पुस्तक परिचय:मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा

 आम्ही पुस्तकप्रेमी

सप्ताह क्रमांक : २६७

१९ ते २५ ऑक्टोबर

एकूण पुस्तक क्रमांक: १८७४ - १८८०

पुस्तक क्रमांक : ०६

आजची दिनांक : २४/१०/२०२६

पुस्तकाचे नाव: मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा

लेखक: अमर श्रीरंग साळुंखे

प्रकाशन: न्यू इरा  पब्लिशिंग हाऊस पुणे.  

पृष्ठ संख्या: २९३ 

मूल्य: रु. ४००/-

परिचयकर्ती शुभदा जगताप जाधव, सातारा.

फोन नंबर 9987515657



 'राष्ट्र प्रेमाची भावना उरात घेऊन राष्ट्रासाठी घरदार आणि जन्मभूमी सोडून दूर दक्षिणेतील कर्मभूमीत हाडांची माती होईपर्यंत स्वराज्याचा झेंडा अभिमानाने मिरवणाऱ्या त्या ज्ञात अज्ञात मराठा वीरांच्या चरणी, कैलासवासी दुर्ग महर्षी प्रमोद जी मांडे सर यांच्या प्रेरणेतून हे पहिले पुष्प समर्पित.' 

🚩🚩🚩

 ही आहे अर्पणपत्रिका.  आजचे माझे परिचयास घेतलेले पुस्तक आहे मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा आणि याचे लेखक आहेत अमर श्रीरंग साळुंखे. लेखक स्वतःचे नाव लिहिताना कंसामध्ये भाऊ मराठा असे लिहितात. 





 न्यू इरा पब्लिशिंग हाऊस पुणे यांचेतर्फे 20 नोव्हेंबर 2023 रोजी प्रथम आवृत्ती आणि 10 सप्टेंबर 2024 रोजी दुसरी आवृत्ती निघालेले हे अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक!! 


 सुरुवातीची पाने म्हणजे प्रस्तावना, मनोगत आणि ऋणनिर्देश तीनही लेखकानेच लिहिलेले आहे.

 त्यानंतर अनुक्रमणिका ज्यामध्ये एकूण ११ प्रकरणे आहेत आणि ती - 

1. मंदिरे 

2. छत्रपती शिवाजी महाराजांची शिल्पे 

3. मराठ्यांनी बांधलेले किल्ले

4. मराठ्यांनी बांधलेल्या इमारती

5. मराठ्यांनी नष्ट केलेली ठाणी

6. मराठ्यांनी वसवलेली गावे

7. मराठ्यांच्या लढाया

8. मराठ्यांच्या अपरिचित समाध्या

9. मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी शहरे

10. मराठ्यांचे शिलालेख आणि

11. मराठ्यांच्या राजधान्या

 - अशाप्रकारे लिहिली गेलेली आहेत.


 पुस्तकात अनेक महत्त्वाची छायाचित्रे काही कृष्णधवल तर काही रंगीत स्वरूपात दिलेली आहेत. 


या पुस्तकाची शेवटची पाच पाने पान क्रमांक 289 ते 293 ही केवळ संदर्भसूची आहे.!! 🙏🏻🙏🏻



 'औरंगजेबाने मराठ्यांच्याच फितुरीचा उपयोग करून संभाजी महाराजांना पकडले आणि धर्मरक्षणासाठी या धर्मवीराने आपल्या प्राणांचे बलिदान दिले.  ही बातमी रायगडास पोहोचली त्यावेळी त्यागमूर्ती येसूबाईंनी *मराठ्यांचा एक तरी राजा जिवंत असावा म्हणून राजाराम महाराज व ताराराणी यांना मोठ्या शिताफीने वाघ दरवाज्यातून खाली उतरवून पुढे दक्षिणेकडे जिंजीपर्यंत जाण्यास सांगितले. नंतर औरंगजेबाने येसूबाई व शाहू महाराजांना आपल्या ताब्यात घेऊन 27 वर्ष महाराष्ट्रात धडपड करीत राहिला पण मराठे काही हाती आले नाही आणि शेवटी तो पाय घासून इथे महाराष्ट्रातच मेला. येसूबाई आणि शाहू महाराजांची सुटका आणि तिथून परत येऊन सातारा ही राजधानी म्हणून वसवल्या गेली.' 

 इथपर्यंत आमच्यासारख्या जवळपास सर्वच इतिहासप्रेमींना ठाऊक आहे.

 पण राजाराम महाराज व ताराराणी जिंजीस कशा राहिल्या? छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय ही मोहीम हाती घेतल्यानंतर जिंजीपर्यंतच राज्य कसं मराठ्यांच्या ताब्यात आलं, आत्ता आपल्या मराठ्यांच्या पाऊलखुणा दक्षिण भारतात नक्की कुठपर्यंत आहेत, याची किती माहिती आपल्याला आहे किंवा ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो?? 


 हे पुस्तक जेव्हा एका प्रदर्शनात दिसलं तेव्हा अक्षरशः त्यावर झडप घालून मी ते विकत घेतलं. 

मला स्वतःलाच दक्षिणेतील  जिंजी आणि एकूणच मराठ्यांच्या दक्षिणेतील कामगिरीबद्दल जाणून घेण्याची फार उत्सुकता  होती. पण त्याकरिता अनेक संदर्भ ग्रंथ वाचावे लागले असते आणि रोजीरोटीची कामे सोडून (😃) एवढा अभ्यास करण्याइतका वेळ आणि धीरही (patience) माझ्याकडे नाही याची मलाच खात्री होती.  त्यामुळे हे पुस्तक म्हणजे मला आयता खजिनाच घावल्यासारखा झाला की हो.... 😊


 भरपूर अभ्यास करून अनेक संदर्भ ग्रंथ तपासून त्यातील महत्त्वाचे संदर्भ घेऊन आणि जी सगळी ठिकाणं यामध्ये लेखकाने वर्णिली आहेत त्या ठिकाणांना स्वतः जाऊन भेट देऊन हे पुस्तक लिहिले गेले आहे. इतक्या मेहनतीने अभ्यासपूर्ण हा ग्रंथ तयार झालाय, त्याचा अभ्यास करायला आपल्यालाही वेळ काढावा लागणार आहे. पण हा अतिशय मोलाचा खजिना आपल्या सर्वांसाठीच लेखकाने उपलब्ध करून देऊन आपल्यावर फारच मोठे उपकार झालेत असं माझं मत आहे.


 मंदिरे या प्रकरणात 18 मंदिरे लेखकाने वर्णिली आहेत. तिरुपती बालाजीचे वर्णन करताना लेखक सांगतात की 5 मे 1677 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट दिली होती. एकूण 420 होनांचे वर्षासन महाराजांनी दिले, एवढेच नव्हे तर एक वर्षाची रक्कम महाराजांनी पुरुषोत्तम भट सोमयाग भट बुराडी यांना एकदम देऊन टाकली.  महाराजांनी तिरुपती बालाजीला दिलेले हे वर्षासन हे शिवाजी महाराजांच्या धार्मिक वृत्तीचा एक पैलू आहे. महाराजांनी जे अन्नछत्रासाठी वर्षासन दिले होते ते अन्नछत्र आजही निरंतर चालू आहे. 


 दुसरे प्रकरण छत्रपती शिवाजी महाराजांची शिल्पे यात श्री मल्लिकार्जुन मंदिर श्रीशैलम याविषयी लेखक आपल्याला माहिती देतात - 7 एप्रिल 1677 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिरास भेट दिली. मंदिराच्या उत्तरेला जे गोपूर आहे ते महाराजांनी बांधून घेतल्यामुळे त्या गोपूरस शिवाजी गोपूरम असे नाव आहे. चैत्र पौर्णिमेला म्हणजेच 7 एप्रिल 1677 रोजी शिवाजी महाराजांनी श्रीशैलम या तीर्थक्षेत्राला भेट दिली. या ठिकाणी महाराजांचा नऊ दिवस मुक्काम होत. महाराजांनी मल्लिकार्जुनाच्या मंदिरात खूप दाने दिली. या गोपूरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिवलिंगाची पूजा करत असल्याचे शिल्प आहे. तंजावरच्या सरस्वती महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली एक कविता आहे ती खालील प्रमाणे - 

 नाशिवंत सुखासाठी अंतराला जगजेठी || नाही नाही याते गोडी लक्ष चौऱ्या शीची जोडी ||*मनुष्य जन्म गेल्यावारे काय करशील बारे || शिवराज सांगे जना  म्या तो सोडिली वासना ||


 ह्या कवितेचा भावार्थ लक्षात घेतल्यावर ही कविता शिवाजी महाराजांनी श्रीशैलमाच्या क्षेत्रावर लिहिले असावी असे इतिहासकारांचे मत आहे, ही कविता आप्पासाहेब पवार यांनी प्रकाशित केलेल्या ताराबाई कालीन कागदपत्रे या ग्रंथात देखील समाविष्ट केलेली आहे.


 शेवटचे 11 वे प्रकरण म्हणजे मराठ्यांच्या राजधान्या आणि महत्त्वाची राजकीय ठाणी - यामध्ये जिंजी, बंगरूळ, तंजावर, मुधोळ, गजेंद्रगड, सोंडुर आणि गुत्ती या 7 ठिकाणांचे वर्णन आहे. 

 पैकी एकट्या जिंजी या राजधानीवर पान क्रमांक 210 ते 240 एवढी  प्रदीर्घ अभ्यासपूर्ण माहिती आपल्यासाठी लिहून ठेवलेली आहे.


चंदी म्हणजे जैसे विजापूर भागा नगर तैसाच तक्ताचा जागा येथे राजियांनी राहावे परंतु इकडेही राज्य उदंड- असे जिंजीचे वर्णन आपल्याला वाचायला मिळते.

 

जिंजी शहराच्या दक्षिणेला तिरुव अन्नामलाई- जिंजी रस्त्यावर जिंजी हा किल्ला जिंजी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे.  सात किल्ल्यांचा मिळून बनलेला हा अतिशय बुलंद आणि बेलाग किल्ला या जिल्ह्यातील सर्वात आकर्षक प्रेक्षणीय स्थळ आहे. रायगड आणि राजगड याप्रमाणेच मराठ्यांच्या इतिहासात जिंजी या राजधानीला अनन्यसाधारण महत्त्व आहे; किंबहुना जिंजी किल्ल्याशिवाय मराठ्यांचा इतिहास आणि पराक्रम अपूर्ण आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात जिंजी परिसरात जो पाऊस पडतो तो अक्षरश: जिंजीच्या किल्ल्यासह त्याच्या तटबंद्या आणि इतर बांधकामाला आव्हान देणारा असतो. ग्रॅनाईट खडकांनी बनलेला हा किल्ला जेव्हा पावसामध्ये नाहून निघतो तेव्हा याचे सौंदर्य एखाद्या नवजात बालकाच्या जन्मा पेक्षाही उठावदार आणि सौंदर्यपूर्ण असते. हा खडक जितके पावसाळे खातो तितकाच तो देखणा आणि उठावदार होत जातो. 2018 साली जेव्हा चेन्नई शहर अतिवृष्टीमुळे पाण्यात बुडले होते त्यावेळी या पुस्तकाचे लेखक  किल्ल्यावर हजर होते.  "सह्याद्रीनंतर या किल्ल्यावर होणारी पर्जन्य पर्जन्यवृष्टी मनात धडकी भरवणारी होती. " या किल्ल्याचची संरचना इतकी पद्धतशीर आणि योजनापूर्वक आहे की मागील वीस वर्षात मी कधीही इथे पाण्याचा प्रवाह साठलेला पाहिला नाही तसेच 2019 ला पहिल्यांदा या परिसरातील विहिरी खोल गेलेल्या पाहिल्या. -इति लेखक.


असं किती आणि काय काय तुम्हा सर्वांना मी सांगू असं हे पुस्तक हातात घेतल्यानंतर आणि वाचतानाही होत होतं. अभ्यासपूर्ण पुस्तक आहे आणि ते अभ्यासासारखंच एक एक प्रकरण आणि त्यातील उप-प्रकरण घेऊन वाचून त्यातल्या नोंदी डोक्यात ठेवून त्यांना प्रत्यक्ष भेट देण्यासाठीची योजना आखणं हे आपल्या हाती नक्कीच आहे. 

 (मागील वर्षी आमच्या एका भटक्या समूहासोबत जिंजीला जाण्याचा योग आला होता, परंतु अतिवृष्टीमुळे मी त्यास जाऊ शकले नाही. जिंजीला जाणं एकदा हुकलं तरी माझ्या बकेट लिस्ट मध्ये जिंजीचा नंबर खूप वरचा आहे आणि मी लवकरच या किल्ल्याला भेट देईन 😊.)


 आणि शेवटी - लेखकाने प्रस्तावनेत जे लिहिलय त्यातील थेट काळजात घुसलेल्या काही ओळी- 

1. मराठ्यांच्या स्त्रियांनी फक्त मराठ्यांचे अंकुर उदरी वाढवले नाहीत तर त्यांना न्यायनीती, संस्कृतपणा, सोबत देशाभिमान व मातृभूमीच्या प्रेमाचे धडे देखील दिले. त्यामुळे मराठ्यांच्या कणखर आणि आदर्शवत साम्राज्याचा पाया रचण्यात मराठ्यांच्या स्त्रियांचे मोलाचे योगदान आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

2. आपल्या वाड वडिलांच्या बाप जाद्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा धुंडाळण्याचा प्रयत्न करत नाही. जर आपणच आपला इतिहास शोधला नाही त्याला योग्य न्याय दिला नाही तर त्याच्या पुसत निघालेल्या पाऊलखुणा जपल्या कशा जाणार?

3. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर कधीही घाला न घालणारी ही मराठ्यांची जमात स्वतःच स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी अग्निदिव्य करून इतिहासात अजरामर झाली, ती इतिहासाच्या पानातून हळूहळू लुप्त देखील झाली.  ठराविक नावं सोडली तर बाकीचे कोणाला माहित देखील नाहीत.


धन्यवाद! 🙏🏻


शुभदा. 😊

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ९. चिरतरुण आशा (ताई)

मृदा