परजीवी (Parasite - a  Korean movie )

भन्नाट कथा काय असते आणि त्या कथेला पडद्यावर तितक्याच अफलातून प्रकारे दिग्दर्शन करून सादर करणे काय प्रकार असतो, ते हा कोरियन चित्रपट
पॅरासाइट पाहून अनुभवले. सुरुवातीला कॉमेडी असावा असे वाटून आपण चित्रपट बघतो, हसवतोही तो आपल्याला आणि नकळतपणे तो समाजातील भयानक दरीच्या (जी गरीब श्रेमंतांमधील आहे) प्रश्नाला कधी स्पर्श करतो ते कळतही नाही. २०१९ च्या कान्स फिल्म फेस्टिवल ला Palme d'Or या सर्वोच्च पुरस्काराचा मानकरी ठरलेला आणि अजून अनेक पुरस्कारानी सन्मानित हा चित्रपट सध्या आपल्या चित्रपटगृहात इंग्लिश सबटायटल्स सोबत दाखवला जातोय. एक अप्रतिम कलाकृती बघण्याची संधी चित्रपट रसिकांनी गमावू नये असे मला वाटते.

दक्षिण कोरियन दिग्दर्शक बॉन्ग ज्यून-हो याचा हा चित्रपट म्हणजे समाजातील भयानक वास्तव - जे गरिबी आहे त्यावर बेमालूमपणे फटके ओढणारी एक उत्कृष्ट कलाकृती आहे. एकीकडे हातात काम नसल्याने रोजच्या जेवणाची ही मारामारी असलेल चौकोनी कुटुंब, तर दुसरीकडे एक गर्भश्रीमंत कुटुंब व स्वतःचे घरगुती प्रश्न आणि त्यांचा गरीब लोकांसाठीचा दृष्टिकोन व विचार, या मध्यवर्ती कथानकाभोवती संपूर्ण चित्रपट फिरतो. मित्राच्या कृपेने त्या गर्भश्रीमंत कुटुंबातील मोठ्या मुलीला इंग्रजी ची शिकवणी देण्याचे काम चित्रपटातीळ तरुण हिरो ला मिळते आणि मग शक्कल लढवून त्याचे कुटुंबीय एक एक करून कशा प्रकारे तो त्या घरात घुसवतो हे फारच गंमतीशीरपणे सादर केले आहे. छोट्या छोट्या संवादातून आणि प्रसंगातून मस्त कॉमेडी वळण घेत घेत हा चित्रपट तिथे येऊन थांबतो जिथे त्यांच जुन्या नोकारासमोर पितळ उघड पडत आणि ते मालकाला समजू नये म्हणून झालेली झटापटी आणि त्यात अपेक्षित नसलेले प्रसंग ज्या प्रकारे घडतात तो खरा ह्या चित्रपटाचा टर्निग पॉईंट आणि प्रेक्षकाला भेदरवणाराही. कारण कॉमेडी च्या साच्यातून हा नेमका असा ब्लॅक कॉमेडी कडे वळतो आणि क्लायमॅक्स तर इतका भयानक आणि अनपेक्षित घडतो की खुर्चीला टेकलेले आपण कधी पुढे होऊंनअस्वस्थ व हताश पणे ३ कुटुंबांची वाताहत समोर पडद्यावर बघतो, ते आपलं आपल्यालाही कळत नाही. चित्रपट खूप काही सांगून जातो, मन सुन्न करतो आणि विचार करावयास नक्के भाग पाडतो.

साध्या वस्तीत एका इमारतीच्या बेसमेंट मध्ये राहणारे कुटुंब कामानिमित्त जेव्हा त्या उच्चभ्रू वसाहतीतल्या घरात जात, तेव्हा आपण नककी जगतोय की मरण येत नाही म्हणून फक्त आयुष्य रेटतोय याचा त्या चौघांचा गहन उहापोह, एक क्षण आपणास अंतर्मुख करतो. कमीत कमी संवाद असूनदेखील चित्रपट आपलयाशी खूप परिणामकारी संवाद साधतो. या चित्रपटात प्रत्येकच जण मला हिरो वाटला. प्रत्येक कलाकाराचं काम आणि अभिनय जबरदस्त! नुसती कथा आणि दिग्दर्शनच तगड असून चालत नाही तर त्याला पडद्यावर सादर करणारे कलाकार ही तितकेच प्रगल्भ आणि ताकदीचे असावे लागतात. ह्या चित्रपटाची भट्टी त्या बाबतीत सर्वच अंगाने उत्तम जमली आहे. आणि अर्थात दिग्दर्शकाला जे हवय ते प्रत्येक कलाकारांकडून काढून घ्यायचं कसब इथे नक्केच दिसत!
मूठभर माणसांची वर्चस्व गाजवण्याची वृत्ती आणि माणसालाच माणूस म्हणून वागणूक न देण्याची कृती या चित्रपटात प्रकर्षाने जाणवते. मूठभर श्रीमंत लोक अजून श्रीमंत कसे होतील आणि गरीब अजून गरीब होऊन कसा कायम दबलेला राहील, या मनोवृत्तीचा प्रत्यय जगात जवळपास सगळीकडेच जाणवतो. मग जोकर (इंग्लिश) या चित्रपटातील संपूर्ण पिचलेला समाज रस्त्यावर उतरण असो किंवा पॅरासाइट मधील केवळ एका कुटुंबाचा दुसर्याशी झालेला संघर्ष असो, ह्या गरीब श्रीमंत दरीने अशा ठिणग्या पेटतच राहणार, हे नाकारायला नको.

दुसर एक जे या कथेत मला जाणवलं ते म्हणजे कर्मगती. अगदी सहज आपण सगळे या घरात घुसून पैसे कमाऊ अस वाटत असताना, तेथील आधीच्या नोकरांना खोटेपणाने हे लोक काम सोडून जाण्यास भाग पाडतात, तिथे कुठेतरी मन खट्टू होत. आपलं जीवन सुधारण्यासाठी दुसरयांच्या पोटावर लाथ मारणे कितपत योग्य? कुठेतरी कर्मगती नेमकीच आडवी येते आणि होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागत नाही, हे ही या चित्रपटतात पाहायला मिळत. शेवटी parasite म्हणजे परजीवी/ परोपजीवी वनस्पती किंवा प्राणी, दुसर्याच्या श्रमांवर जगणारा, असा शब्दशः अर्थ. अगदी प्राथमिक गरजाही पूर्ण होत नसतील तर तर एखाद गरीब कुटुंब शक्कल लढवून श्रीमंत कुटुंबावर कस पोसल जाऊ शकत याच ब्लॅक कॉमेडी स्वरूप म्हणजे हा चित्रपट! पण कथालेखक आणि दिग्दर्शकाला नक्की कुणाला parasite म्हणायचंय (ललित अर्थाने) त्यांचं तेच जाणे!


शुभदा जगताप जाधव
डोंबिवली, १७/०२/२०२०

तळटीप: चित्रपट पाहिल्यानंतर मला काय वाटले ते लिहिण्याचा/ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हे असच आहे अस अजिबात म्हणणं नाही. पण चित्रपट अतिशय चांगला आहे आणि ज्याने त्याने तो पाहून आपापले मत बनवावे. पण २५०-३०० रुपये तिकिटावर खर्च करून अगदीच टुकार चित्रपट बघण्यापेक्षा हा चित्रपट पाहावा असे मनापासून वाटते!


Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

सहावी दुर्गा - पद्मजा