पुस्तक परिचय: स्त्री जाणिवा आणि स्त्री संवेदन एक अभ्यास

 आम्ही पुस्तकप्रेमी

सप्ताह क्रमांक : २६७

१९ ते २५ ऑक्टोबर

पुस्तक क्रमांक : ०१

आजची दिनांक : १९/१०/२०२६

पुस्तकाचे नाव: स्त्री जाणिवा आणि स्त्री संवेदन एक अभ्यास
लेखिका : रचना

प्रकाशन: साहित्यक्षर  

पृष्ठ संख्या: 246 

मूल्य:  रु. 300/-

परिचयकर्ती शुभदा जगताप जाधव, सातारा.

फोन नंबर 9987515657








आज नवरात्राची नववी माळ. आज अष्टमी आणि नवमीची तिथी एकत्र आली असे कॅलेंडर सांगते आहे.

 घटस्थापने पासून म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आज चढत्या ऊर्जेने ही नवरात्र आपण सगळेजण साजरे करतो. यामध्ये स्त्रीला मध्यवर्ती ठिकाण आहे. स्त्री शक्तीची पूजा दुर्गा मातेच्या रूपात आपण सगळे करतो. ह्या स्त्रीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे स्वतः आदियोगी शिवशंभू ने हे दाखवून दिलं की तो स्त्री शिवाय अपूर्ण आहे. अर्ध-नारी-नटेश्वर हे त्याचेच एक रूप. 

 अनादी काळापासून शक्तीची  पूजा आपण आपल्या पुराणांमध्ये वाचत आलो आहोत. 

 जेव्हा ब्रम्हा विष्णू महेश या तिघांनाही आपापल्या उच्चतम आयुधानी देखील महिषासुराचा वध करणे शक्य झालं नाही तेव्हा एका अशा शक्तीची निर्मिती झाली जी या तिघांचीही तीनही आयुध धारण करू शकेल आणि तिने त्या महिषासुराचा वध केला. 

 यातून आपल्याला काय कळतं, तर अगदी सामान्य बुद्धीने विचार केला तरी देखील हे कळतं की शक्ती जी स्त्रीलिंगी आहे ती  संपूर्ण निर्मिती प्रक्रियेच्या उगमस्थानी आहे. पुरुष आणि प्रकृती हे दोन भिन्न लिंगी असले तरी एकच आहेत आणि त्या दोघांचे मिळून एकच जे ऊर्जा रुप तयार होते, ते या विश्वात सगळीकडे सामावलेले आहे. आणि या पृथ्वीतलावर आपण नर आणि मादी यांच्या संयोगाने चालत असलेल्या अव्यहात चक्राच्या रूपात ते बघत आहोत. 


 पूर्वीच्या काळी स्त्री आणि पुरुष असा भेदाभेद अजिबातच नसावा. पूर्वीचा काळ म्हणजे अगदी अगदी अगदी अगदी अगदी पुराण काळ आणि त्यानंतरचाही काळ, आतापर्यंतचा जेव्हा स्त्रीला चूल आणि मूल ह्यातच अडकवलं गेलं नव्हतं तोपर्यंतचा.  कारण रामायणातही आपण बघितले की कैकेयीने दशरथास युद्धामध्ये मदत केली.  महाभारतातही अनेक स्त्रियांचे कर्तुत्व आपण जाणून आहोत. आपल्याकडे मराठा राजपूत यांच्या इतिहासामध्येही आपण अनेक लढवय्या स्त्रिया बघितल्या. अहिल्याबाई होळकरांसारख्या अतिशय श्रद्धाळू आणि आध्यात्मिक वाटेवर चालणाऱ्या स्त्रियांनी केलेले समाजातील बदल बघितले. 

 त्याचबरोबर सतीच्या प्रथाही आपण पहिल्या आणि आज देखील स्त्री पुरुष समानता हा विषय अगदी महत्त्वाचा चर्चिला जाणारा असला तरी देखील अनेक ठिकाणी आपल्याच आजूबाजूला स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार या घटना ऐकू येतच असतात.

 जे दिसत राहतं ऐकू येत तेवढेच आहे का, तर नाही त्याहीपेक्षा एक वेगळा विषय आहे तो म्हणजे उघड उघड व्यक्त न करू शकणाऱ्या भावना!!


 आपल्याच आजूबाजूच्या काही संवेदनशील स्त्रियांनी या परिस्थितीवर त्यांच्या कवितांच्या माध्यमातून भाष्य करण्याच ठरविलं आणि अशा निवडक 15 कवयित्रींच्या काही निवडक कवितांवर अभ्यास केलेलं भाष्य केलेलं एक पुस्तक म्हणजे आजच्या माझ्या पुस्तक परिचयासाठी निवडलेलं पहिलं पुस्तक.


 पुस्तकाचे नाव आहे स्त्री जाणीव आणि स्त्री संवेदन एक अभ्यास.

 हे पुस्तक खरोखरच अभ्यास करूनच समजून घ्यावं लागेल असं आहे. 

 सर्वात मोठी आश्चर्याची बाब म्हणजे याची लेखिका रचना आहे आणि तिच्याबद्दल संपूर्ण पुस्तकात मलपृष्ठावर देखील काहीही नाही. फक्त तिचा फोन नंबर दिलेला आहे. आपल्या पठडीतल्या पुस्तकांपैकी हे नाही किंवा ही लेखिकाही नाही असे साधारण मला जाणवले. 

 स्त्री ला माणूस समजणाऱ्या विचारधारेला हे पुस्तक समर्पित आहे. 

 पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके आहे. अनेक भूमिका जी स्त्री निभावत आली आहे आणि आजही निभावते आहे त्या थोडक्यात इथे रेखाटलेल्या दिसतात. 

 खरंतर हा एक संशोधन प्रकल्प आहे कारण प्रकरण पहिले जे पार्श्वभूमी आणि प्रयोजन हे आहे त्यामध्ये लेखिका संशोधन प्रकल्पाची उद्दिष्टे नमूद करते. एकूण आठ मुख्य उद्दिष्टांपैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या कवयित्रींच्या  कवितेमधील स्त्री जाणीवा आणि स्त्री संवेदन यांचा अभ्यास करणे.

लेखिकेने संशोधनासाठी निवडलेल्या एकूण 15 कवयित्रींपैकी आपल्या सातारा जिल्ह्यातील दोन कवयित्री आहेत हे मी इथे आवर्जून नमूद करते.

 लेखिका सांगते की या कवयित्रींची निवड करण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे या कवयित्रीचे लेखन हे 2000 नंतरचे आहे या वेगवेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या कवयित्री आहेत. यापैकी काही गृहिणी असून काही नोकरी करतात. या कवयित्रींच्या वयातही अंतर आहे. तरी त्यांनी या सहस्त्रकाची वीस वर्षे पाहिलेली आहेत. प्रत्येकीची कविता ही वेगळी असून तिचा प्रकृतीधर्म वेगळा आहे. विषयांचा सारखेपणा जाणवला तरी अभिव्यक्तीची पद्धत वेगळी आहे.


उदाहरणादाखल काही कवितांच्या काही निवडक ओळी बघूया....


 बाईपणान मला आखून दिलेल्या चौकटी

चौकटीच्या आतल्या अन बाहेरच्याही

चालण्या बोलण्याच्या आणि जगण्यासाठी जगण्याच्याही....

 ही कविता आहे डॉक्टर भाग्यश्री यशवंत यांची. त्या डोंबिवलीच्या आहेत आणि पेशानेही त्या डॉक्टरच आहेत.


इंग्रजी आणि मानसशास्त्र या विषयात बीए बीएड केलेल्या सौ मनीषा पाटील यांच्या कविता अगदी मनाला स्पर्शून जातात.


 जेव्हा उतरवले जातात

 तिचे एकेक अलंकार

 हिरवाकंच रंग पारखा होतो तिच्या रांगोळीला....


आपल्याच समूहातील सौ सावित्री जगदाळे यांच्याही काही निवडक कविता या पुस्तकात लेखिकेने अभ्यासासाठी निवडल्या आहेत. काही निवडक कवितांवर लिहिताना लेखिका म्हणते...  'बहराचा आणि पानगळीचा असे दोन ऋतू असतात.  माणसाच्या आयुष्यातही सुखदुःखांचे असे दोन ऋतू असतात. बहराचा  ऋतू आला की पोपटी पालवी फुटते पण पानगळ झाली की मनाला ती गोष्ट लागून राहते.'


 भुईतून उगवले 

भुईतून मिळवली 

एकच सगळे सगळे 

मुळातच परतले.

 

सृजनाचा हा उत्सव पाहणे मुळांच्या  नशिबी नसते कारण झाडाला उभे करण्यासाठी त्यांनी स्वतःला मातीत गाडून  घेतलेले असते.


वैशाली मोहिते यांची ती राधा... ती सीता ही कविता वाचताना खूप खोल अर्थ जाणवला...

 ती राधा होणार होती त्याच्यासाठी तिन सीता देखील व्हायचं ठरवलं होतं

 ती राधा होणार म्हटल्यावर तो कृष्ण व्हायला एका पायावर तयार झाला 

त्याला राधा तर हवीच होती आणि कृष्णा सारख्या सहस्त्र नारी सुद्धा...! 

 आणि ती सीता होणार म्हटल्यावर तो खुश झाला

पण त्यानं राम व्हायला अजून होकार भरलेला नाही....!


असे हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे. अभ्यासपूर्ण लिहिलेले आहे आणि 15 कवयित्रींच्या प्रत्येकीच्या 10 अशा कविता यामध्ये समाविष्ट आहेत. विस्तारभयास्तव सगळ्याच कवयित्रींच्या कविता समाविष्ट करू शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व!  मला हे पुस्तक खरंच मनापासून आवडले आणि कधीही हे हातात घेऊन कुठलेही पान उघडून वाचू शकता असेही आहे.


धन्यवाद !!

शुभदा.

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ९. चिरतरुण आशा (ताई)

मृदा