मृत्यूपंथ

मृत्यूपंथ

जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला ।
परी शेवटी काळमुखी निमाला।।
महाथोर ते मृत्यूपंथेची गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ।।

समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या या श्लोकामध्येही आपल्या सर्वांच्याच जीवनातील एक अटळ आणि सत्य घटनेची आठवण करून दिलिये ती म्हणजे मृत्यू. आलेल्या प्रत्येकाला एके दिवशी मरणे आहेच. मग व्यर्थ चिंता कशाला? महाथोर, यशवंत, नावाजलेले आणि अगदी सामान्यातले सामान्य सुद्धा एक ना एक दिवस मरणारच आहे. मग फरक कुठे उरतो ? की तुम्ही जगलात कसे ?

 बाबा (माझे सासरे श्री. बापूसाहेब जाधव ) चे निधन होऊन आता तीन महिने झालेत. शेवटच्या क्षणीचे  त्यांचे दर्शन अजून डोळ्यांसमोर ताजे आहे आणि ते आयुष्यभर राहील.  अतिशय शांत आणि समाधानी चेहरा, देह निपचित, अतिशांत झालेला. जणू अतिप्रेमाने थापटल्या नंतर बालकाला जशी मातेच्या मांडीवर झोप लागते आणि ते बालक त्या निद्रेचा मनापासून आनंद घेत असतो. अगदी तसच काहीतरी भासल त्यांच कलेवर बघून! फरक एवढाच की ही त्यांची शेवटची आणि चिरनिद्रा होती.

मृत्यूपंथ हा शब्द कितीएक दिवस तरी मनात घोळत आहे. योगायोग असा की बाबांच्या निधना आधी काही दिवस माझी आणि संदीप ची नेमकी याच श्लोकावर चर्चा झाली होती. आणि चर्चेचा मुख्य शब्द ही हाच - मृत्यूपंथ! म्हणजे अस की हाच शब्द का वापरला असावा जेव्हा महाथोर असा उल्लेख झाला? प्रत्येक जीव जन्माला आला की मरणारच ! प्रत्येकाला शेवट आहेच. ऐसे कितीएक तरी जन्मातात अणि मरतात. काय फरक पडतो या सृष्टीला किंवा विश्वाला? त्याच चक्र अविरतपणे चालूच आहे अणि राहीलही. मग आपल काय? आपण कस जगायचे अणि आपल्या जीवनाचा नक्की उद्देश  काय? इथेच खरी गोम आहे.

पंथ किंवा धर्म म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीला बंधून राहणे व सवयीनुसार त्याच काळजीपूर्वक पालन। करणे. तर  मृत्युपन्थ म्हणजे मृत्यु हाच एक धर्म मानून चालणे. ज्याना मृत्यु या एकमेव अटळ सत्याची जाण  झालेली  आहे, ते महाथोर असे (माझ्या मते ) त्याना या गोष्टीच सतत स्मरण आहे. नाहीतर एवढ्याश्या या मानवी जन्मात तू-मी, माझ -तुझ, हेवे-दावे, द्वेष, मत्सर, लोभ आणि अजून कितीएक दुर्गुणांनी युक्त असे आपण, कितीतरी मोलाचे क्षण वाया घालवीत असतो. आपण सोबत काय आणल आणि काय घेऊन जाणार, काहीच नाही. आयुष्यभर केवळ पैशास महत्व देणारे किंवा स्वतःस उच्च समजून इतरांस तुच्छ लेखंणारे किंवा श्रीमंतीचा।/ शिक्षणाचा / उच्च  पदाच्या नोकरीचा अभिमान बाळगणारे समाधानी आहेत काय? एक तरी क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात असा येतोच की तिथे ह्या सगळ्या बिरुदावली काही कामाच्या उरत नाहीत आणि केवळ माणुसकीच (समोरच्याची आणि स्वतःकडीलही) कामात येते व अपेक्षित असते. सरतेशेवटी सगळी गात्र थकल्यावर पैसा, मान-मरातब आणि तत्सम 'कमावलेल्या" गोष्टी कामी येतात काय? इतकाच काय तर आपला जीवाभावाचा जोडीदार, मुले, आई वडील, हे देखील आपल्या शरीराचे कष्ट वाटून घेऊ शकतात काय? नाही. मग संपूर्ण हतबल झालेला मनुष्य शेवटी गुरूला/ सद्गुरुला किंवा त्या ईश्वराला शरण येतो. कुणास सगुण साकार भगवंत आठवतो तर अजून पुढची पायरी समजलेले निर्गुण निराकारास आळवतात. एकूणात भाव एकच, मार्ग निरनिराळे! 

वर्षानुवर्षे अंथरुणाला खिळलेले जीव मृत्यूची याचना करीत दिवस कंठतात. आणि जेवहा तो मृत्यू आपणाला कवेत घेतो, तेव्हाची ती शांतता, आंतर्बाहय! ह्याचाच विचार खूप आधीपासून करीत, सद्गुरुंच्या चरणी लीन होऊन, नामस्मरण करीत आयुष्य जगणारे आहेत, पण थोडे थोडकेच. काही अर्थ त्यांना अवगत झालेला असतो,  ज्यायोगे शांत समाधानी शेवटासाठी मृत्यूपंथ त्यांना कायम स्मरत असतो. 

बाबांनी त्यांच्या कृतीतून मात्र हे ठळकपणे जाणवून दिले, की मला ते प्रकर्षांने जाणवले ते माहीत नाही. परंतु शेवटाआधी ते बऱ्यापैकी अबोल झाले होते. नाहीतर अखंड बडबड करणारे, न आवडलेल्या गोष्टीचा / घटनेचा प्रखर विरोध करणारे, आवडल्यास भर सभेत मोठ्या आवाजात दाद देणारे, नावे ठेवणारे आणि नावही घेणारे, स्वतःच्या जाती धर्माचा, प्रदेशाचा भरपूर अभिमान बाळगणारे असे ते, आजही आठवतात. छाप पाडणारी भरदार व्यक्तिमत्तवाची, प्रसन्न आणि निर्मळ हास्याची मूर्ती आजही जशीच्या तशी नजरेसमोर येते. लग्नानंतर त्यांचा सहवास केवळ सातच वर्षे लाभला. त्यात त्यांना कितपत जाणू शकले ठाऊक नाही. पण हो, मागील वर्षी अंथरुणाला खिळल्यावर त्यांनी सद्गुरुचरणी जी कळकळीने प्रार्थना केली, आणि त्यातूनही बरे होऊन पपूर्वीपेक्षाही चांगल्या आरोग्यानिशी आम्हांत वावरले, ते काहीसे आश्चर्यकारकच होते. भयंकर आजारी असतानाच त्यांनी ' मला माझ्या मनाप्रमाणे मरण हवं ' अशी खूणगाठ मनाशी बांधली असावी असे वाटते. कारण कुठलही काम त्यांनी मनाविरुद्ध केलं नव्हत. मग मला अस आजारी पडून हतबल झालेला लाचार मनाविरुद्ध मृत्यूचा प्रवास  नको, तर  हसत खेळत, दुसऱ्यांच्या मनात माझ्या वागण्याने एक कायम स्थान करून, शान्त आणि समाधानी मरायचंय, हा त्यांचा ध्यासच होता जणू! आणि खरंच अगदी तसच मरण आलं त्यांना. मनाप्रमाणे जगले आणि निवर्तलेही! पण मला मात्र रामदास स्वामींच्या या श्लोकातील ' मृत्यूपंथ  या शब्दाचा अर्थ एका वेगळ्या दृष्टींनी विचार करावयास भाग पाडलं ! हा पंथ कुणालाच चुकलेला नाही. तरी देखील आपण आयुष्यभर चुकलेलोच असतो! सतत गैरसमज, ईर्ष्या, हाव, मत्सर आणि बऱ्याच गोष्टीत स्वतःला जखडून ठेवतो. त्या ईश्वराचे चिंतन करण्याऐवजी नको त्या चिंतांच ओझं बाळगत बसतो. मग त्यातून तयार होतात नाना समस्या, मनाच्या आणि शरीराच्या ही! आणि आपण त्या सर्वात खोल खोल रूततच जातो. म्हणून आयुष्यात योग्य गुरु किंवा सद्गुरू लाभणं खूप खूप महत्वाच! शालेय शिक्षण घेऊन, काहीतरी बनून, समाजात नाव कमावून, स्वतःस शहाणे हुशार ज्ञानी समजून मिरवणारे आपण, जेव्हा सद्गुरुचरणी लीन होतो ना, तेव्हा कळत, किती अडाणी आहोत ते. साध्या साध्या, आनंद- समाधान आणि प्रेम देणाऱ्या गोष्टीच आपण विसरून जातो. नव्हे त्या सोडून इतरच उद्योग चाललेले असतात आणि त्यासच शहाणपणा समजतो. 

जीवनातील प्रत्येक पायरी, कर्तव्ये इ. तर आपण करतोच; ते गरजेचेच आहे. शिक्षण घेणे, पैसा कमावणे, गृहस्थाश्रम, एखादा छंद जोपासणे इ. पण याव्यतिरिक्त एक  प्रश्न पडावा, तो हा की माझ्या जीवनाचा उद्देश काय? मला खरं समाधान आणि शांती कशाने मिळेल? असे प्रश्न पडायला लागले कि आपण थोडसा अंतर्मुख होऊन विचार करतो. माझ्यासारखाच तुमचा ही अनुभव आहे की नाही मला ठाऊक नाही, पण आपण सतत काहीतरी शोधत  असतो. सुख? समाधान? आनंद? ऐश्वर्य? नक्की काय शोधतो याचा संभ्रम असतो , पण शोधत असतो हे नक्की.  

जन्माला आल्यापासून आपण वाढत जातो, नव्हे, हळू हळू आपल्या शेवटाकडे आपण सर्वच जण वाटचाल करीत जातो. तो कधी येणार हे ठाऊक नसतानाही! अनेक चढ उतार, सुख दुःख यांचा अनुभव घेत घेत. कधी कधी मन खूप हळवं होता, दुखावल्या जात. पण प्रवास मात्र अखंड चालूच असतो प्रत्येकाचा, न थांबता ! शेवटाच अंतर कमी  करत करत. तो शेवटच शांत आणि समाधानाने  व्हावा आणि आपल्या निर्मात्याचा विसर न व्हावा, ही इच्छा मनात सतत घोळते. 

बाबांच्या  जाण्याने या मृत्युपंथाच स्मरण मात्र खूप ठळक झालय . खूप जवळच्या व्यक्तीचा अनपेक्षित मृत्यू  बघावयास मिळाला म्हणून असेल कदाचित. माहीत नाही. पण एक विचार मात्र खूप खोलवर गेलाय, की आपणासही मनाप्रमाणे शेवट गवसेल काय? 

शुभदा
२८/११/२०१७

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य