तिसरी दुर्गा- कनिका

 *तिसरी दुर्गा- कनिका*

नवरात्र....नऊ दिवस.....नऊ कथा.....

                  ---- शुभदा जगताप

 

आज नवरात्रीची तिसरी माळ! या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते.  चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला वर्तमान क्षणात घेऊन येतो. मनाची  दोलायमान स्थिती एका जागी स्थिर झाली की मग आपली सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात.  आपण एका कुठल्यातरी गोष्टीवर निश्‍चितपणे लक्ष केंद्रित करू शकतो आणि हे गुण वाढीस लागले की व्यक्तिमत्व आकर्षक बनते.  आजच्या माझ्या कथेची नायिका जी आहे तिचं नाव आहे कनिका आणि तिचे गुणधर्म हे देवीच्या आजच्या रूपाच्या  गुणधर्मांशी साधर्म्य राखणारे!

 

तिसरी दुर्गा- कनिका

 

खूप वर्षांनी कनिका भारतात परत आली होती.  अर्थात एक महिन्याकरिताच.  गेली दहा वर्षे ती परदेशी स्थायिक आहे.  तिच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या  चार मैत्रिणींच्या ग्रुप वर ती येणार आहे  असं तिने सांगितलं.  त्या पाच जणींचा तो व्हाट्सअप ग्रुप खूप खास होता.  सगळ्याजणी सगळं काही अगदी न लपवता एकमेकींना सांगत! कधीकधी घरातल्या कटकटी किंवा बाहेरच्या  एखाद्या  अप्रिय घटनेचा राग व चिडचिड काढण्याची व मन हलकं करण्याची त्यांची ती हक्काची जागा! आभासी  प्लॅटफॉर्म ! आज त्या  पाचही जणी  पाच वेगवेगळ्या ठिकाणी. पण या एका आभासी जागे (virtual space )  ने एकमेकांशी अजूनही संपर्कात होत्या.

यांच्यामधली  शरण्या  सर्वात जास्त एक्टिव, म्हणजे काही भेटण्याचे बेत ठरविण्यात सगळ्यात पुढे! खूप वर्षे झाली  त्या सगळ्याजणी एकत्र भेटल्या नव्हत्या. त्यामुळे घराबाहेर कुठेतरी दोन दिवस राहून एकत्र खुप गप्पा मारायच्या असे ठरले.  सगळ्या तयार झाल्या शरण्याने संपूर्ण बेत बनवलापण ऐन वेळी नक्कीच कोणीतरी टांग मारेल याची तिला खात्री होती.  कनिका भारतात येऊन आता एक आठवडा झालेला .  ग्रुप वर रोज भरपूर गप्पा-टप्पा व्हायच्या  आणि भेटण्याचा बेत व  त्याबद्दल जशी चर्चा निघाली तसं  मात्र अचानक शांतता पसरली.  काही ना काही 'अतिमहत्त्वाचं' (?) कारण देऊन प्रत्येकीने पाय मागे घेतला.  हे होणारच होतं म्हणा, कारण सगळ्याच जणी घर संसार यात गुंतलेल्या. आता राहिल्या फक्त कनिका आणि शरण्या.   

 

मग शरण्याने कनिकाला सरळ फोनच केला आणि मग फोनवर त्या दोघींचं असं  एकमत असं झालं की त्या तिघी आल्या नाही तरी चालेल पण आपण दोघी नक्की म्हणजे नक्की भेटायचं. कारण त्यांच्या  बेतानुसार पुढील चार दिवसात त्यांना भेटायचं होतं आणि दोघांनाही एकमेकांना भेटण्याची खूप ओढ  लागली होती . तसं तर कनिकाला  प्रत्येकीलाच भेटायचं होतं परंतु त्यात कुणालाही आता जबरदस्ती करता येणार नव्हतं.  प्रत्येकीने कारण सांगितलं आणि अक्षरश: मनापासून माफी मागितली.  पण ठीक आहे इतक्या वर्षांनी भारतात आल्यानंतर निदान एका तरी मैत्रिणीला भेटणं होईल तिच्याशी गप्पा मारणं होईल अशा विचाराने तिने व शरण्याने भेटण्याचं ठरवलं.

 

फोनवरच्या बोलल्यानंतर शरण्या सहजच कॉलेजच्या दिवसांमध्ये हरवली  आणि विचार करू लागली की आपण पाच जणी कशा होतो? कशा अगदी बावळटासारख्या  राहायचो. कपडे कसे घालावे, फॅशन काय करावी किंवा लेक्चर बंक करून बाहेर हिंडाव  हे काही त्यांच्या खिजगणतीतही नव्हतं.  फक्त कॉलेजला अगदी नित्यनेमाने जायचं, अभ्यास करायचा ते पण फर्स्ट बेंचवर बसूनवेळेत सगळे असाइनमेंट पूर्ण करायच्या आणि अभ्यासाच्या आणि परीक्षेचे टेन्शन खाली  स्वतःला इतकं काही दाबून घ्यायचं की दुसरीकडे बघायची  काही  सोयच उरायची नाही. त्या पाचही जणी  अगदी साध्या कुटुंबातल्या आणि सर्वसाधारण चारचौघींसारख्या दिसणाऱ्या.  आपलं  घर आपले आईवडील आपलं  कॉलेज आपला अभ्यास व  परीक्षा यापलीकडे त्यांना दुसरं काही ठाऊकच नव्हतं. हे सगळं आठवत असताना शरण्याला  हे आठवलं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सगळ्याजणी कशा नोकरी कधी मिळेल या चिंतेत होत्या आणि एकेक करून सगळ्यांना नोकऱ्या मिळाल्या. सर्वात पहिले नोकरी मिळाली ती कनिकाला. आणि सर्वात शेवटी नोकरी मिळाली ती शरण्याला.  त्या दोघांची मैत्री मात्र गाढ होती.  तसं म्हणायला गेलं तर त्या पाचही जणी  एकमेकांशी खूप नाजूक धाग्याने  बांधलेल्या होत्या. हे सगळे आठवत असताना शरण्याला हेही आठवलं की एकदा ऑफिसहून घरी येताना तिची आणि कनिकाची रेल्वे स्टेशनवर भेट झाली होती आणि तिचे डोळे तेव्हा पाण्याने डबडबले होते चेहरा पूर्ण पडलेला होता आणि ती काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती.  खूप  विचारून देखील कनिका काहीच बोलली  नाही फक्त थोडावेळ माझ्यासोबत बस म्हणून एका बागेत दोघीजणी बसल्या होत्या आणि तिथून थोड्या वेळाने कनिका आपल्या घरी निघून गेली होती.  त्यानंतर बरेच दिवस दोघींचे  काही बोलणे झाले नाही आणि अचानक एके दिवशी कनिका चा फोन आला आणि तिने सांगितलं की मी परदेशी जात आहे कारण मला परदेशातून नोकरीची खूप चांगली ऑफर आली आहे. कनिका जाण्याआधी सगळ्याजणींनी भेटून एकदा मस्त पार्टी केली होती आणि कनिका ला निरोप दिला होता.  कनिका पूर्ण दोन  वर्षांनी परत येणार होती तशी ती आलीही परंतु सगळ्या पुन्हा  एकमेकींना भेटू शकलय  नाही.  फोनवरच काय ते बोलणे झाले.  आणि   कनिकाने सांगितले की माझे लग्न जमले आहे.

 

हे सगळे आठवत असताना शरण्या त्या विचारांमध्ये खूप गढून गेली होती आणि भेटीची  वाट बघत आणि विचार करत होती की  इतक्या वर्षानंतर कनिका कशी दिसत असेल? तसे  तर तिचे फोटो फेसबुक वर बघत होते म्हणा पण तरीही प्रत्यक्षात बघणं  भेटणं आणि ते डोळ्यात डोळे घालून मैत्रिणींशी बोलणं यात फरक असतो. असा विचार सुरू असतानाच कनिका आली आणि शरण्या क्षणभर अवाकच झाली.  कारण माझी ती कॉलेजमधली साधीभोळी आणि अतिशय सर्वसामान्य दिसणारी अशी ही कनिका नाहीच असं  तिला वाटलं  पण समोर कनिकाच  उभी होती.  डोळे मात्र तेच होते.  दोघींची कडकडून  गळाभेट झाली आणि गाडीमध्ये बसून  आपल्या इच्छित स्थळी त्या  येऊन पोहोचल्या.  हिल स्टेशनला एका  चांगल्या हॉटेलमध्ये रुम बुक केली होती आणि दोघींनी आपापल्या बॅगा टाकून मस्तपैकी बेडवर आडव्या  झाल्या .  थोडा वेळ तसच शांत पडून राहिल्या.  बोलण्याची काही गरज वाटत  नव्हती फक्त सहवास हवा होता प्रिय संख्यांचा! पण शरण्याला असं वाटत होतं की कधी एकदा कनिकाशी बोलते आणि काय काय विचारते आणि काय काय सांगते.

 

पण शरण्या स्वतः काही बोलायला सुरुवात करणार त्याआधीच कनिका ने बोलायला सुरुवात केली. -

तुला आठवतंय शरण्याएकदा रेल्वे स्टेशन वर आपण दोघी  भेटलो तेव्हा मी रडत होते आणि तू  कितीही विचारलं तरी मी काहीच बोलले नाही.  तेव्हापासून नेहमी  मनात यायचं की मी  बोलायला हवं होतं कारण तु मला  काळजीने विचारलं होतं. म्हणून यावेळी ठरवूनच  आली होती की तेव्हापासूनच आत्तापर्यंतच्या सगळ्या जीवनप्रवासाचा पाढा  तुझ्यासमोर वाचायचा.

 

 जॉब करत असताना माझ्या कलीग  सोबत माझं खूप चांगले ट्युनिंग  जुळलं  होतं आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. लग्नही करायचं ठरवलं होतं पण त्याची इच्छा होती की आधी परदेशात जायचं.  आम्ही दोघेही आटी मध्ये  असल्यामुळे परदेशाचं आकर्षण खूप होतं कारण तिथे भरपूर चांगली नोकरी आणि तेवढाच मोठा पगार मिळत होता. परदेशवारी कधी कोणी सोडत काम्हणून मी त्याला सपोर्ट केला आणि त्याला संधी चालून आली. तो अमेरिकेत गेला आणि मी मात्र इकडे त्याची  कायम सारखी वाट बघत असायचे.  त्याच्या फोनची त्याच्या ई-मेलची.  पण हळूहळू माझ्या लक्षात येत गेलं की त्याचा  माझ्या मधला इंटरेस्ट कमी होत चालला आहे आणि कदाचित तो दुसऱ्या कुणाच्या तरी प्रेमात पडला असावा.  माझा अंदाज खरा ठरला आणि एके दिवशी आम्ही व्हिडिओ कॉल वर एकमेकांशी बोलत असताना मी हा विषय काढला तेव्हा त्याने  शेवटी मला सांगितलं की माझ्याकडे तो फक्त आकर्षित झाला होता या कारणाने की मीही त्याच्या सारखच भरपूर पैसे कमावणारी आहे आणि कधी ना कधी मी अमेरिकेत किंवा परदेशी येईन.  पण मला काही लवकर बाहेर संधी मिळाली नाही आणि तेवढ्या वेळात त्याने दुसऱ्या कोणाला तरी आपल्याकडे आकर्षित करून घेतलं होतं. आता त्याला माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट उरला नव्हता.  म्हणजे तो सरळ सरळ बोलायला घाबरत होता पण मी हे कळून चुकले की प्रेमबिम काही नव्हतं! मी वेड्यासारखी  त्याच्यावर प्रेम करत होते. त्याक्षणी माझं हृदय खूप फाटलं आणि खुप खुप खुप रडावसं वाटलं.  पण रडणार कशी सायबर कॅफेमध्ये बसूनम्हणून तिथून तडक निघाले तर नेमकी तू समोर आलीस.  माझा अवतार बघून तुझ्या लक्षात आलं होतं आणि तू विचारलं ही होतंस, पण मला काहीच काहीच सांगण्याची इच्छा होत नव्हती .  फक्त तुला जवळ बसवून  घेऊन मी स्वतःला शांत केलं आणि मग घरी निघून गेले,. त्यानंतर माझी अवस्था खूप वाईट झाली होती कारण माझं मन माझ्या ताब्यात राहील नव्हतं. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं होतं की एखादी व्यक्ती अशी प्रतारणा कशी करू शकते आणि तेही माझ्यासारख्या साध्या सरळ प्रामाणिक मुलीसोबत? माझं मन  काही स्वीकारायला तयार होत नव्हतं आणि त्या गोष्टीचा माझ्या मानसिक आरोग्यावर खूप जास्त परिणाम झाला.  मी आतून खंगत चालले होते.  ऑफिसला जात होते पण कामात लक्ष लागत नव्हतं त्यामुळे हातून चुका ही घडत होत्या. माझ्यासारख्य   कामामध्ये हुशार असणाऱ्या मुलीकडून अशा चुका होणे माझ्या टीम लीडरला काही खपत नव्हतं.  आमच्या  टीम लीडर ह्या  एक खूप चांगल्या मैत्रिणी सारख्या आम्हा सर्वांसोबत असायच्या.  शेवटी त्यांनी एकदा ऑफिस सुटल्यावर मला थांबवून घेतलं आणि आपल्या केबिनमध्ये बसून माझ्याशी संवाद साधला.  मी त्यांच्यासमोर बसून ढसाढसा रडले आणि सगळं काही त्यांना खरं खरं सांगितलं कारण त्या मला माझ्या मोठ्या बहिणी सारख्या वाटायच्या. त्या खूप समजूतदार होत्या. त्यांनीही त्यांच्या आयुष्यात खूप टक्केटोणपे खाल्ले होते आणि तरीही त्या  अतिशय शांत आणि समाधानी असायच्या.  त्यांच्यासमोर रडल्यानंतर मला खूप हलकं वाटलं आणि मोठ्या आशेने मी त्यांच्याकडे बघू लागले त्यावेळी त्यांनी मला जे काही सांगितलं ते माझ्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं.

 

त्या म्हणाल्या अगं असा आयुष्याचा डेड एन्ड आल्यासारख काय वागतेसअजून तू किती तरुण आहेसअजून तुला कितीतरी मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आहेत आयुष्यात. मुळात तुझं प्रेम खरं होतं तू मनापासून प्रेम केलं आणि समोरच्याने प्रतारणा केली.  आयुष्यात सगळे चांगले घडेल असं नाहीच ना!  वाईटही  घडतच आणि ते स्वीकारण्याची आपल्या मनाची तयारी असली पाहिजे.  शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य हे तितकच किंबहुना खूप जास्त महत्त्वाचं असतं. कनिका मी तुझ्या मध्ये नेहमी एक लीडर बघते. पुढे होऊन तू खूप चांगल्या प्रकारे तुझे करिअर वर नेशील आणि एका मोठ्या पदाला जाऊन पोहोचशील  असा माझा कयास आहे , नव्हे  मला तो विश्वासच आहे.  आणि ह्या अशा एका कारणामुळे आयुष्यातल्या एका घटनेमुळे तू अस पूर्णपणे कोसळून जाणं मला मान्य नाही. अगं हे असेच प्रसंग आपल्याला आयुष्यात खूप काही शिकवून जातात.  यातून आपण काय शिकायचं ते आपलं  आपणच ठरवायचं आणि स्वतःला पुन्हा खोल निराशेच्या गर्तेत ढकलायचं की ह्या संधीचा फायदा घेऊन मनाने अधिक मजबूत होऊन अधिकाधिक उंची  गाठायची हे मात्र तुझ्या हातात आहे. मी मात्र तुझ्या बाबतीत खूप आशा लावून बसले होते आणि तुला उत्तुंग भरारी मारताना  मला बघायचे आहे.  बघ निर्णय तुझ्या हातात, असे म्हणून त्या थांबल्या.

 

 आणि मी काहीतरी गवसल्यासारखं त्यांच्या केबिनमधून निघाले आणि त्याच अवस्थेत घरी येऊन पोहोचले.  रात्रभर खूप विचार केला आणि आणि खरच एका क्षणी जाणवलं की त्या एका घटनेमुळे मी स्वतःला किती त्रास करून घेत होते.  माझं प्रेम तर खरच होतं  ना मग त्या बाबतीत मला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे आणि लख्ख प्रकाश डोक्यात पडला. त्या क्षणाला ठरवलं की आजपासून भूतकाळात उगाचच गुंतत  बसायचं नाही पण उज्वल भविष्याकडे आपले डोळे लावायचेत्यासाठी भरपूर मेहनत करायची.  चांगल्या चांगल्या गोष्टींचा विचार करायचा, अतिशय सकारात्मक रहायचं आणि रोज आपल्या मनाची मशागत करायची, त्यानुसार मी सर्वात प्रथम काय केलं असेल तर तो योगा अभ्यास सुरू केला. कारण शारीरिक स्वास्थ्याकडे आपण लक्ष देतो पण मनाच्या स्वास्थ्याचं  काहीच मनावर घेत नाही.   हे मला कळून चुकलं होतं की माझं मन सुदृढ आणि निरोगी झालं तर मी कुठलीही गोष्ट प्राप्त करु शकते, कुठलीही गोष्ट माझ्या जीवनात असाध्य म्हणून राहणार नाही आणि हेही मला कळत होतं की जेवढी मी मन एकाग्र  करत असेलमाझ्या पर्सनल आणि प्रोफेशनल या दोन्ही जीवनामध्येतेवढेच माझ्यामध्ये सजगता आणि खंबीरपणा यांचे गुण वाढीस लागतील.  माझ्या मनाची आकर्षकता वाढेल आणि  त्याचा परिणाम मला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येईल.  माझे व्यक्तिमत्व इतके आकर्षक होईल की माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा एक जोडीदार मला नक्कीच भेटेल या खात्रीसह मी ज्या जोमाने कामाला लागले, त्यानंतरची सगळी  प्रगती तुला तर ठाऊकच आहे.  पुढील वर्षभरातच मला परदेशातील एका मोठ्या कंपनीचा कॉल आला आणि अतिशय लठ्ठ पगाराची नोकरी मला मिळाली.  मी तिकडे गेले आणि माझ्या मेहनतीने आणि हुशारीने लवकरच मी खूप वरच्या पोस्ट वर गेले. तुला माहिती आज माझी  पोस्ट काय आहेआज मी त्या कंपनीची  सीईओ आहे. हे सगळं करत असताना माझ्यामध्ये जो काही आत्मविश्वास निर्माण झाला तो माझ्या व्यक्तिमत्वात दिसू लागला आणि मी पूर्वीपेक्षा खूप आकर्षक झाले.  माझी बुद्धिमत्ता तर होतीच, पण  हुशारी व मेहनतही होती.  पण आताशा मी खूप सजग खंबीर अशा व्यक्तिमत्त्वाची  मालकीण झाली. याचा व्हायचा तो परिणाम म्हणजे माझा एक कलीग  माझ्या प्रेमात पडला.  सुरुवातीपासूनच त्याला मी खूप आवडायचे पण त्याने कधी हिंमत केली नाही. पण जसजसे आम्ही एका प्रोजेक्टवर काम करू लागलो तसं आम्हाला एकमेकांचा सहवास लाभला आणि त्याच्या खूप काही चांगल्या गोष्टी मला कळत गेल्या.  मी जरा फटकूनच  वागत होते कारण भूतकाळात घडलेल्या त्या  घटनेने पुन्हा कशाला त्या वाटेला जायचं असं  माझं  मन मला सांगे. पण माझ्या टीम लीडर ते शब्द नेहमी मला ऐकू यायचे  आणि पुढे चालतच राहिले पाहिजे याची आठवण करून देत. तुला आठवतं परदेशातून एकदा तिकडे आल्यानंतर मी डायरेक्ट फोन करून सांगितलं होतं की माझं लग्न जमलं आहे.  तुम्ही कोणीही माझ्या लग्नाला येऊ शकले नाही पण खूप थाटामाटात माझं लग्न झालं.  आज आम्ही दोघं परदेशातच स्थायिक आहोत.  आम्हाला एक छानशी मुलगी आहे आणि आम्ही दोघेही मोठ्या पदावर कंपनीत काम करत आहोत.  पैशांची कमतरता नाही पण म्हणून आम्ही उगाच आमची लाइफस्टाइल उंचावून ठेवलेली  नाहीये.

 

मला तुला एक सांगायचं होतं जे मी खूप दिवसांपासून सांगण्याचा प्रयत्न करतेय.  मी तिथे माझ्या जोडीदारासोबत एक 'उडान' नावाची संस्था सुरु केली आहे. ती अशा मुला मुलींसाठी की ज्यांना  आयुष्यात घडलेल्या काही एका प्रसंगामुळे नैराश्य आलेले आहे.  डिप्रेशन नावाचा एक रोग आहे तुला माहिती असेलच! त्यामध्ये अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होतात. मी स्वतः त्या अशा एका प्रसंगांमधून गेले आणि त्याचे काय परिणाम होतात हे मला चांगले ठाऊक आहे.  म्हणून मी तेव्हाच मनाशी पक्क केलं होतं की जेव्हा खूप पैसा कमावून स्टेबल होईल तेव्हा नक्कीच मी अशी एक संस्था सुरु करीन जिथे अशा मुलींना मुलांना मी मदतीचा हात देऊ शकेन.  आज आमच्या उडान संस्थेत मी आणि माझा जोडीदार आणि आमचे काही मित्र मैत्रिणी आम्ही सगळेजण अशा मुला मुलींसाठी काम करत आहोत आणि त्याचा रिझल्ट आम्हाला दिसत आहे. आमच्या संस्थेत  आलेले बरेच मुलं मुली केवळ संवाद आणि पॉझिटिव्ह थिंकिंग च्या थेरपींमुळे त्या डिप्रेशन मधून बाहेर येऊन आज त्यांचे जीवन साधारणपणे जगत आहेत.  माझ्या टीम लीडरने मला त्यावेळी सुनावले नसतं आणि मनाची दोलायमान स्थिती एका जागी स्थिर करून पुढे चालण्याचा सल्ला दिला नसता तर माझी काय अवस्था झाली असती हे मला आज कल्पनाही करवत नाही. असं म्हणून कनिका थांबली आणि शांतपणे निपचित पडून राहिली. 

शरण्याला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं न विचारता मिळाली होती. माझी अगदी साधारण दिसणारी साधी भोळी सरळ मैत्रिण आज इतकी  का आकर्षक दिसते आहेतिचं व्यक्तिमत्त्व इतकं कसं काय फुलून आलं  आहे याचा शोध शरण्याला लागला होता  आणि तिच्या त्या सुंदर आकर्षक आकृतीकडे  बघत तीही शांत निपचित पडून राहिली!!

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य