दुसरी दुर्गा - नंदिनी

 नवरात्र....नऊ दिवस.....नऊ कथा.....

                          ---- शुभदा जगताप

 

आज नवरात्रीचा दुसरा दिवस. दुर्गेच्या नऊ रूपांपैकी दुसरे रूप हे ब्रह्मचारिणी असं समजलं जातं. अनंताचा अनुभव ती घेते कशामध्ये तर ज्योती स्वरूप. हे शरीर शरीर नाही पण ज्योती स्वरूप आहे या विचारांनी ही ब्रह्मचारिणी शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनते. ह्याच गुणधर्मांशी साधर्म्य असणाऱ्या स्त्रीचं कथानक आहे आज माझी दुसरी कथा - नंदिनी.

 

दुसरी दुर्गा - नंदिनी

 (१८/१०/२०२०)


तिने आज शेवटचा सुस्कारा सोडला.  नाही, आता यापुढे कुठल्याही अपेक्षेने धावणे नाही, आपणच आपल्यासाठी आनंद शोधायचा आणि इतरांनाही तो द्यायचा या ठाम निश्चयाने तिने एकदा शेवटचं आईचं निपचित पडलेलं कलेवर डोळाभरून बघितलं आणि चुलत भावाला तिला कायमच्या प्रवासाला नेऊ देण्यास मान हलवली.  हो आज तिची एकमेव साथी आई, तीही तिला सोडून गेली होती-  अनंताच्या प्रवासाला!

 

आई गेली तसे घरातले सांत्वनासाठी आलेले सगळे  परतले. हळूहळू जवळच्या नातेवाईकांमधल्या स्त्रिया आणि पुरुषही निघून गेले.  आता तीन दिवसानंतर ती त्या मोठ्या घरात एकटीच होती. सर्वांसमोर मोठ्या धैर्याने ती वागली वावरली पण आता घरात कोणीही नसताना भिंतीकडे बघून मात्र तिचा बांध फुटला आणि ढसाढसा एकदाच तिने रडून घेतल.  आई निघून गेल्यामुळे निर्माण झालेली पोकळी नंदिनीला आज नव्याने जाणवत होती.  सर्वांसमोर ती रडली नाही पण रडू तर येतच ना. कितीही धीर गंभीर आणि सामर्थ्यशाली असली तरी नंदिनी पण एक स्त्री होती;  रडू तिला आवरलं नाही.  खूप मनसोक्त तिने रडून घेतलं, अगदी डोक्याखालची  उशी पुर्ण ओली होईपर्यंत. रडून मन भरलं तेव्हाच ती थांबली. ऐकायला होतं तरी कोण? सगळ्या भिंती आणि मनातल्या आईच्या आठवणी. पुढे किती मोठं  आयुष्य आहे, ते जगलच पाहिजे पुढे जातच राहिले पाहिजे हे तिला ठाऊक होतं, फक्त पाय जड झाले होते. काय करणार त्या मनाला ही समजूत घातली पाहिजे हे तिला कळत होतं.  शेवटी उठून बसली, डोळे पुसले आणि एकटक शून्यात बघत बसली.  असा बराच वेळ गेल्यानंतर नंदिनी उठून आरशासमोर जाऊन उभी राहिली.  स्वतःचा अवतार बघून तिच तिलाच वाईट वाटलं.  आज आई असती तर तिने नक्की हटकलं असतं की - नंदिनी आवरून घे ग, कशी दिसतेस असा उदासवाणा चेहरा तुला शोभत नाही बर का!  हे आठवताच एक छोटासं  हसू तीच्या गालावर आलं आणि तिला समजलं आता तिला काय करायचं आहे ते. छान स्वच्छ पाण्याने तोंड धुतलं,  ग्लासभर पाणी प्यायली  आणि टेबल खुर्चीवर आपली डायरी उघडून ती बसली. आई गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी मनातली चाललेली कालवाकालव संपूर्णपणे त्या डायरीत एकदाची उतरवून काढायची आणि उद्यापासून नव्याने सुरुवात करायची असा मनाशी ठाम निश्चय करून ती लिहायला बसली.  लिहिताना आजचं लिहू म्हणाली आणि गेली मात्र फार खोल भूतकाळात....

 

 नंदिनी लहानपणापासूनच एक चुणचुणीत अतिशय हुशार आणि दिसायला चारचौघांपेक्षा थोडीशी उजवी अशी मुलगी! बालपण तिचं चाळीत गेलं. वडील सरकारी नोकरीत आणि आई शिकलेली जरी असली तरी तिचा सांभाळ करण्यासाठी वडिलांनी तिला घरीच  थांबायला सांगितलं होतं.  नोकरी कधी करू दिली नाही.  पण नंदिनीच्या आईनेही आनंदाने स्वीकारलं कारण मुलीचं चांगल्या रितीने संगोपन करणं हे प्रत्येक आई-वडिलांचं आद्यकर्तव्य आहे,  एक जण जर बाहेर पैसे कमवायला गेला असता  दुसऱ्याने घरात थांबून आपल्या मुलाबाळांचे योग्य रीतीने शिक्षण केलं  पाहिजे,  संगोपन केलं पाहिजे,  संस्कार दिले पाहिजे या मताची  नंदिनीची आई होती.  त्यामुळे कुठल्याही प्रकारचा मनस्ताप किंवा भांडण न करता ती स्वखुशीने घरी राहिली आणि तिचा जास्तीत जास्त वेळ हा नंदिनी सोबत जाऊ लागला. नंदिनी जात्याच हुशार! पण नोकरी बिकरीच्या भानगडीत आपण काही पडणार नाही बाबा, सरकारी नोकर होण्यात अजिबात रस  नाही आणि इतरही कुठे कितीही मोठी कंपनी असली तरी आणि ते कितीही लठ्ठ पगार देत असले  तरीही मी कोणाची हाजीहाजी करणार नाही आणि स्वतःचा काहीतरी उद्योग करेन, असे ती नेहमीच म्हणायची.  लहानपणापासूनची तिची इच्छा होती आणि तिचे बाबा ही तिला याबाबतीत पाठिंबा द्यायचे व तिचा उत्साह वाढवायचे. आईला नंदिनीच्या विचारांचं जरी कौतुक वाटत असलं तरी एका मुलीने उद्योग सुरू करणे आणि तो पुढे नेणे,  आणि मुळातच उद्योग-धंदा करणे हे काही फार सोपे काम नाही हे ती जाणून होती. त्यामुळे कधी कधी मनात विचार यायचा की ही इतर चारचौघींसारखी न होता असामान्य मुलगी आपल्या पोटी जन्माला आली तरी चे भवितव्य कसे असेल या काळजीने कधीकधी ती मनातल्यामनात घाबरून जायची.

 

पण नंदिनी मात्र बिनधास्त होती.  खेळातही पुढे, अभ्यासातही पुढे.  खाण्यापिण्याचे  तिचे कधीही नखरे नसायचे. त्यामुळे तिची शारीरिक प्रगती  आणि एकुणातच मानसिक प्रगती फार उत्तम होत होती.  तिला बोलायला फार आवडायचे.  वक्तृत्व ही तिचे उत्तम होते त्यामुळे शाळेतही सर्व शिक्षकांची ती  लाडकी. यथावकाश दहावी बारावी झाली.  पुढे तिने पदवीपर्यंतचे शिक्षणही केले.  हे सगळे करत असताना तिचं डोकं मात्र तिला शांत बसू देईना कारण उद्योग करायचा हे तिने लहानपणापासूनच ठरवलेलं आणि त्यानुसार शिक्षण घेताना तिने तिच्या उद्योगाच्या विषय शोधूनही ठेवला आणि मग एक दिवस आई-बाबांशी  त्यावर चर्चा करून तिने तो उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.  पदवीचे शिक्षण पूर्ण झालं तेव्हा अवघी २१ वर्षांची नंदिनी मात्र  बुद्धीने अतिशय तल्लख आणि धडाडीची होती. आजी आणि नंतर आई या दोघीही अध्यात्मात असल्याने तिला त्याची ही गोडी होती.  तिच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा  हा एक वेगळा पैलू होता .  तल्लख बुद्धिमत्ता हळवं मन  आणि अध्यात्माची जोड असा त्रिवेणी संगम तिच्या व्यक्तिमत्त्वात तिच्या डोळ्यातल्या चमकेने लगेच लक्षात येई.

 

शुभमुहूर्तावर उद्योगाची सुरुवात झाली आणि स्वतःच्या हिमतीवर काही भांडवल आई-बाबांकडून घेऊन आणि काही स्वतःच्या बचतीचे वापरून तिने खूप चांगल्या प्रकारे पहिल्या वर्षातच प्रगती केली आणि पुढील वर्षी दोन लोकं  कामाला देखील ठेवली. तिची प्रगती खूप होणार याबद्दल तिच्या बाबांना तर काही शंकाच नव्हती आणि आईलाही नव्हती,  पण आपला इतका मौल्यवान  हिरा सांभाळण्यासाठी सोन्याचे कोंदण ज्या  व्यक्तीचा लागेल तीही तितक्यात ताकदीची लागेल,  हे मात्र नंदिनीची आई ओळखून होती.

 

 दिवस भराभर जात होते वर्ष तर उडत होती आणि नंदिनी आता पंचवीस वर्षाची सुंदर तरुणी डोळ्यात भरायला लागली होती.  इकडे आईची काळजी की मुलीचं लग्न करावं आणि तिकडे बाबांनाही आता थोडीफार काळजी वाटायला लागली होती.  नंदिनीला मात्र या गोष्टीत स्वारस्य नाही अशी काहीशी लक्षण त्या दोघांनाही दिसत होती.  हळूच एके दिवशी विषय काढल्यानंतर ती म्हणाली - अग बाई त्या अरेंज मॅरेज मध्ये काही नसतं.  माझ्या मनासारखा जेव्हा मुलगा माझ्यासमोर येईल ना तेव्हा मी सरळ येऊन तुम्हा दोघांनाही सांगेल की मला याच्याशी लग्न करायचा आहे. त्यामुळे चिंता करू नका आणि मला जे यश मिळत आहे त्याच आपण सेलिब्रेशन करू या. असं म्हणून नंदिनी ने विषय टाळला खरा पण तिच्याही मनात आताशा आपला लाईफ पार्टनर कोण असेल या बद्दल चे विचार हळूहळू रुंजी घालायला लागले होते.  कितीही हुशार तडफदार आणि उद्योगिनी असली तरी ही स्त्रीसुलभ भावना तीच्याही होत्या आणि तिलाही संसार असावा आपल्याला आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा अशी इच्छा होती.  दोन गोंडस मुले असावी असे त्याला नेहमी वाटायचे आणि हा विचार मनात आले की ती स्वतःशीच लाजायची.

कामानिमित्ताने एका बिजनेस मीटिंगसाठी बाहेरगावी गेली असताना नंदिनी ची ओळख विवेकशी झाली.  दोघांचेही उद्योसाठी चे विचार एकसारखे होते त्यामुळे पटकन ट्यूनिंग जमलं. बाहेरगावी वास्तव्याच्या  त्या चार दिवसात ते दोघे अनेकदा भेटले आणि त्या दोघांच्याही असं लक्षात आलं की ज्या जोडीदाराच्या शोधात आपण होतो ते आपण एकमेकांसाठी अतिशय योग्य आहोत. जास्त वेळ न दवडता घरी आल्याबरोबर नंदीनीने आपल्या आई-बाबांना ही गोष्ट सांगितली आणि सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.  निदान पहिली पहिली तरी आपल्या मुलींने  चढली याबद्दल ते समाधानी होते आणि लवकरात लवकर विवेकची भेट व्हावी यादृष्टीने काय करता येईल या विचारात दोघेही गर्क झाले. विवेकचा ही  स्वतःचा उद्योग होता आणि म्हणूनच नंदिनी सारखी उद्योगिनी  त्याला पहिल्या नजरेतच पसंत पडली होती.   तिची तल्लख बुद्धिमत्ता त्याच्या तेव्हाच लक्षात आली होती आणि तिचं सौंदर्यही त्याला मोहात पाडून गेलं होतं.  या सगळ्यांचा परिणाम म्हणजे वाजत-गाजत लवकरच त्यांचा साखरपुडा उरकला.  सगळेच आनंदात होते.  एकाच शहरात असल्यामुळे दोघेही भेटत होते. दोघांच्याही घरचे खुल्या विचारांचे  असल्याकारणाने एकमेकांच्या घरी येणे जाणे मोकळेपणाने बोलणे हे कायमच होते.

 

 पण नंदिनीला मात्र काही गोष्टी हळूहळू जशा समजायला लागल्या तसं तिला लक्षात येऊ लागलं की भविष्यात काही गोष्टींवर ती त्याच्याशी सहमत होऊ शकणार नाही आणि भांडण विकोपाला जाऊ शकतील. स्वतःच्या उद्योगधंद्यात नंदिनी जरी खूप प्रगती करत असली तरी देखील तिला स्वतःचे एक छानसं पर्सनल लाईफ हवं होतं त्यामध्ये आपला जोडीदार आपली मुलं आपलं घर हेही असावं, अशी तिची इच्छा होती.  मात्र विवेक अगदी याच्या उलट! उद्योग आणि उद्योगच  यामध्ये जास्तीत जास्त भराऱ्या मारायच्या,  खूप पैसे कमवायचे सगळीकडे आपला नाव झालं पाहिजे आपल्याला उत्कृष्ट उद्योगपतीचा पुरस्कार मिळाला पाहिजे या आणि अनेक अशा गोष्टी त्याच्या मनात रुंजी घालत असायच्या.  जोडीदार हा फक्त लोकांना दाखवण्यासाठी, पण संसार वगैरे काही वाढवायचा नाही किंवा मुलाबाळांच्या फंदात पडायचे नाही या विचारांचा तो. साखरपुडा झाल्यानंतर जेव्हा त्याच्याशी चर्चा व्हायची आणि नंदिनी आपल्या इच्छा बोलून दाखवायची आणि त्यावर त्याचे मत तिला कळायचं त्यावरून तिला हळूहळू आता दोघांच्या या नात्याची चिंता वाटायला लागली.

 

 नंदिनीचा जास्तीत जास्त काळ आपल्या आईसोबत गेल्या कारणाने ती तिची खूप चांगली मैत्रीण बनली होती.  त्यामुळे तिच्या मनात जे काही चालत असे कुठलाही तिला प्रॉब्लेम आला तर ती आपल्या आई समोर तो मांडायची आणि मग दोघींची निखळ चर्चा होऊन त्यातून नंदिनीला काही ना काही तरी मार्ग सापडायचा.  त्यामुळेच आईचा तिला खूप धीर वाटायचा.  एक हक्काचा खांदा ज्यावरती डोकं ठेवून निवांतपणे झोपू शकत होती. अशातच एके दिवशी नंदिनीच्या बाबांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि आपल्या लेकीचं लग्न बघण्याआधीच ते या लोकातून एक्झिट घेते झाले. अचानक आभाळ कोसळल्यासारखं झालं नंदिनीला. आईची अवस्था तर बघण्यासारखी होती. पण तरीही आपल्या लेकीला आपल्या आधाराची गरज आहे आणि तीच माझ्या आता पुढील जीवनाचा आधार आहे हे तिची आई ओळखून होती आणि त्या दोघीही लवकरच सावरल्या आणि आपल्या पुढील आयुष्यास त्यांनी सुरुवात केली.

 बाबांच निधन अचानक झाल्यामुळे विवेक सोबत होणारे मतभेद नंदिनी ने आईसमोर आणलेच नाही.  असा बराच काळ निघून गेला पण तिच्या देहबोलीवरून आईच्या लक्षात यायला लागलं की काहीतरी बिनसले आहे आपल्या लेकीचं. काय असावा बरं? शेवटी एके दिवशी जेवण झाल्यानंतर तिला जवळ बसवून प्रेमाने डोक्यावर हात फिरवून आईने विचारुन घेतलं आणि त्यानुसार तिने आपल्या आईला सगळं काही सांगितलं. आपली  लेक मनाने इतकी  हळवी आहे आणि स्वतःच्या वैयक्तिक जीवनाबद्दल तिचे इतके साधे सरळ इतर मुलींसारखे  विचार आहे हे तिला पहिल्यांदाच कळत होतं.  पण हे ऐकून ती मात्र मनोमन आनंदली आणि तिने आपल्या लेकीला शाबासकी दिली की तुझा उद्योग धंदा पैसे कमावणं नाव कमावणं हे तर होतच राहील परंतु स्वतःचे एक छोटसं घरकुल त्यात एक छोटीशी बाग, दोन छोटीशी गोंडस फुलं हे तुझं स्वप्न मला फार आवडलं आणि ते तुझं पूर्ण होईल असं मला नक्की वाटतं!!

 

 नंदिनी आणि विवेक चा साखरपुडा होऊन आता वर्ष उलटून गेलं होतं. मध्ये नंदिनीच्या बाबांचं निधनही  झालं आणि त्यालाही आता वर्ष उलटून गेलं होतं.  शेवटी आता नंदिनी आणि विवेक यांनी लग्न उरकून घ्यावं असा प्रस्ताव पुढे आला आणि दोन्ही कुटुंबाने एकमेकांना भेटायचं ठरवलं.  नंदिनीच्या घरी विवेक आणि त्याचे  आई वडील आले. त्याप्रसंगी खूप छान गप्पा होत असताना अचानकच जेव्हा वैयक्तिक आयुष्य या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली तेव्हा विवेक ताडकन उठला आणि सर्वांसमोर म्हणाला की - हे वैयक्तिक आयुष्य वगैरे काही नसतं दोघे एकमेकांना पुरेसे असतात.  मूलबाळ या फंदात मी पडणार नाही हे तुम्हा सर्वांसमोर आताच सांगून ठेवतो;  त्यामुळे लग्न झाल्यानंतर मला कोणीही काही विचारायचं नाही आणि नंदिनीने ही त्याचा आग्रह धरू नये उलट ती सगळी ऊर्जा तिने आपल्या आणि माझ्याही उद्योगासाठी वापरावी असे मला वाटते. विवेकचं  अचानक हे असं वागणं  बघून सगळेजण अवाक झाले. कारण विवेकच्या आई-वडिलांनाही हे नवीनच होतं.  नंदिनी आणि नंदिनीच्या आईला ठाऊक असलं तरीदेखील विवेकच मन वळवण्यात मी कधीतरी यशस्वी होईन अस नंदिनीला वाटत होतं. परंतु आज इतक्या ठामपणे आणि उद्धटपणाने विवेक सर्वांसमोर बोलला तेव्हा तिच्या लक्षात आलं की हे असं काही होणार नाही आणि माझी इच्छा आहे त्या इच्छाच राहतील त्या कधीही पूर्ण होणार नाही. तत्क्षणी नंदीनीने सर्वांसमोर निर्णय घेतला की हे लग्न करायचं नाही आणि मला यापुढे कधी लग्नच करायचं नाही. तिने तस सर्वांसमोर बोलून दाखवलं आणि साखरपुड्याची अंगठी हातातून काढून विवेकच्या हातात दिली.  सर्वांची  माफी मागितली आणि शांतपणे बसली.  हे सगळं अघटित घडत होतं परंतु विवेकच्या आई-वडिलांनाही काय बोलावं काही सुचेना!  त्यांनी नंदिनीला आशीर्वाद दिले आणि गुपचूप त्या घरातून निघून.  गेले विवेकला हे थोडंसं अनपेक्षित होतं परंतु शेवटी त्याचा पुरुषी अहंकार आडवा आलाच. 'मी कशाला तिला विचारू आणि कशाला तिला समजावू, '  या विचारात तोही निघून गेला आणि मनातल्या मनात पुट्पुटला की आज ना उद्या तिला समजलेच आणि ती पुन्हा माझ्याकडे परत येईल.

 

 नंदिनी ची आई या या अनपेक्षीत घटनेने थोडीशी हादरून गेली.  मुलीच्या लग्नाची आणि तिच्या संसाराची गोड चित्रं  डोळ्यासमोर रोज आणणारी ती आताशा मनातन फार घाबरली. कारण नंदिनीचा दृढनिश्चयी स्वभाव तिला ठाऊक होता.  तिने एकदा ठरवलं ते ती करतेच हे तिला पक्कं ठाऊक होतं आणि तिथून ती माऊली जी झुरणीला लागली ते तिने अंथरुणंच पकडलं.  तसे नंदिनीचे बाबा गेल्यानंतर तिचं अर्धं अवसान गळालं होत,  परंतु मुलीसाठी ती उभी होती आणि आज हे असं घडल्यानंतर मात्र ती पूर्णपणे कोसळली. शेवटच्या काही दिवसात नंदिनीला ती आपल्याजवळून उठू  देईना आणि एके दिवशी तिने तो विषय काढलाच. नंदिनी मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती  कारण तिलाही कळून चुकलं की लग्नाचा विचार आता काही तिच्या मनात येणार नाही पण दोन मुलांमध्ये, जे ती दत्तक घेणार होती,  त्यांच्यातच संसाराचा आनंद शोधणार असे तिने  ठरवले आहे.  आईला नंदिनी म्हणाली की  तुला खूप दिवसांचे  सांगायचे होते परंतु तुझ्या आजारपणामुळे मी काही बोलले नाही.

 

 लेकीचे हे शब्द ऐकल्याबरोबर नंदिनीच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. आणि आपली मुलगी खरंच चारचौघींसारखी नाही तर अतिशय असामान्य आहे आणि तिचे विचार लाखमोलाचे आहेत त्यानुसार ती आपले जीवन सार्थकी लावेल याची पूर्ण खात्री त्या माऊलीला झाली आणि तिने तिचा शेवटचा श्वास घेतला.

 

 आई गेल्यानंतर नंदिनीने मग रीतसर दोन मुले-  एक मुलगा आणि एक मुलगी-  दत्तक घेतली.  साधारण एकाच वयाची होती दोघे ही. आणि त्यांच्या संगोपनात त्यांचे सगळे लाड पुरवण्यात आणि स्वतःचे ही लाड करून घेण्यात ती इतकी गुंतली की आईची कमी तिला पुन्हा भासली नाही आणि पुन्हा कुणा पुरुषाबरोबर लग्न करण्याची इच्छा ही त्यांच्या मनाला शिवली नाही. या सर्व प्रवासात तिला एक गोष्ट निश्चित कळली होती की मोह माये मध्ये न अडकता आपणच आपला आनंद शोधायचा.  मग तो भौतिक गोष्टीत नसून कुणाला काहीतरी देण्यात अधिक आहे. अधिकाधिक आनंदी आपण स्वतः राहायचं आणि इतरांनाही आनंद वाटायचा जेणेकरून मन शांत शांत आणि समाधानी होईल. दत्तक घेतलेली तिची ती दोन मुलं आणि ती आणि तिचा उद्योग, यांचं  समाधान तिच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होतं!!!

Comments

  1. Very aptly written 👌... Find ur own happiness. That concept is itself so fantastic! Keep it up

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य