंत आहे का आणि तिलाही हा प्रस्ताव मान्य आहे का हे तुम्ही एकदा तिला विचारा आणि मग मगच पुढे जाऊ. नलिनी हे ऐकतच होती आणि ती चपापली.  तसा तो तरुण नाकीडोळी छान होता पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो शिकलेला होता.  अत्यंत नम्रपणे तो नलिनीच्या आई-वडिलांशी बोलत होता आणि ही गोष्ट नलिनीला खूप भावली. नलिनी शी बोलल्यानंतर जेव्हा नलिनी चा कल आईवडिलांच्या लक्षात आला तेव्हा पुढे बोलणे झाले आणि त्या तरुणाचे, ज्याचे नाव आनंद होते त्याचे आणि नलिनी चे साध्या पद्धतीने पण छान लग्न झाले. आनंद चे आई  वडील त्याच्या लहानपणीच वारले होते त्यामुळे नलीनीने काही बोलायच्या आतच आनंदने  तिला वचन दिले की तुझ्या आई-वडिलांचा सांभाळ आपण दोघे मिळून  करूया.  ह्या आनंदच्या बोलण्यामुळे  नलिनी चा जीव भांड्यात पडला होता कारण तिच्या आई-वडिलांना तिच्या शिवाय दुसरं  कुठलं  अपत्य नव्हतं आणि माझ्या माघारी माझ्या आई-वडिलांची काळजी कोण घेईल ही थोडीशी काळजी तिला होती पण आता तीही मिटली होती.

आनंदनेही ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते आणि तोही एका चांगल्या ठिकाणी नोकरीला होता. नलिनी आणि आनंद आता दुसऱ्या गावी राहू लागले आणि नलिनीचे आई-वडिल मात्र त्याच गावात होते.  पण दोन्ही गावे अगदी जवळ जवळ असल्यामुळे आई-वडिलांकडे दोघांनाही लक्ष देता येत होते.  आता आई-वडील खूप थकले होते कारण आयुष्यभर खूप शारीरिक कष्ट झाले होते.  शेवटी आनंदाने निर्णय घेतला की आई-वडिलांना आपल्या सोबत आपल्या घरी घेऊन जायचे जेणेकरून त्यांच्यासोबत आपल्याला राहता येईल आणि त्यांनाही आपली सोबत होईल.  आता त्यांचं एक छान चौकोनी कुटुंब तयार झालं होतं.

तशातच नलीनीच्या आयुष्यात एक दुःखद घटना घडली. दिवस गेलेलं असताना ती पाय घसरून पडली आणि तिचं बाळ गेलं. डॉक्टरांनी ती पुन्हा आई होऊ शकणार नाही, असा रिपोर्ट दिला. खूप खूप दुःख झालं सगळ्यांनाच, पण नलिनी खूप उदासवाणी राहू लागली. तिला बाळ हवं होतं पण, विचार करूनच तिला रडू यायचं. एके दिवशी अशीच आनंद सोबत जात असताना तिला रस्त्याच्या कडेला जे शेत असत तिथून लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. आनंद ला थांबायला सांगून ती आवाजाच्या दिशेने गेली आणि फडक्यात गुंडाळलेलं बाळ बघून अवाक झाली. कुणी बर या बाळाला इथे टाकलं असेल. त्याला उचलून बराच वेळ त्या दोघांनी वाट पहिली पण कुणीच आलं नाही. शेवटी त्या बाळाला घेऊन ती दोघे घरी आली.

 

बाळ घरात बघून सर्वानांच आनंद होत होता पण काळजी हि वाटत होती कि याचे जन्मदाते कोण असतील व आले परत घ्यायला तर बाळाचा लागलेला लळा आपल्याला त्रासदायक होईल. असे बरेच महिने निघून गेले पण कुणीच आलं नाही. आता ते बाळ त्यांचाच झाल्यासारखं झालेलं. गावकर्यांनी विचारलं तेव्हा दोघांनी खार प्रामाणिकपणे सांगितलं होत. अशातच एकदा आनंद नलिनीचे मुंबई ला येणे झाले आणि परतताना एक छोटी मुलगी त्यांच्या मागे मागे बराच वेळ चालत राहिली. शेवटी न राहवून नलिनीने तिला विचारलं तर ती गळ्यात पडून खूप रडली आणि चक्क तिला आई म्हणाली. त्या दोघांना काही सुचेना. तिला सोबत घेऊन ते बराच वेळ त्या ठिकाणी थांबले पण तिला घ्यायला कुणीच आले नाही. शेवटी तिला घेऊन ते मुंबईत कामासाठी २ दिवस राहिले आणि आपल्या गावी परत आहे. आधीच सापडलेलं बाळ - कुमार नाव ठेवलं होती, आता चांगलं ३ वर्षांचं झालं होतं आणि ही मुलगी ५ वर्षांची. नलिनी या दोन्ही घटनांचा जेव्हा विचार करू लागली तेव्हा तिच्या मनाने वेगळाच ठाव घेतला. या अशा बेवारस, सोडून टाकून दिलेल्या बाळांची आई म्हणून तर परमेश्वराने माझी निवड केली आहे आणि हे माझे आता जिवीत कार्य असावे असा कदाचित त्या विधात्याचा डाव असावा. मला बाळ हवं असण्याची इच्छा तो अशा प्रकारे पूर्ण करतोय का? या बाळांच्या उज्वल भवितव्याची निर्मिती हि माझ्याच हातून त्याला करवून घ्यायची आहे बहुदा. जशी तुझी इच्छा नियंत्या, असे म्हणून ती शांत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी आनंद शी मनातले हे बोलून दाखवले आणि त्याला ही अचंबा वाटला. अशा असहाय बेवारस मुलानं सांभाळण्यासाठी आपण काम सुरु करूया, त्यांचेच आई वडील बनूया. आपण जरी एक बाळ निर्माण करू शकलो नाही तर या मुलांच्या जीवनाची पुनर्निर्मिती आपण नक्कीच करू शकतो हा विश्वास नलीनीला होता आणि आनंदने हि पाठिंबा दिला. 

 

मग काय, झाली कामाला सुरुवात. त्या दोघांच्या मित्रपरिवारानेही साथ दिली. स्वतःच्या जागेत ४ खोल्या बांधून त्यात ह्या मुलांचे संगोपन आणि शिक्षण सुरु झाले. संस्थेचे नाव ठरले 'अंकुर'. संस्थेचे कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणाहून अशी बेवारस मुले गोळा केली आणि संस्थेत भरती केली. आताशा बऱ्याच ठिकाणी संस्थेची माहिती गेल्यामुळे इतर लोक हि अशा लहान मुलांना नलीनीकडे आणून देत. तिने लावलेलं छोटासा रोपटं आता खूप मोठं होऊन त्याचं  वटवृक्षात रूपांतर झालं होत. मुले शिक्षणात आणि इतर गोष्टींमध्ये रस घेऊन मोठी होत होती. काही मुले उच्च शिक्षणासाठी परदेशी देखील जाऊन आली  होती. त्या सर्वांची माय एकाच - नलिनी. इतक्या चांगल्या कामासाठी समाजाच्या विविध स्तरांतून नलीनीला मदतच मिळत गेली.

वयोपरत्वे तिचे आई वडील जग सोडून गेले. ती आणि आनंद हि आता थकत चालले होते आणि एके दिवशी आनंद हि तिची साथ सोडून निघून गेला तो कायमचाच. आता नलिनी आणि तिची नवनवीन भरती होणारी मुले, हेच जीवन झालं होत. उच्च शिक्षण घेऊन भरपूर पैसे कमावणारी नलिनीची अनेक मुले आता त्या संस्थेची धुरा वाहत होते.

आज ८० वय पूर्ण होताना तिच्या मनात एकच विचार येऊन गेला की या अनाथ बेवाराशी मुलांना सांभाळण्याच्या विचारच बीज आपल्या मनात पेरला गेलं नसत त्या नियतीकडून तर आज या अनेक भक्कम वृक्षांची निर्मिती झाली नसती. काय गंमत आहे नाही, एक बीज अनेक रोपं निर्मीतो आणि अनंत अस्तित्वाचं दर्शन घडवतो. आपल्याही बाबतीत असच काहीतरी घडलं आणि परमेश्वराने माझा जन्म सार्थकी लावला, या मनातील स्पंदनानी आपल्या लेकरांकडे मायेच्या नजरेने बघण्यात नलिनी हरवून गेली!!!

Comments

  1. खुपच छान, डोळ्यात पाणी उभं राहिलं.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य