पुस्तक परिचय - एक भाकर तीन चुली

 पुस्तकाचे नाव  -  एक भाकर तीन चुली  

  भाषा - मराठी  

 लेखकाचे नाव - श्री देवा झिंजाड 

 प्रकाशन    -   NEW ERA Publishing House 


 परिचय कर्ती   - शुभदा जगताप जाधव, सातारा. 



शिव-शक्ती , मधील शक्ती हे स्त्रीचे रूप ... 

शक्ती - शारीरीक, मानसिक की दोन्ही?

ती जर शक्तीचं रूप आहे , तर मग सर्वात जास्त (तुलनेने) अन्याय-अत्याचार तिच्यावरच का होतात ? 

आणि या सगळ्याला तोंड देत देत शेवटच्या श्वासापर्यंत मातृत्व टिकविण्याची तिची जी धडपड आहे, त्यात तिच्या सहनशक्तीचा कस लागतो, तर तिने तरी कुठवर धीर धरावा? 


हे  असे  एक ना अनेक प्रश पडत राहतात, दोन्ही डोळ्यांना धारा लागतात आणि वाचतोय ते सर्वकाही आपल्या समोर घडत आहे परंतु आपण हतबल आहोत, काहीच करू शकत नाही; फक्त निमूटपणे ते बघत राहणे आणि हळहळ  व्यक्त करणे - ती सुद्धा मनातल्या मनातच.... एवढेच आपल्या हाती आहे ... 


बाई -माणसाने किती तडजोडी कराव्या?

नवरा मेल्यावर अशा गावात जिथे रूढी-परंपरांना अन्यन्यसाधारण महत्व आहे, तिने किती कष्ट उपसावे?

तारुण्यात (त्या काळी - म्हणजे जवळपास ६०-७० वर्षांपूर्वी) तिने स्वतःचे शील जपण्यासाठी किती वेळा दुर्गा-आणि काली बनाव? आणि आत्मरक्षण करूनही नको ते खोटे-नटे आळ समाजाने घेऊन तिला वाळीत टाकल्यावर तिने काय करावे? कुठनं बळ आणावं? पोटाच्या लेकरांचा त्याग करून गाव सोडून तिने जावे-तरीदेखील तिने रडूही नाही आणि पुन्हा लेकरांना भेटूही नाही? हा कुठला अजब न्याय?

आणि  हे आगळ आपल्याच देशात -  महान अशा राष्ट्रात - महाराष्ट्रात घडते, हे कटू सत्यही आपण पचवायचे ...  


वयाच्या १० व्य वर्षी ५० वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत लग्न लावून दिल्यावर आई-वडिलांना का सोडून जायचं आहे, हा प्रश त्या निरागस मनाला पडतो, तेव्हा काळीज हेलावून जातं.... 

त्यात वैधव्य आल्यावर अनेक वर्ष आई-वडिलांनी सांभाळले म्हणून ठीक, नाहीतर काय झाले असते, या कल्पनेनेच थरथर होते. 

मग पुन्हा एक लग्न... सासरचे मायाळू पण भाऊ-बंदकी जगणे मुश्किल करताना, तिने किती गप्प बसावं? हात जेव्हा अब्रूपर्यंत येतात, तेव्हा  तिच्यात असामान्य बळ यावं आणि तिचं ते रूप बघताना आपण मनोमन तिला प्रणाम करावा... 

पण हे चटके कुठवर सोसावे?

तिसऱ्यांदा लग्न झाल्यावर वयाच्या ४५ व्या वर्षी पुन्हा आई व्हावं, तेव्हा आज आपण मुली भविष्याचा-मुलांचा किती विचार करून प्लांनिंग करतो, तिने काय करावं? पुन्हा एकदा सहचर अर्ध्यावर वाट सोडून गेल्यावर तिने लेकराला एकटीने कसे वाढवावे? पुन्हा स्वतःला वखवखत्या नजरांपासून रोजच वाचवत रहावं... किती ही अग्निपरीक्षा? 

 

आज आपल्या मुलांच्या विवंचना या की आईने प्रॉमिस केले त्याप्रमाणे आईस क्रीम ती देईल का?, कुठे फिरायला नेणार? पुढील वर्गात जाताना सगळं नवीन घेऊन देणार ना? चांगले मार्क मिळाले तर पिझ्झा पार्टी करणार ना? ...इत्यादी...इत्यादी ... मागण्या संपतच नाही .... 


आणि त्या पारूचं लेकरू जमेल तेवढे कष्ट करून दा\र-वर्षी शाळेत पहिला येतो, त्याला साखरेचे दोन दाणे मिळायला ७वी पास ची वाट बघावी लागते, अनवाणी अनेक मैल चालत जावे लागते, गुन्हा नसताना मरेस्तोवर मर खावा लागतो.... अशा मुलाच्या बाल \-मनाचा scientifically psychological study केला तर किती अनपेक्षित निकाल दिसतील डॉक्टरांना? आणि एवढं असूनही शिक्षणाची कास - शिकून मोठ्ठं होऊन आईला सुखात ठेवण्याची इच्छा मात्र मरत नाही, अशा बालकाचा EQ कुणी मोजावा? त्याला किती पुरस्कार द्यावेत??? त्याची आणि आईची ताटातूट झाल्यानंतर त्यांनी तो विरह कसा सोसावा? मी किती काळ माझ्या मुलांपासून त्याच्या कोवळ्या वयात लांब राहू शकेन?

आणि बरच काही ... 

लिहिता न येण्याजोगं ... 

अनेक प्रश्न ... उत्तरं नसणारी ....  

  

अशी जी काही संपूर्ण मानसिक अवस्था आणि त्याचे विदारक चित्र तयार होते ना - त्याचा कॅनव्हास म्हणजे ही कादंबरी - एक भाकर तीन चुली. 


या कादंबरीबद्दल जेव्हा ऐकले / वाचले (बहुदा आपल्याच समूहावर) तेव्हा तातडीने श्री देवा झिंजाड यांचेकडून "सगळं उलथवून ...." आणि ही कादंबरी मागवून घेतली. तिसऱ्या दिवशी मिळाली आणि अधाशासारखं वाचायला सुरुवात केली ... रोज रात्री ३-४ पानांशिवाय जास्त वाचून होईना...कारण डोळेच इतके डबडबले असायचे... लेखकाने लिहिली कशी असेल, याचा विचार अस्वस्थ करून गेला... मग मन पक्के केलं, आणि पुन्हा वाचायला घेतली ... वाचून काढली... म्हटलं बघुयात ती शक्ती परिस्थितीपुढे हात टेकते की परिस्थिती तिच्यापुढे.... 


समाज संवेदनशीलता हरवून बसतो, रूढीत अडकतो आणि दुसऱ्यावर स्वामित्वाची मनुष्याची सुप्त वासना जेव्हा जेव्हा फणा काढते, तेव्हा तेव्हा पारू सारखे आयुष्य घडतात... तसे पुन्हा पुन्हा घडू नये, हीच विधात्याला प्रार्थना!! 


अनेक जीवघेण्या,अपमानास्पद आणि रोजच्याच गरिबीच्या - दोन वेळच्या अन्नाला मोहताज असणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करून या माय -लेकरांनी शिक्षणाची कधी आस सोडली नाही, प्रसंगी पोटाला चिमटे देऊन रात्र काढली पण शाळा बुडवली नाही .... कुठून येत हे बळ, ही जिद्द आणि ही उम्मेद ... ???


कदाचित परमेश्वर असे आत्मे यासाठीच बनवतो कीं त्यांच्याकडे बघून म्हणावं - उम्मेद पे दुनिया कायम है! 


परिचय करून द्यावा, अगदी नेहमीच्या ढाच्यात, इतकी ही कादंबरी ; नव्हे जीवन-कथाच, सोप्पी नाहीये. संपूर्ण कादंबरी जरी वाचून झाली तरी बरंच धैर्य आहे, असं मी तरी म्हणेन. 

एका असीम जिद्दीच्या स्त्रीची कर्म-कहाणी (जी निश्चितच खरीच असणार, यात शंका नाही, अन्यथा एवढे बारकावे कुठून येणार?) भयंकर वेगाने बघायची असेल  तर ही कादंबरी प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचावीच... कदाचित तिच्यावर झालेल्या अन्यायाला या समाजाचा एक घटक म्हणून आपण जर स्वतःला जवाबदार मानत असलो, तर तिची मनोमन क्षमा मागण्याची ही कृती ठरावी. 


बाकी फार काही लिहू शकणार नाही. 

ज्याने-त्याने आपापला अनुभव घ्यावा .... हो, पण मन अगदी अगदी निगरगट्ट - घट्ट करूनच!!


धन्यवाद!

जय हिंद.

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

सहावी दुर्गा - पद्मजा