पुस्तक परिचय: तेंडुलकरांच्या निवडक कथा
आम्ही पुस्तकप्रेमी
सप्ताह क्रमांक : २६७
१९ ते २५ ऑक्टोबर
एकूण पुस्तक क्रमांक: १८७४ - १८८०
पुस्तक क्रमांक : ०३
आजची दिनांक : २१/१०/२०२६
पुस्तकाचे नाव: तेंडुलकरांच्या निवडक कथा
निवड: नीता भिसे
प्रकाशन: राजहंस प्रकाशन
पृष्ठ संख्या: २९०
मूल्य: रु. ४००/-
परिचयकर्ती शुभदा जगताप जाधव, सातारा.
फोन नंबर 9987515657
मला लहानपणापासून माहिती असलेले एकमेव तेंडुलकर हे आडनाव केवळ आणि केवळ सचिन तेंडुलकर यांच्या अवतीभोवतीच फिरत होते.
कारण बालबुद्धीला क्रिकेट थोडंफार समजत होतं तेव्हा क्रिकेटची क्रेझही खूप होती आणि तेव्हा सचिन खूप फॉर्ममध्ये होता (आजही आहे त्याच्या खेळलेल्या खेळींमधून 😄).
नंतर नंतर प्रिया तेंडुलकर हे नाव कानी पडू लागलं आणि तिला दूरदर्शनवर रजनी या मालिकेतून बघितलं. मराठीतील तिचे एक दोन चित्रपटही पाहिलेला आठवतं.
आणि मग अजून एक मोठा साक्षात्कार झाला तो विजय तेंडुलकर या नावाचा. त्यांची सर्वप्रथम ओळख ही कमला या नाटकामधून झाली. हे नाटक आमच्या आईला एम ए बी एड च्या अभ्यासाला होतं. त्यात ती जेव्हा वडिलांसोबत चर्चा करायची काही नोट्स काढताना मी तिच्यासोबत बसायचे तेव्हा लक्षात आलं की हे एक असे लेखक आहेत की ज्यांचं लेखन हे कायम कुठल्या ना कुठल्या वादात अडकतं. कारण काय तर समाजातल्या अतिवास्तव अशा मुद्दाम दुर्लक्षित गोष्टींवर घटनांवर भाष्य - लेखन करणे. आणि सहाजिकच आहे, सो कॉल्ड हेल्दी सुसंस्कारित म्हणणाऱ्या समाजाला अशा या गोष्टींवर बोलणे, वाचणे आणि त्यावर उघड उघड चर्चा करणे हे पचत नाही. कुठेतरी मळमळ होते आणि मग वादरुपी उलटीच्या स्वरूपात बाहेर पडते.
तर अशा या विजय तेंडुलकर यांच्या काही निवडक कथा नीता भिसे यांनी निवड करून एका पुस्तकात संकलित केल्या आणि राजहंस प्रकाशनाने ते प्रकाशित केलं या पुस्तकाची प्रथम आवृत्ती ऑक्टोबर 2001 ची आणि त्यानंतर अकरावी आवृत्ती फेब्रुवारी 2025 सालची. यावरून लक्षात येईल की हे पुस्तक किती खपाचे आहे.
आणि माझ्या सुदैवाने हे पुस्तक मला दिसलं ते आपल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सातारा येथे.
हातात घेतलं तसं एक एक कथा वाचायला घेतली आणि अचंबित व्हायला जी सुरुवात झाली ती तेंडुलकरांच्या लिखाणाच्या प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास झाला.
या पुस्तकाचे मलपृष्ठ म्हणते -
"मराठी कथासाहित्यात विजय तेंडुलकर यांच्या कथांचे स्थान आगळे ठरावे. एकूणच मानवी जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कमालीचा आस्थेवाईक आहे. माणसांची जगण्याची धडपड अतिसूक्ष्मपणे न्याहाळताना त्यांचे शब्द जणू कॅमेराचा डोळा होतात. आपल्या कथांमधून त्यांनी तत्कालीन समाजमनाचा वेध घेतला आहे. मानवी संबंधातील गुंतागुंत, स्त्रियांच्या नशिबीचा भोगवटा, कलंदरांची ससेहोलपट, बदलत्या काळातले व्यावहारिक संबंध हे सारे त्यांच्या कथांमध्ये अधोरेखित झालेले असते . सामाजिक विसंगतीवरचे मार्मिक मर्मभेदी भाष्य खास तेंडुलकर पद्धतीचे. भाषेची सहजता इतकी अकृत्रीम- इतकी थेट की तेंडुलकर लिहितात आणि अर्थ मनात उमटतो."
खरंतर तत्कालीन समाजमनाला अनुसरून त्यांच्या कथा लिहिल्या गेल्या असल्या तरी आज 2026 मध्ये देखील त्या वाचताना त्यातील पात्र आपल्या आजूबाजूलाच आहेत आणि ती आजच्या काळातही सुसंगत आहेत असे जाणवत राहते.
या पुस्तकातील सर्वप्रथम कथा म्हणजे आमच्यावर कोण प्रेम करणार?
अतिशय मार्मिक अशी ही कथा ज्यामध्ये असा काळ आहे की मुली नऊवारीतच असत. दोन्ही खांद्यांवरून पदर आणि तिला बघायला आलेल्या मुलाने नकार दिल्यानंतर आपल्यात असं काय कमी आहे की आपल्याला नकार मिळावा; म्हणून तो जाब विचारण्यासाठी ती तेव्हा एसटीने त्या मुलाच्या घरी जाऊन त्याच्या आईला भेटून त्याच्यासमोर अतिशय धीटपणे भाष्य करते आणि ते करताना ती हा त्यालाच प्रश्न विचारते की आमच्यासारख्यांवर कोण प्रेम करणार?
आणि हा तिचा सिक्सर असतो असा काही जबरदस्त फटका त्या मुलाला बसतो की तो त्या क्षणी अचंबित होतो पण तोपर्यंत ती निघून गेलेली असते.
काय बोलावे या कथेबद्दल? ही वाचून अनुभवणे हेच खरं.
यातील बॅक सीट ही कथा अशीच जीवाला चटका लावून जाते. एका मोहाच्या क्षणी गावातल्या मुलीकडून घडलेली चूक आणि त्याला निस्तरण्यासाठी शहरात नायकाकडे वडिलांनी घेऊन येणे आणि त्यात तिने आपलं मन उलगडवून त्याला दाखवणे आणि ही चूक घडण्यामागे त्याच्यावरच प्रेम आणि जे तो झेडकारत होता हेच कसं कारणीभूत आहे हे जेव्हा ती नायिका त्याला सांगते तेव्हा खरं तर तो बॅकसीटवर गेलेला असतो. एसटी मधली बॅकसीट आणि त्याचं हे ऐकल्यानंतरच मागे जाणं, या दोन गोष्टींची रूपकात्मक गुंफण इतकी चपखलपणे केली आहे की काय बोलावे.
प्रत्येक कथा वाचताना मी खरोखर स्पिचलेस झालेली आहे त्यामुळे आज या पुस्तकाचा परिचय देताना देखील माझी पुन्हा पुन्हा हीच अवस्था होते आहे आणि तुम्हाला ही पुप वाचताना 'काय बोलावे?' हे कदाचित अनेकदा वाचवं लागणार आहे. 😃
यात मित्रा नावाची ही एक कथा आहे ज्यामध्ये जन्माला मुलगी म्हणून आली असताना तिच्यामध्ये पुरुषाच्या भावना असल्यानंतर जे काय द्वंद घडतं, ह्याच चित्रिण केलेलं आहे.
आणि हे त्या काळात घडलेलं आहे म्हणजे त्या मुलीला हे उघड उघड व्यक्त करणं किती कठीण किंवा नेक्स्ट टू इम्पॉसिबल असावं याची कल्पना येते.
मध्ये बायोस्कोप नावाचा एक चित्रपट आला होता ज्यामध्ये ४ दिग्दर्शकांनी ४ वेगवेगळ्या कथा दाखवल्या होता आणि त्यामध्ये तेंडुलकरांची ही कथा होती.
आणि शेवटचं - या पुस्तकातील मनाला सगळ्यात जास्त भिडलेली कथा म्हणजे अखेरचे दिवस. वाचताना कितीदा तरी मन हेलावून गेलं आणि ती कथा त्यातील अनंतकुमार दंडवते आणि आपला नायक हे जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहिले. ही कथा अगदी आवर्जून पुन्हा पुन्हा वाचावी अशी. स्वतःच्या स्वप्नांवर आणि स्वतःबद्दलच्या अपेक्षांवर विश्वास ठेवून धडपड आणि संघर्ष करणाऱ्या माणसाच्या वाट्याला हा समाज किंवा आजूबाजूची परिस्थिती किती रुक्षपणे क्रूरपणे आणि तटस्थपणे वागते आणि शेवटी तो काय निर्णयाला येतो हे या कथेतून दंडवते आपल्याला दाखवतो; जे की मनाला खूप जास्त त्रासदायक आहे.
सर्व कथांच्या शेवटी कथाकार विजय तेंडुलकर या प्रकरणांतर्गत नीता भिसे लिहितात - तेंडुलकरांच्या कथालेखनाचा सुरुवातीचा काळ हा त्यांचा जगण्यासाठीच्या धडपडण्याचा काळ होता. एकीकडे सर्वसामान्य माणसाप्रमाणे उदरनिर्वाहाची धडपड करताना दुसरीकडे आजूबाजूच्या जगाकडे विशेषतः माणसांकडे त्यांच्या जगण्याच्या संघर्षाकडे ते खूप सूक्ष्मपणे पाहत असणार. साहित्य आणि इतर सांस्कृतिक कलांचं अत्यंत डोळस आकलन त्यांना झालं असणार. त्यांच्या मनात भाषेचा बांधणीचा आणि रचनेचा रियाज इतका पक्का झालेला दिसतो की त्याशिवाय त्यांची पहिलीच कथा इतकी निर्दोष इतकी अचूक कशी झाली असावी. त्यांच्या पहिल्या वहिल्या कथेत चाचपडलेपण किंवा अनुकरण अजिबात दिसत नाही.
धन्यवाद!! 🙏🏻
शुभदा. 😊





Comments
Post a Comment