चित्रकाव्य
अनुबंध
रातीच्या राणी तुझं
गुपित असं काय गे?
कुणासाठी गंध तू
माझ्यासंग धाडी गे??
माझं हे गुपित माझ्या
मनाच्या कुपीत रे
तुला का सांगू मी
तू माझा कोण रे??
तुझा मी सवंगडी
सखा अन सोबती
तुझ्याच संगती रोजच्या
माझ्याही राती सुगंधी....
पण कुणासाठी फुले तू
अजून मला सांगत नाही
का गे एवढं गुपित तुझं
गूढ गूढ होत जाई??
अरे वेड्या कसे तुला
अनुबंध आपुले कळत नाही?
तुझ्याविना जीव माझा
कुठंही असा रमत नाही...
रातीच्या शांत अन
एकांताच्या वेळी रे
न बोलता दो जीव
एकमेका साद घाली रे
तिची हाक त्याला रे
जेव्हा सुगंध माझा
तुझ्यासंगे दूर दूर
तू पल्याड वाहतो रे....
माझा गंध तुला अर्पून
मीही तुझी होते रे....
तुझी माझी संगत अशी
जिवा शिवाची जोडी रे...
कळलं तुझं गुपित राणी
रातीला तूझा बहर का
मी ही वेडा धुंद होतो
रातराणीच्या मोहात या....
-कल्याणी (शुभदा जगताप)
29/01/2022
Comments
Post a Comment