पुस्तक परिचय: वाटा दुर्गभ्रमणाच्या सातारा जिल्ह्यातील किल्ले
आम्ही पुस्तकप्रेमी
सप्ताह क्रमांक : २६७
१९ ते २५ ऑक्टोबर
एकूण पुस्तक क्रमांक: १८७४ - १८८०
पुस्तक क्रमांक : ०२
आजची दिनांक : २०/१०/२०२६ दसरा
पुस्तकाचे नाव: वाटा दुर्गभ्रमणाच्या सातारा जिल्ह्यातील किल्ले
लेखक : संदीप भानुदास तापकीर
प्रकाशन: विश्वकर्मा पब्लिकेशन्स पुणे
पृष्ठ संख्या: 221
मूल्य: रु. 300/-
परिचयकर्ती शुभदा जगताप जाधव, सातारा.
फोन नंबर 9987515657
आपल्याकडे दसऱ्याला सिमोल्लंघन करण्याची प्रथा आहे. सीमेचे उल्लंघन म्हणजे आपल्या गावाच्या वेशीबाहेर जाऊन येणे सोने लुटणे किंवा वाटणे ही परंपरा.
तर आजच्या या शुभ दिनी सर्वांना दसऱ्याच्या/ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
महाराष्ट्रातील गड किल्ले यांना समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि त्यांचा इतिहासही मोठा रंजक आहे. याच गडकिल्ल्यांनी आपल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांनी गेली कित्येक वर्ष माझं मन भुलवून ठेवलं आहे. जसा जसा वेळ मिळत गेला तसं या डोंगर रांगांवर या सह्याद्रीच्या कुशीत जाण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. लग्नापूर्वी म्हणजे वय वर्ष 22 ते 25 या काळात खूपदा या गडकिल्ल्यांवर डोंगरांमध्ये सह्याद्रीत जाता आलं, सह्याद्री जवळून बघता आला. महाराजांची पाऊले जिथे जिथे लागली आणि त्यांचे सरदार मावळे जिथे जिथे वावरले त्या त्या ठिकाणी जाता आलं आणि एक वेगळीच अनुभूती, भारावलेली मनस्थिती अनुभवता आली. त्या क्षणांचे स्मरण आणि मनाने पुन्हा एकदा त्या गडांवर किल्ल्यांवर जाऊन येणे, असे क्षण मी अनुभवत असते. वर्षाकाठी किमान एक-दोन तरी ट्रेक करत असते.
आपल्या आजूबाजूला अशीच या सह्याद्रीवर महाराजांवर या गडकिल्ल्यांवर जीवापाड वेड्यासारखे प्रेम करणारी आणि काही एक ध्येयाने भारावलेली उस्फुर्ततेने कामे करणारी अशी अनेक माणसे आहेत.
त्यापैकीच एका व्यक्तीचा परिचय झाला ते त्याच्या पुस्तकातून आणि ती व्यक्ती म्हणजे आजच्या पुस्तकाचे लेखक श्री संदीप भानुदास तापकीर.
लेखकाचे पहिले पुस्तक महाराजांच्या जहागिरीतून पुणे जिल्ह्यातील 29 किल्ले हे 7 जून 2012 रोजी लोहगडावर श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशित झालं. लेखक तापकीर यांनी प्रत्येक जिल्ह्यातील किल्ल्यांवर स्वतंत्र पुस्तक काढण्याचा मानस केला आणि त्यातील एक जे आज मी परिचयास घेतले आहे ते सातारा जिल्ह्यातील 25 किल्ले. सातारा जिल्ह्यातील दोन सुपुत्र जे त्यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि डोंगरवेडे आहेत, त्यांना हे पुस्तक त्यांनी सस्नेह अर्पण केलेले आहे. तसेच या पुस्तकाला इतिहास संशोधक डॉक्टर सदाशिव शिवदे यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत.
"संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकला देश. परचक्र येताच निराश्रय प्रजा भग्न होऊन देश उध्वस्त होतो. देश उध्वस्त झाल्यावर राज्य ऐसे कोणास म्हणावे? याकरिता पूर्वी जे जे राजे आले त्यांनी आधी देशांमध्ये दुर्गे बांधून देश शाश्वत करून घेतला. आले परचक्र संकट दुर्गाश्रमी परिहार केले. ते राज्यतरी तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशासन वस्य न होय त्या त्या देशी स्थलविशेष पाहून गड बांधिले."
अशाप्रकारे आपल्या आशीर्वादाची सुरुवात डॉक्टर सदाशिव शिवदे यांनी करून गड किल्ल्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
पुरस्कार या शीर्षकांतर्गत लेखकास दुर्गअभ्यासक श्री भगवान पांडुरंग चिले यांचेही आशीर्वाद लाभले आहेत.
आपल्या सातारा जिल्ह्याला सह्याद्रीच्या डोंगररांगांनी कुशीत घेतलेलं आहे. 360 डिग्री मध्ये आपल्याला जिकडे-तिकडे डोंगररांगाच दिसतात आणि हेच खरं आपलं वैभव आहे. स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्याचा नावलौकिक दूरपर्यंत पोहोचवला. अशा या सातारा शहरात आपण राहतो आणि आपल्या आजूबाजूला किमान 25 गडकिल्ले आहेत आणि ते कुठले हे या पुस्तकातून आपल्याला खूप चांगल्या तऱ्हेने समजते.
अनुक्रमाणिकेत सर्व किल्ल्यांना एक शीर्षक दिलेले आहे जसे की- साताऱ्याच्या अस्मितेचा केंद्रबिंदू अजिंक्यतारा, शिवछत्रपतींनी उभा केलेला मधुमकरंद गड, वाईचा मुकुटमणी पांडवगड, सातारचा चौकीदार वैराटगड, शिवरायांच्या पहिल्या लढाईचा साक्षीदार सुभानमंगळ.
ही शीर्षकं वाचताना एक लक्षात येतं की लेखक किती मनापासून या गडकिल्ल्यांवर प्रेम करतो आणि ते प्रेमपूर्वक भाव त्यांच्या शब्दसुमनांनी या पुस्तकात उतरलेले दिसतात. समर्पक शीर्षक देऊन पुढे त्या त्या किल्ल्याची माहिती वाचण्याची उत्सुकता लेखकाने निर्माण केली आहे.
सातारा जिल्ह्याच्या नकाशामध्ये सगळे तालुके आणि बाजूला 25 किल्ल्यांची सूची हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
प्रत्येक किल्ल्याची माहिती देताना त्याचे भौगोलिक स्थान, त्याचा इतिहास तिथपर्यंत पोहोचण्याचे मार्ग आणि डावीकडे त्याचा नकाशा व खाली एक फोटो अशा पद्धतीने हे पुस्तक सजलेले आहे. तसेच प्रत्येक किल्ल्यावरील महत्त्वाच्या वास्तू बघण्यासारखी ठिकाणे इत्यादींचे वर्णन आणि नकाशेही दिलेले आहेत.
एकूणच हे पुस्तक भटक्यांसाठी गडकिल्ल्यांवर प्रेम करणाऱ्यांसाठी एक उपयुक्त मार्गदर्शक
ठरेल.
लेखकास त्यांचे पुढील मानस पूर्ण करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. 💐💐
आजच्या या शुभ दिनी चला एक संकल्प करूया - निदान आपल्या सातारा जिल्ह्यातील या सगळ्या 25 किल्ल्यांना भेट देऊन आपल्या वहीत त्याची नोंद करूया. एका वेगळ्या प्रकारे सिमोल्लंघन करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या स्वतःच्या मर्यादांच्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करूया ट्रेकिंग गडकिल्ले हे सर्व स्वतःच्या मर्यादा क्षमता वाढविण्यास मदत करतात हा माझा स्वानुभव आहे आणि याचा आनंद तुम्ही सर्वांनीही घ्यावा अशी मी अगदी आग्रहाची विनंती करेन. ☺️
धन्यवाद!!
😊🙏🏻
शुभदा.





Comments
Post a Comment