स्वातंत्र्य- आपापले

स्वातंत्र्य  - आपापले 

' मला माझ  स्वातंत्र्य खूप प्रिय  आहे. कुठल्याही  परिस्थितीत कुठल्याही कारणासाठी आणि  मुळात कुणासाठीही मी ते गमावू शकत नाही. '

इथे 'मी ' म्हणजे कुणीही बर का! मनुष्य प्राणी , प्राणी , देश, जमात, विचार आणि बरच काही. सजीवांच  म्हणाल तर मूलभूत गरजा पूर्ण झाल्या की स्वातंत्र्याची जाणीव ही सर्वात पहिले! त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मनुष्य! तस प्राणी असो वा पक्षी , त्यांनाही स्वातंत्र्य प्रियच आहे.  मात्र, त्यांनी निसर्गाच्या नियमांच पालन अजूनही चालू  ठेवल्याने ' स्वातंत्र्य ' हां विषय असा  काही फार अधोरेखित होत नाही. पण ... पण  जेव्हा हां स्वार्थी मनुष्य स्वत:च्या मनोरंजनासाठी म्हणा  किंवा इतर काही हेतूने या प्राण्यांच्या आणि एकंदरीतच निसर्गाच्या जीवनचक्रात हस्तक्षेप करतो, तेव्हा खरा स्वातंत्र्यावर घाला घातला जातो त्यांच्या. मग आलंच, गरज नसताना संघर्ष आणि  पुढील विस्कळीतपणा, सगळ्याच गोष्टींचा!

मनुष्य , मग स्त्री असो वा पुरुष, स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता. कधी कानी कपाळी ओरडून सांगतो तर कधी मूकपणेच, पण मिळवतो मात्र नक्की. ३००-३५० वर्षांपूर्वी 'स्व' राज्य स्थापन होऊन त्यात स्वातंत्र्याचा श्वास घेता यावा या एकाच ध्येयाने आणि हेतूने शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य वेचलं ! अशा उदात्त हेतूने झपाटलेली लोकोत्तर माणसे विरळाच! म्हणूनच शिवराय 'युगपुरूष ' म्हणवले गेले. पण मग त्यालाही (विचाराला) विरोध झालाच आणि 'स्वार्थी' व स्वतः पुरत्या स्वातंत्र्याचे कट कारस्थाने शिजलीच की!

 स्वातंत्र्य जपावं , प्रत्येकाने, आपापलं नक्कीच! स्वाभिमान आणि जगण्याची उम्मेद या गोष्टींना ते पूरकच आहे. पण किती प्रमाणात आणि कशासाठी त्याचा अट्टाहास धरायचा, हे मात्र कळलं पाहिजे. हे न कळता आयुष्याचं गाडं  फसलंच  म्हणून समजा. इथे मग प्रकर्षाने जाणवतं की केवळ 'स्व ' चाच विचार झाला की मग ते स्वातंत्र्य बोचरं वाटू लागतं, जवळच्यांना आणि विस्कटतं सगळंच , हळू हळू, पण पूर्णपणे ! लक्षात येईपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते.

विचारांच्या स्वातंत्र्याचाही तसंच ! किंबहुना हे नियंत्रणाबाहेर असलं की मोठ्या प्रमाणावर घातक ठरू शकतं! स्वतंत्रतेने  विचार करणे नक्कीच चांगले, पण बरोबरीने हे ही तपासायला हवे की व्यवहारात उतरवता येतील का ? कुणी दुखावल्या जाईल का किंवा चुकीचे परिणाम तर नाही ना होणार? थोडक्यात काय, तर सारासार विचार आणि सद्सद्विवेकबुद्धी, या दोन्ही आयुधांनी ' स्वातंत्र्य ' स्वैर न होऊ देता लगाम लावून आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. 'स्व ' च्या आणि इतरांच्याही भल्यासाठीच !!

शुभदा
०४/०४/२०१८


Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य