ग्रीष्मा

**ग्रीष्मा** - कविता ? - नाही, हा तर माझ्याआठवणींचा हिंदोळा
                        - शुभदा जगताप
आपले हरवलेले दिवस, ते क्षण, आठवणीतील सख्या 'ती' ला ग्रीष्मातल्या सायंकाळी खूप खूप आठवतात. सख्या दूर गेल्या .... गेलेले क्षण परतणार नाहीत... मग गुजगोष्टी कराया तिला हीच ' ग्रीष्मा' सखी भावते .... जी दुसरी तिसरी कुणीही नसून ग्रीष्मातली सायंकाळ आहे ....

चौथ्या कडव्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी - मी काही वर्षे आजोळी राहत होते (माझे वय तेव्हा ५-७ वर्षांचे असेल). नंतर कल्याणला आई बाबांकडे कायमची राहायला आल्यानंतर दरवर्षी न चुकता आख्खा उन्हाळा आजोळीच असू. त्या खेडेगावात धनगराचे कुटुंब होते ज्यातील 'भुंगरी ताई' दिवसभर शेळ्या मेंढ्या रानावनात नेत असे.... कधी हट्ट करुन मी ही तिच्यासोबत जाई ...कारण अनेक पायवाटा .... आतलं रान तिला माहिती होते आणि मला भटकंतीची व नवनवीन ठिकाणे - जास्त करून खेडेगावाकडची बघण्याची खूप उत्सुकता असायची जी तिच्यासोबतच्या पायी केलेल्या तंगडतोडीने पूर्ण व्ह्यायची. गावाबाहेरून एक नदी वाहायची.... विदर्भातील असल्याने ती मार्च च्या जवळपासच कोरडीठण पडलेली असायची. फिर फिर फिरून भूक लागली की ती ताई नदीकाठच्या एका झाडाखाली तिने आणलेली भाकरी-भाजी कांदा खायची .... अर्थात मी आडवा हात मारायची त्यावर! नदीपासून लांब असताना सोबत आणलेलं पाणी प्यायचे. मग जेवल्यानंतर तहान लागल्यावर पाण्याचं काय - तर त्यावर तिच्याकडे एक नामी युक्ती होती .... नदीच पात्र कोरडं असायचं , संपूर्ण नदीत एकसारख्या वाळूचा गालिचा पसरलेला. मग ती अंदाजानेच २-४ जागी जाऊन एक जागा निवडायची. हाताने हळू हळू ती वाळू बाजूला करून साधारण अर्धा -पाऊण फूटभर खड्डा करायची आणि माझे डोळे विस्फारायचे... फूटभराच्या आताच पाणी लागायचं आणि हळूहळू तो खडा पाण्याने भरायचा. मग ती वरच २-३ ओंजळी पाणी काढून फेकायची. नितळ स्वच्छ पाणी! पळसाच्या झाडाची पाने घेतलेली असायचीच सोबत.... ती त्याचं द्रोण बनवायचीआणि नदीतल्या खड्ड्यातील पाणी द्रोणाने भरून आधी मला प्यायला द्यायची. त्या पाण्याची चव आणि तिचे ते करुणेने भरलेले डोळे जे माझयाप्रती असलेल्या प्रेमाचे प्रतिकच होते, आजही जसेच्या तसे आठवतात. त्या नदीतल्या पाण्याची चव अमृतापरीसच जणू ! ही कविता लिहिताना रखरखीत ग्रीष्मातली ती आठवण प्रकर्षाने जाणवली आणि चौथ कडवं लिहिल!
धनगर मेंढपाळ काय, आम्ही ट्रेकर्स काय किंवा रानावनात शेतात कष्ट करणारे अन्नदाता शेतकरी काय, निसर्गाच्या खूप जवळ जातो... कुशीत शिरतो .... मग तो ही आपल्याला कधी उपाशी किंवा तहानलेला राहू देत नाही, खरय ना??

ग्रीष्मा
आपले हरवलेले दिवस, ते क्षण, आठवणीतील सख्या तिला ग्रीष्मातल्या सायंकाळी खूप खूप आठवतात. सख्या दूर गेल्या .... गेलेले क्षण परतणार नाहीत...  मग गुजगोष्टी कराया तिला हीच    ' ग्रीष्मा' सखी भावते .... जी दुसरी तिसरी कुणीही नसून ग्रीष्मातली सायंकाळ आहे ....


ग्रीष्मा

ग्रीष्मातली  सायंकाळ
आठवणींचा हिंदोळा 
मन जाय तरंगत 
*अन लहरी अंतरंगात* || १ ||

ती कुणी एक प्रिय 
होती सखी साजिरी 
अगणित गुपिते उराशी
*आठव तिचा हुंदक्यात* ||२ ||


तो मदमस्त बहावा
अन गुलमोहरही वेडा 
खुणावायचा कसा 
*रानी चाफा हासत* || ३ ||

त्या कोरड्या डोहपात्री 
तिच्यामागे मी भिरभिर 
अन तिला ते ज्ञात 
*तृष्णा होय तृप्त* || ४ ||


ती मंद झुळुक वा-याची 
मी माझ्यातच हरवलेली 
संधीप्रकाशही सोबतीला 
*टपोर मोती डोळ्यात* || ५ ||

आठवणींचा सोहळा सारा 
काय सांगू काय जपू
न फिरुनी जाणं आता 
*समंजस भाव मनात* || ६ ||

सायंकाळ ही ग्रीष्मातली 
तिचीच वाट नेत्री 
गुजगोष्टी आता कराया 
*प्रिय सखी जीवनात* || ७ ||


कल्याणी (शुभदा जगताप)
*२ मे २०१९*

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य