टिपेश्वर जंगल सफारी - ७ व ८ मार्च २०२०

टिपेश्वर जंगल सफारी - ७ व ८ मार्च २०२०

७ व ८ मार्च २०२०

म्हणतात ना, काही गोष्टी घडण्यासाठी योगच यावा लागतो. अगदी तसच काहीस माझ्या बाबतीत विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातील जंगल दर्शनाबाबतीत झालं. माझं आजोळ (आईचे माहेर) यवतमाळ जिल्हा, दारव्हा तालुक्यातील टाकळी (बु) हे एक छोटेसे खेडेगाव. तालुक्याच्या ठिकाणापासून बसने एक गाव, तिथून पायी चालत पहिली नदी ओलांडून दुसरे गाव व पुन्हा चालत जाऊन दुसरी नदी पार करून आजोबांचं गाव! दरवर्षी न चुकता उन्हाळ्याच्या सुट्टीत २ महिने मनसोक्त राहत असू. आंबे, चिंचा, विहिरीत पोहणे (अर्थात, पाणी असलेल्या, जी एक मामाच्या शेतात होती; कारण विदर्भात मे महिना एकदम खतरनाक!), संध्याकाळी ५-५;३० नंतर शेतात फिरायला जाणे, दुपारी आंब्याच्या झाडावर डाब-डुबलया खेळ खेळणे (सूरपारंब्या सारखा कदाचित), असे मजेत दिवस जायचे. मामांकडून यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणच्या जंगलांबद्दल ऐकायला मिळायच. एकदा दारव्हा हुन यवतमाळ ला जाताना घाटातून प्रवास झालाय आणि त्या जंगलाचं लांबूनच दर्शन झालं होतं, पण काही मोजक्या क्षणांसाठीच ! पण जंगलाचा अनुभव त्याच्या आत शिरून काही तास (दिवस व महिने घालवणारेही असतात म्हणा) घालविल्याशिवाय पदरी पडत नाही. जंगलात प्रवेश केल्यापासून आत आत शिरत जातो तसतस आपण त्याच्याशी समरस होत जातो. तो काळ हृदयापासूनच अनुभवावा लागतो. किंबहुना, आपला त्याच्याशी एक मूक संवाद कधी सुरु होतो आपल्या नकळत, ते आपल्यालाही उमगत नाही. मग परतण्याची वेळ येते, तेव्हा जी मनात चलबिचल होऊन हुरहूर लागते ना, तेव्हा उमगतं, आपण या जंगलाचा एक भाग बनून राहिलो होतो काही तास!
असाच जंगल सफारीचा आनंद माझ्या नशिबात होता आणि तो ही माझ्या जिव्हाळ्याच्या ठिकाणी - विदर्भात ! आमची भटकी मैत्रीण 'प्रिया कराडकर' हिच्याशी पुढील काही जंगल दर्शनाचे बेत आखताना टिपेश्वर चा उल्लेख झाला आणि मी तो उचलूनच धरला. अर्थात, त्यामागचं कारण अस की मनाच्या कोपऱ्यात दडलेली ती यवतमाळ चे जंगल बघण्याची इच्छा उफाळून आली होती ना बाप्पा !!! 🙂

टिपेश्वर प्रवासाची आखणी झाली एकदाची. असंख्य (?) अडचणींवर मात करून एकदाचे मी धामणगाव ला जाणारी विदर्भ एक्प्रेस मध्ये कल्याण ला चढले. बाकीचे आधीच होते आतमध्ये मुंबई हुन. ६ मार्च ला हा प्रवास सुरु झाला. धामणगाव हुन यवतमाळ - पांढरकवडा असे करत आम्ही एकदाचे आमच्या निवासस्थानी पोहोचलो - अनंत हेरिटेज ऍग्रो टुरीझम, झुंझारपूर. पांढरकवडा पासून ७ किमी. टिपेश्वर ला मुंबई हुन येण्यासाठी अजून एक मार्ग म्हणजे मुंबई - आदिलाबाद (तेलंगाणा राज्य) असा नंदीग्राम एक्स्प्रेस ने प्रवास करावा. आदिलाबाद रेल्वे स्टेशन हुन टिपेश्वर अवघे ३५ किमी वर आहे. कसेही आले तरी मुंबई हुन पोहोचायला १४-१५ तास सहज लागतात. अनंत हेरिटेज चे वर्णन करावे तितके कमीच पडेल. १९३६ सालच्या या टुमदार बंगल्यात आमची राहण्याची व खाण्याची उत्तम व्यवस्था केली होती.
नागपूर - आदिलाबाद - हैद्राबाद या NH ४४ /७ या हायवेला लागूनच आम्ही राहत होतो. आणि टिपेश्वर जंगलाच्या एका गेटपासून अवघ्या ७-८ किमी अंतरावर. ७ मार्च ला सकाळी साधारण १० वाजता आम्ही पोहोचलो. सर्व आटोपून दुपारी १:३० वाजता पहिल्या सफारीला निघालो. मायकल शूमाकर ला ही मागे टाकेल (हे स्मिता च्या वाणीतून आलेले वाक्य 🙂 ) एवढ्या वेगाने जीप दामटवली आमच्या वाहनचालकाने. सर्व सोपस्कार पूर्ण करून अंतिमतः २:१५ च्या दरम्यान प्रवेशदवारातून एकदाचे जंगलात शिरलो. 'गाईड' ही एक महतवाची व्यक्ती जंगल सफारी साठी! अर्थात ड्रायव्हर शेजारी तोच उभा होता. मागे आम्ही ६ जण - मी, प्रिया, विकास, दीप्ती, विलास सावंत आणि स्मिता. आणि हो चिमुकली ४ वर्षांची साईवि पण होती.

उत्सुकता पराकोटीला पोहोचलेली. ताडोबा च्या मानाने जंगल लहान आहे, पण तरी एकूण १७ वाघ आहेत असे कळले. त्यामुळे वाघ सहजच दिसतील, असा उगाच एक आगाऊ समज (-गैर, अर्थातच) मनात तयार झालेला, ज्याला खूपच लवकर सुरुंग लागला. मनुष्य प्राण्याने एक नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपण त्यांच्या अधिवासात जाऊन एक प्रकारे त्यांच्या जीवनात ढवळाढवळच करीत असतो. निदान थोडी तरी वाट बघण्याची वृत्ती ठेवावी चित्ती. उद्या त्यांनी उठून ठरवले तर - आपल्या अधिवासात आपल्याला बघण्याचे? हाहा:कार उडेल नाही? एकीकडे मनाचा एक कप्पा हे नेहमीच बजावत असतो, पण त्याचवेळी दुसरा मात्र प्राणी बघण्यासाठी उतावीळ असतो. निदान त्यातल्या त्यात जंगलात शिरण्याआधी घालून दिलेल्या सर्व नियमांचे सर्वांनीच काटेकोरपणे पालन केले आणि गोंधळ न घालता त्यांना (प्राणी, पक्षी, निसर्ग) शांतपणे बघण्याचा आनंद लुटला, तरी आपण जंगल पर्यटनाला चांगल्या प्रकारे हातभार लावतो असे होईल.
पांढरकवडा आणि यवतमाळ या दोन गावांच्या मध्ये साधारण १५० चौ.किमी वर पसरलेलं हे टिपेश्वर च जंगल. ताडोबा, पेंच इ. ह्या मानाने अजून तरी फार वलयांकित नाही, पण बरी वाटतात अशी ठिकाणे. गर्दी कमी तद्वत गोंधळही कमी. एकूण दोनच गेट आहेत - सुन्ना आणि माथणी. आमचे निवासस्थान सुन्ना गेट पासून अवघ्या ७ किमी वर तर माथणी जवळपास २३ किमी वर होत. आम्ही सुन्ना च्या २ आणि माथणी ची १ अशा एकूण ३ सफारी घेतल्या होत्या.
वातावरण एकंदरीत सुखावह व आल्हाददायक होते. दोनच दिवसांनी होळीचा सण होता. वसंत ऋतू सगळीकडेच आपली जादू पसरवत आनंदाने विहरत होता. त्या जादूचे प्रत्यंतर आम्हाला येत होते डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या पळस वृक्षाच्या दर्शनाने. अहाहा, काय बहराला होता सगळीकडे. जंगलाबाहेरच रस्त्याच्या कडेला दूरपर्यंत चहूकडे. त्याचा तो नारिंगी रंग जणू खालून वरपर्यंत सौंदर्याने पेटून उठलेला शृंगाराच. काय वर्णन करावे, शब्द कमी पडतील. जंगलात शिरण्यापूर्वी या पळसाचे मनोहारी दृश्य मन आल्हादित करून गेले. शाल्मली वृक्ष ही दिसला, पण क्वचितच एखादा, एकटा. रस्त्याच्या कडेला. शाल्मली तसा पळसाहून बराच उंच. पण त्याचीही फुले अप्रतिम देखणी आणि तो काळपट- तांबडट लाल रंग अतिसुरेख. शाल्मली च्या फांदी-फांदीवर केवळ पुष्पच, पर्ण कुठेही नाही. पळसाची निदान ती 'तीन पाने' तरी काहींवर दिसत होती. पण एकुणातच दोघांवरही पुष्पभारच जास्त! मला आठवत, गावी आम्ही रंगपंचमीला ही दोन्ही फुले तळहातावंर चोळून तो रंग मित्र मैत्रिणींच्या गालावर फासत असू. तोच आमचा पंचमीचा रंग! आज मात्र या दोन्ही फुलांचं सौंदर्य नजरेत कैद करू की कॅमेऱ्यात, या द्वंदामध्ये असतानाच जीप कधी जंगलात शिरली ते कळलेच नाही.
तर जंगलात शिरल्यावर (सुन्ना गेट, ७ मार्च शनिवार, दुपारची सफारी) सर्वप्रथम नजरेला जी गोष्ट जाणवली ती म्हणजे लागवड केलेल्या सागाच्या झाडांनी हे जंगल तयार झालेलं. शिशिरातल्या पानगळीमुळे संपूर्ण जमीन सागाच्या मोठाल्या पानांनी आच्छादलेली. जीपसाठी चा कच्चा रस्ता तेवढा मोकळा. शुष्क पानगळीचे जंगल हे. जंगल त्यामुळे खूपच विरळ दिसत होते. पण अशातच प्राण्यांचे दर्शन फार लांबूनही होते (साईटिंग).

तशी बरीच हिरवीगार, पाने न झडलेली झाडेही होतीच म्हणायला. गाईड ने काही झाडांची नावे सांगितली आणि जी बघता आली ती - तेंदूपत्ता, ऐन वृक्ष (crocodile bark tree), बहावा, बाभूळ, बेल, बिबा, उंबर इत्यादी. पळस ही होता जंगलात अधे मध्ये. आणि हो बांबूची बेटे ही बरयाच ठिकाणी दिसली या जंगलात. पण जंगलाच मुख्यत्वे सागाचे असल्याने त्याची पानगळ आणि बोडकी झाडे लक्षवेधी ठरत होती.
गाईड अधूनमधून माहिती देतोय. आम्ही सगळेच चौफेर नजर टाकतोय. शिकार पक्ष्याचे सर्वप्रथम दर्शन झाले - white eyed buzzard, मराठी नाव - शिंजरा तिसा. याला कोंकण गोव्याकडे धव्या डोळ्याचो गरुड असे नाव आहे. इतर अजूनही काही पक्षी जसे नीलकंठ (नीलपंखी - Indian Roller), ब्राह्मणी मैना, सातभाई, कोतवाल, दयाळ आणि आपले नेहमीचेच पोपट बर्याच संख्येने दिसले. डोळे मात्र व्याघ्रदर्शनासाठी भिरभिरत होते, हे वेगळे सांगायला नको.

आत बरच लांबपर्यंत गेल्यावर समोर अचानक सगळ्या जीप एका ठिकाणी थांबलेल्या दिसल्या आणि तसं ड्रॉयव्हर ने गाडी दामटवली तिथपर्यंत. एव्हाना लक्षात आलेलं की वाघोबा आहेत जवळपास कुठेतरी. पण नीट दिसेना. इतरांच्या चर्चेतून असे कळले की तळ्याच्या काठी वाघ बसलेला आहे. अर्धा पाण्यात बहुधा. मग काय, त्याला बघण्यासाठी आमची नुसती तारांबळ. झूम लेन्स कॅमेरातुन कुणाला अर्धे शरीर दिसत होत तर कुणाला शेपटी, तर कुणाला पाय व एकाला तर चेहरा. प्रत्येकजण त्याला 'पूर्ण' बघण्याचा आटोकाट प्रयत्नात होता. पण वाघोबादादाला खर त्याच काही पडलं असणार का? तो जंगलाचा अनभिषिक्त सम्राट!! आपल्याच मस्तीत जगणारा. तुम्ही आलात काय आणि गेलात काय, त्याच्यापुढे आपण तुच्छच, नाही का? तो उठून आमच्यापासून कमी अंतरावर येईपर्यंत त्याची वाट बघण्यावाचून पर्याय नव्हता. पण तोपर्यंत तिथे जमलेल्या ५-७ जीपमधल्या आमच्यासारख्या पामरांची जी उत्सुकता पराकोटीला पोहोचलेली ना, ती ही बघण्यासारखीच होती. तेवढाच विरंगुळा!

तर एकदाचा तो वाघ पूर्ण पाण्याबाहेर येऊन एका झाडाच्या सावलीत तळ्याकडे तोंड करून बसलेला दिसला. तो शांत चित्ताने बसलेला आणि आम्ही सर्वजण मात्र मनातून अशांत! त्याची उठण्याची वाट बघतोय. हा असा खेळ (अदृश्य) त्या ठिकाणी जवळपास तासभर चाललेला. एकदाचा तो उठला (आम्हाला कंटाळून की काय?) आणि चालू लागला. तसा आम्हा सर्वांच्या लगबगीचा जो गोंधळ उडाला तो लाजवाब! कारण प्रत्येकच गाईड ला वाटत होत की आपल्या जीपच्या पर्यटकांना तो जवळून पाहता यावा. त्यातच असे कळले की तो वाघ नर नसून मादी आहे, कारण तिच्या पिल्लांनी आवाज दिला आणि म्हणूनच ती उठून त्यांच्याकडे निघाली आहे, अशा अत्यंत महतवाच्या माहितीची भर पडली. आता मनुष्य प्राण्याच्या स्वार्थी स्वभावाला अनुसरून तिच्या पिल्लांचही दर्शन व्हावं, अशा आशा पल्लवीत झाल्या. (काय म्हणावे, माणसाला थोडक्यात कधी समाधान मिळताच नाही, नाही का?) तर त्या तलावाकाठाने ती चालत एका ओढ्यातून नेमकी कुठून रस्ता पार करून जाणार याचा अंदाज गाईडला आल्यामुळे त्याने त्याच दिशेने सर्रकन जीप वाळवायला सांगितली आणि आम्ही खूप वेगाने जाऊनदेखील आमच्या समोर दोन जीप होत्याच! आता ती १०१% इथूनच आपल्यासमोरून जाणार या आत्मविश्वासाने (गाईडच्या) नेत्र तिची आतुरतेने वाट बघू लागले. ती ही स्वतःच्याच चालीने एक ५-१० मिनिटात त्या ठिकाणी पोहोचली. आम्हा सर्वांकडे ढुंकुनही न बघता ज्या आविर्भावात ती आली आणि त्याच डौलदार चालीने पिवळ्या गवतात (जे जवळपास तिच्याच उंचीचे होते, ३-४ फूट), आपल्या पिल्लांकडे कूच केले; तो नजारा केवळ अवर्णनीयच! अवघे काही क्षण (ओढूनताणून १-२ मिनिटे बहुधा) तिचे दर्शन झाले. तेवढ्यातही मोठाल्या लेन्स घेऊन बसलेल्या छायाचित्रकार पर्यटकांचे घोळक्यातून खट-खट-खट असे आवाज आले, ते तिची छबी कायमची कॅमेराबंद करण्यासाठीच! मी आपला अगदी साधाच कॅमेरा (cannon IXUS-190 digicam) नेल्यामुळे त्यात उगाच जास्त वेळ खालावण्याऐवजी नजरेत आणि स्मृतीत तिची छबी कायमची कोरून घेण्याचा प्रयत्न केला. पण फोटो ही मिळाला मला, जो समाधानकारक होता.
काहीतरी मोठ्ठ पदरात पाडून घेतल्याचा आविर्भाव सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसला. चला, पहिल्याच सफारीत व्याघ्रदर्शन झाले, आता नाही दिसला वाघ उद्या तरी 'गम नाही साला' (माझ्या बंधुराजांचे शब्दप्रयोग हे, अर्थ की काही हरकत नाही), अशा काहीशा विचारांची देवाणघेवाण झालेली कानावर पडली. मला मात्र वेगळंच काहीतरी वाटलं होतं. Beginner's luck नावाची काहीतरी concept आहे म्हणे, (hypothetical?) ज्यात सुरुवातीला मनासारखं घडतं आणि नंतर अजिबातच नाही किंवा खूप अडचणी येतात. हे आठवून कदाचित उद्याच्या सफारीत वाघ दिसणार नाही, असे उगाचच वाटून गेले. आणि तसंही आमच्याकडे तीनच सफारी असल्याने (९ व १० मार्च ला सुट्टी होती) उरलेल्या दोन सफारीत वाघ दिसण्याच्या शक्यतेची टक्केवारी तशी कमीच होती. पण याबद्दल असे काही ठोस गणित मांडता येत नाही. 'वेळ' (timing) हा फार महतवाचा घटक (factor) आहे माझ्या मते, आपल्या आणि वाघाच्या उपस्थितीचा एकाच जागेवरचा! आणि हो नशिबाचीही साथ लागते म्हणा. जसे, तुमच्या नशिबातच नव्हते हो (वाघाचे दर्शन), असे म्हणतात ना काहीजण!
एका वेगळ्याच समाधानाची अनुभूती घेऊन रूमवर पोहोचलो. मस्त वाटत होतं, कारण एकंदरीतच जंगल, त्यातले प्राणी, पक्षी, लता-वेली, नदी-नाले, कोरडेठण पडलेले ओढे, व मधूनमधून आमच्यातल्या एकाचे विनोदी टोमणे व कधीतरी सरळ बोलणे (ओळखले असेलच बाकीच्यानी, नाव सांगायला नको), या सर्वांचा एकत्रित परिणाम होता तो बहुदा. नुसता वाघच बघण्यासाठी जंगलात यायचं नसत, बरोबर ना? तर लवकर जेवणे आटोपून झोपायचे होते कारण दुसऱ्या दिवशी सकाळी ५:३० वाजता जीप येणार होती.

दिवस दुसरा- ८ मार्च, रविवार - सगळेच तयार होतो सकाळी ५ वाजता. नाही म्हणता म्हणता (इतरांचे बघून) मी ही आपली २ तांबे घेऊन आंघोळ केली एवढ्या सकाळी. म्हणजे उगाच नंतर कुणी बोलायला नको की आंघोळ नाही केली म्हणूनच वाघ दिसला नाही (हा हा हा, हे खरंच मनातलं हा!). गरमा-गरम चहा मिळाला. सर्व तयारीनिशी पुन्हा सुन्ना गेटकडे कूच केले. सूर्योदयापूर्वीचा तो काळसर उजेड मस्त वाटतो. सकाळचे वातावरण अप्रतिमच होते म्हणायला. गेटमधून जंगलात शिरलो तेव्हा ६:१५ झाले होते. साधारण सूर्योदयापूर्वीची 'लाली' (हे आमच्या मैत्रिणीचे प्रेमळ नावही आहे) पसरलेली पूर्वेला. आणि थोड्याच वेळात तो नारिंगी लालसर दळदार गोळा नजरेस पडला. सूर्यनारायणाचे विलोभनीय दर्शन झाल्यावर एक वेगळीच तरतरी आली (त्याच्या कृपेच्या प्रकाशकिरणांमुळे, नक्कीच!) आज जीप वेगळी (चांगली आदल्या दिवशी पेक्षा), ड्रायव्हर आणि गाईडही वेगळा. पक्षी बघायला आणि त्यांचा किलबिलाट ऐकायला ही वेळ अत्युत्तम! पूर्ण उजाडल्यावर भरपूर पक्षी दिसले.

या जंगलात आम्हाला नीलगायी भरपूर दिसल्या. नीलगाय (नार व मादी) आणि त्यांचा संपूर्ण कुटुंब कबिला बऱ्याचदा दिसला. ह्या नीलगायी जंगलातील तृण (गवत) खातात. आणि नीलगायींची संख्या जास्त म्हणजे गवत कमी कमी होत जाणार, जे जंगलाच्या स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे, अशी माहिती चर्चेतून कळली. (यावर वन्यजीव अभ्यासक जास्त चांगलं सांगू शकतील). नीलगाय तृण संपूर्णपणे नष्ट करते आणि तिथे पुन्हा तृण उगवत नाही, असे कळले. (?)

एके ठिकाणी सांबर ही दिसले. सकाळची सफारी संपत आली तरी व्याघ्रदर्शन झाले नाही. थोडी निराशा झाली, पण जंगलाच्या इतर सदस्यांशी नेत्रभेट झाली, हेही नसे थोडके!
आता संध्याकाळच्या आणि शेवटच्या सफारीकडे डोळे लागलेले. ही आम्ही माथणी गेट ला घेतलेली जे साधारण २३-२५ किमी वर होते, त्यामुळे दुपारी जेवणे आटोपल्यावर लगेचच निघालो. थोडे अंतर जात नाही तर ढगाळलेलं वातावरण आणि दुपारी २ वाजता थंडगार वारे वाहू लागलेले. कुठेतरी पाऊस पडलाय हे जाणवलं. आम्ही मात्र मनात प्रार्थना करत होतो की आमची सफारी होईपर्यंत पाऊस नको पडायला. तरी पावसाचे थेंब लागताच होते. गेटवर पोहोचलो तेव्हा अडीच वाजलेले. सोपस्कार पूर्ण करून शिरलो एकदाचे जंगलात. या सफारीला आम्हाला रानडुकरे व त्यांचे संपूर्ण कुटुंब दिसलं. पक्षी तर होतेच सोबतीला. धीवर पक्षी (खंड्या - kingfisher) जो नेहमीच माझं मन आकर्षून घेतो, तोही दिसला एका झाडावर तळ्याच्या काठी. एके ठिकाणी झाडावर मालकुवा (सिरकीर मलकोहा, हिंदीत जंगली तोता) पक्षी दिसला. जोडी होती. एवढा आनंद झाला सगळ्यांना की काही सांगता सोय नाही. दूरवर ४-५ हरीण ही दिसले.

जंगलात फिरताना दोन-तीनदा आम्ही एकाच रस्त्याने गेलो, जिथे वर टिपाई देवीचे मंदिर आहे. देवीच्या याच नावावरून जंगलाला टिपेश्वर असे नाव पडले, असे गाइडकडून कळले. पूर्वी या मंदिरात आजूबाजूच्या गावातील लोक / भाविक येत असत, पण आता जंगल प्रशासनाने ते सर्वांसाठीच बंद केले आहे. टिपाई देवी म्हणजे आदिमाया भवानीचेच रूप.
आता सूर्यास्त होण्यास काहीसा अवधी बाकी होता आणि एका नाल्यात गाईडने आम्हाला वाघाच्या पंजाचे निशाण (tiger pug-marks) दाखवले. ते बघून तिथे थोडावेळ थांबलो, पण व्यर्थ! मग अजून दुसरीकडे जाऊ म्हणून निघालो तर वाटेत कळले की एका जीपला सायटींग झाले आहे. गाडी दामटवत (इतकी जोरात की आम्ही जागच्या जागे २-४ फूट वर उडालो) तिथपर्यंत पोहोचलो तर वाघदादा तिथून निघून गेले असे कळले. थोडास हिरमुसून परतीच्या वाटेला लागलो. सूर्यास्त होण्याअगोदर गेटवर पोहचणे गरजेचे होते तसे निघालो.

गेटवर फोटोसेशन (परत एकदा) करून अनंत हेरिटेज ला पोचलो. तिथल्या व्यवस्थापकांनी महिला दिनाच्या निमित्ताने आमच्यासाठी केक आणला होता. आम्हा सर्व मुलींना भेटवस्तू दिल्या (मुलांना वाईट वाटले असावे, असे उगाचच वाटून गेले). आणि थोड्याच वेळात धो-धो पाऊस कोसळला. त्यानंतर जो मृद्गंध पसरला, तो अवर्णनीयच! एकुणच वातावरं थंडगार झाले.

तीनही सफारी झाल्या होत्या. ९ मार्च ला सोमवार असल्याने जंगल बंद होते पर्यटनासाठी व १० मार्च ला धुलिवंदनाची सुट्टी होती. हे दोन्ही दिवस आसपासचा परिसर बघण्यात घालवणार होतो. पांढरकवडा गावातून 'खुनी' नदी वाहते. तिला अस नाव का पडलं विचारलं असता कळलं की दरवर्षी ती काही जणांचे बळी घेतेच पावसाळ्यात. थोडे घाबरलो ऐकून. पण तरी ९ मार्च ला सकाळी त्या नदीकाठी बसून मस्त पक्षीनिरीक्षण केले. नदीचे पात्र खूप शांत होते, इतके की काठच्या सर्व झाडांचे न हलणारे प्रतिबिंब त्यात दिसत होते. ते कॅमेऱ्यात घ्यायला विसरले नाही.

मी त्याच दिवशी दुपारी परतीच्या प्रवासाला निघाले. निघताना तेथील प्रसिद्ध जगदंबा माता मंदिरात (केळापूर) देवीच्या प्रसन्न मूर्तीचे (फक्त चेहराच होता माहूर च्या रेणुका मातेसारखा, पण चांदीची मूर्ती, अतिसुरेख आणि आखीव-रेखीव) दर्शन घेऊन पुढे निघाले. बाकीचे दुसऱ्या दिवशी निघणार होते.


पांढरकवडाहून यवतमाळ व तिथून धामणगाव ची एस.टी. बस पकडली. संध्याकाळी ६ वाजता धामणगाव रेल्वे स्टेशन ला पोचले आणि ७:०५ ला विदर्भ एक्स्प्रेस ने कल्याण कडे प्रवासास सुरुवात झाली. धामणगाव रेल्वे स्टेशन ला टिपेश्वर आणि चिखलदरा चे भित्तीचित्र काढलेले आहेत. त्यात बिबळ्या, वाघ, हरीण आणि अन्य प्राण्यांची व पक्ष्याची सुंदर चित्रे रेखाटली आहेत. त्यांचे कॅमेर्यात फोटो घ्यायला नक्कीच विसरले नाही.

तर अशी ही माझी विदर्भातल्याजंगलाच्या पहिल्या-वहिल्या सफारी ची कहाणी सुफळ संपुर्णम. शांतपणे पूर्ण वाचणाऱ्याला शतश: प्रणाम आणि धन्यवाद!!!
- कल्याणी (शुभदा जगताप).
४ एप्रिल २०२०.

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

सहावी दुर्गा - पद्मजा