पुस्तक परिचय: मटीरियल वर्ल्ड

 आम्ही पुस्तकप्रेमी

सप्ताह क्रमांक : २६७

१९ ते २५ ऑक्टोबर

एकूण पुस्तक क्रमांक: १८७४ - १८८०

पुस्तक क्रमांक : ०७

आजची दिनांक : २५/१०/२०२६

पुस्तकाचे नाव: मटीरियल वर्ल्ड

मूळ लेखक: एड कॉन्वे

अनुवाद: डॉक्टर अजेय हर्डीकर

प्रकाशन: मधुश्री पब्लिकेशन  

पृष्ठ संख्या: ३९२ 

मूल्य: रु. ५००/-

परिचयकर्ती शुभदा जगताप जाधव, सातारा.

फोन नंबर 9987515657





कालच माझे आणि लेकीचे संभाषण सुरू होते. माझे जे प्रोफेशन आहे त्या विषयाबद्दल. सध्या पुस्तक परिचय सुरू आहेत आणि तुम्हा सर्वांचे अभिप्राय आले की मी तिच्याशी शेअर करत असते. तिला सांगितलं माझ्या आवडीच्या विषयांचे पुस्तक मी घेऊन त्यावर लिहू शकते; त्यासाठी या निमित्ताने मला वेळ मिळतोय यामुळे मला एक वेगळा आनंद रोज मिळतोय. तर तिचं म्हणणं असं पडलं की आई तू कशाला टेक्निकल फिल्डमध्ये आलीस. तू तर खरं साहित्यातच रमायला पाहिजे होतं. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच आहे गेले चार दिवस. आणि मग तिने जो प्रश्न विचारला त्याला उत्तर देताना मी सांगितलं की चॉईस वगैरे असं काही नव्हतं गं आजपासून 25-30 वर्षांपूर्वी. दहावीला चांगले मार्क मिळाले की विज्ञान ही शाखा निवडायची, विज्ञानात चांगले मार्क मिळाले की त्यात पीसीएम आणि पीसीबी हे दोन ग्रुप असायचे.  PCM मधलं मॅथ्स चांगलं तर इंजीनियरिंगला ऍडमिशन घ्या आणि PCB मधलं बायोलॉजी चांगलं तर मेडिकलला जा. आणि दोघांपैकी एक कुठलतरी घेऊन पुढे त्यात शिक्षण घेऊन लवकरात लवकर पैसे कमवायला लागा, इतकं सोप्प आमचं करिअरचं गणित होतं. माझ्या बाबतीत हेच घडलं. प्रत्येक टप्प्यावर चांगले मार्क आणि सहज सगळीकडे प्रवेश मिळत गेला म्हणून मी इंजीनियरिंग केलं. पण नियतीला माझ्यावर दया आली असावी आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जेव्हा सॉईल मेकॅनिक्स  ( Soil Mechanics)  हा विषय आला तेव्हा त्यामध्ये ज्या प्रकारची मला उत्सुकता आणि आवड निर्माण झाली त्यातून मी जिओटेक्निकल इंजिनिअरिंग या विषयातच स्वतःचं करिअर करण्याचं ठरवलं आणि आज गेली 20 वर्ष मी या क्षेत्रात आहे. जिओटेक्निकल इंजिनिअर म्हणून आम्ही काय करतो तर जमिनीखाली जो स्तर आहे त्यांचा अभ्यास करतो. त्यातील जे नैसर्गिक पदार्थ आहेत म्हणजे माती खडक आणि जमिनीतलं पाणी यांचे नमुने घेऊन त्यांचं टेस्टिंग आणि अॅनालिसिस करून एक सॉईल रिपोर्ट तयार करतो जो प्रत्येक बांधकामाच्या पायासाठी आणि त्याच्या स्टेबिलिटी (stability & sustainability) साठी अत्यंत गरजेचं आणि उपयुक्त असतो. हा अभ्यास करताना मला सतत मातीशी जोडून राहता येतं, site वर फिल्डवर जाता येतं आणि नैसर्गिक साधनांचा थोड्याफार प्रमाणात का होईना पण अभ्यास माझा सुरू असतो. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न निरंतर सुरू आहे. आणि म्हणून माझ्या प्रोफेशन मध्ये मला काम करताना खूप आनंद मिळतो.


 आता तुम्ही म्हणाल की पुस्तक परिचय राहिला बाजूला आणि हे स्वतःविषयी काय बोलत बसलात?. 😃

 तर विषय असा आहे की आजचे माझे पुस्तक आहे मटीरियल वर्ल्ड ज्यामध्ये ६ मुख्य नैसर्गिक पदार्थांची /  साधनांची मीमांसा केलेली आहे. 

वाळू, मीठ, लोह, तांब, तेल आणि लिथियम. 

यातील वाळू आम्हाला नेहमीच अभ्यासावी लागते. आमच्या विषयात जिओलॉजी हा विषय येतो ज्यामध्ये या सर्वांचा अभ्यास असतोच, मुख्यतः मातीचा आणि दगडांचा अभ्यास.  साताऱ्यात भरलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (जानेवारी 2026) हे पुस्तक मला दिसले आणि सहजच त्याच्याशी मी कनेक्ट झाले. ज्या काही अचंबित करणाऱ्या गोष्टी या पुस्तकामध्ये लेखकाने त्याच्या नजरेतून अभ्यासातून आणि प्रत्यक्ष फिल्ड व्हिजिट्स मधून नमूद केलेल्या आहेत, त्या अचंबित करणाऱ्या आहेत आणि ते तुम्हा सर्वांशी शेअर करण्याची इच्छा आजच्या या पुस्तक परिचयातून माझी अंशतः तरी पूर्ण होणार आहे. 😊


लेखक म्हणतात - 

"माझ्या करिअरमध्ये या प्रवासाइतका विस्मयकारक आणि बौद्धिकदृष्ट्या आनंद देणारा दुसरा कुठलाच टप्पा नव्हता. पण याचबरोबर अनपेक्षितपणे हा प्रवास उपचारात्मकही ठरला. आधुनिक जीवनातल्या मूलभूत गोष्टींवर खोलात शिरून संशोधन करता करता मला माझ्या भोवतालच्या जगाशी जोडले गेल्याची भावना झाली. मी गाडीला लागणारी बॅटरी किंवा स्मार्टफोन बनवणार नव्हतो, पण या गोष्टी आता पूर्णपणे रहस्यमय उरल्या नाहीत. माझ्या आयुष्याचा बराचसा काळ मी या भौतिक जगापासून दूर सुरक्षित कवचात राहत होतो. आपण वापरतो त्या वस्तू कशा बनतात, त्या कुठून येतात याविषयी मी अनभिज्ञ होतो, पण आता मी नव्याने या सगळ्याकडे पाहू लागलो आहे."


 हे पुस्तक वाचून तुम्हालाही आपल्या जगाकडे वेगळ्या नजरेने पहावसं वाटेल ही आशा. तुम्हाला दैनंदिन जीवनातल्या वस्तू पाहताना त्यांच्यातील जादू दिसेल असं मला वाटतं.

 या पुस्तकात वर्णन केलेले सहा पदार्थ दुर्मिळ आहेत अशातला भाग नाही. ते दिसायला किंवा हाताळायला फार 'सेक्सी' नाहीत. त्यांचा सुटा सुटा विचार केला तर ते फार मौल्यवानही नाहीत. *पण आपलं जग त्यांच्या आधारेच उभं आहे. त्यांच्यामुळेच साम्राज्याची भरभराट झाली. त्यांच्यामुळेच शहरं बांधणं आणि जमीनदोस्त करणं शक्य झालं आहे. हवामान बदल त्यांच्यामुळेच झाला आहे आणि कदाचित त्यापासून हेच पदार्थ आपल्याला वाचवूही शकतील. हे पदार्थ म्हणजे आधुनिक जगातले पडद्यामागचे कलाकार आहेत, नव्हे नायक आहेत. त्यांची कहाणी ऐकायची वेळ आली आहे.

हे आहे लेखकाचे मनोगत!! 😊

 

 पुस्तकाचा सारांश: या पुस्तकाची सुरुवात वाळू या विषयापासून होते, त्याला कारण असे की मानवाने त्याचा बराचसा सभोवताल याच वाळूपासून निर्माण केला आहे. मानवाने तयार केलेला सर्वात आदिम पदार्थ 'काच' याच वाळूपासून तयार करतात आणि सर्वात आधुनिक गोष्टीत ज्यांची गणना होईल ते 'सेमीकंडक्टर्स' सुद्धा याच वाळू पासून तयार करतात.

 मीठ वापरून आपण गोष्टींचं रूप बदलतो. शिवाय आपल्या आरोग्यासाठी आणि पोषणासाठी ते अत्यावश्यक असतं. नंतरच्या प्रकरणात लोह आणि तांब्याचा विचार केला आहे. कारण लोहाची कहाणी कोळशाच्या कहाणीत मिसळलेली आहे तर तांब्याच्या माध्यमातून विद्युत प्रवाह वाहतो. त्यांचा विचार या क्रमाने केल्यामुळे जीवाश्म इंधन आणि विद्युत शक्तीचा वापर या आपण आधुनिक काळाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मोठ्या ऊर्जा संक्रमणाचा विचार करतोय. तिसऱ्या आणि चौथ्या संक्रमणाचा विचार तेल या विभागात केला आहे यात वायू (गॅस) चा समावेश आहे. पुस्तकाचा बराचसा भाग गतशतकांमधील औद्योगिक क्रांतीला हातभार लावणाऱ्या पदार्थांवर खर्च केला आहे. अखेरचा भाग जीवाश्म इंधनापासून अक्षय उर्जे कडे नेणाऱ्या ऊर्जा संक्रमणाच्या केंद्रस्थानी असलेला आणि आपल्या भविष्यातल्या क्रांतीला आकार देऊ पाहणारा पदार्थ लिथियम साठी राखून ठेवला आहे.


 या पुस्तकाची प्रस्तावनाच जवळपास 22 पानांची आहे आणि त्यात हा उलगडा होतो की हे पुस्तक आणि या सहा पदार्थांबद्दल लेखकाला इतक्या खोलवर संशोधन करून माहिती मिळवून आणि प्रत्यक्ष फिल्ड व्हिजिट्स करून का लिहावंसं वाटलं. सोनं कसं मिळवतात आणि त्याची संपूर्ण प्रक्रिया काय या जिज्ञासातून लेखकाने माउंट टेनाबो ला उध्वस्त होताना बघितलं आणि त्याच्या मनात विचार आला की आपल्या अत्यावश्यक गरजांमध्ये सोनं हे मोडत नाही तरी त्याला मिळवण्यासाठी आपण पृथ्वीवर किती आघात करत आहोत आणि डोंगरच्या डोंगर उध्वस्त करत आहोत. तर ज्या आपल्या अत्यावश्यक गरजा आहेत आणि त्यांना पूर्ण करणारे जे पदार्थ आहेत त्यांना मिळवण्यासाठी आपण काय करत असू हा प्रश्न त्याच्या मनात उपस्थित झाला आणि त्यातून या संशोधनाला सुरुवात झाली.  


लेखक आपल्याशी हितगुज करताना लिहितात- 

"विविध पदार्थांच्या बाजारी मूल्यापेक्षा आपण त्यांच्यावर किती अवलंबून असतो त्यावर मी विचार करू लागलो. पण मी प्रस्थापित अर्थशास्त्राचा कंफर्ट झोन सोडून जसा खोलात शिरू लागलो तसा मी वेगळ्या वाटेवर पोहोचलो. ही कथा विस्मयाची बनली. हे विविध स्वस्त सर्वत्र दिसणारे पदार्थ जसे मला समजू लागले तसे ते मला जादुई भासू लागले. साध्या वाळूचा कण घ्या. त्यात असलेलं सिलिकॉन हे मूलतत्त्व ऑक्सिजनच्या खालोखाल सर्वत्र आढळतं. खाली बसून जमिनीकडे निरखून पाहिलं तर लवकरच तुम्ही प्रचंड गुंतागुंतीच्या जगात शिराल नव्हे, त्यात बुडत जाल. वाळूत बांधकामाकरता अत्यंत सुयोग्य असे टोकदार कण असतील. सागराच्या तळाशी वेगळीच वाळू असते. मग वाळवंटातील वाळू पहा, वाऱ्याने इतकी झिजलेली असते की सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं तर तुम्हाला गुळगुळीत गोटया आहेत असं वाटेल. हजारो वर्षांपासून धूप झाल्याने त्या कणांची टोकं पार नष्ट झाली आहेत. फार फार वर्षांपूर्वीच्या महासागरातून मागे राहिलेली वाळू इतकी शुद्ध असते की जगभर तिचा व्यापार होतो. 


 हे तर फक्त प्रस्तावनेत वाळू बद्दल काही ओळी लिहिल्या आहेत. पहिलं प्रकरण जे वाळूसाठी आहे ते जवळपास 85 पानांचं आहे. याच प्रकरणात सर्वात कमी लेखला गेलेला पदार्थ म्हणून काँक्रीट विषयी लेखकाने ज्या काही पर्स्पेक्टिव्ह मधून त्याविषयी लिहिलं आहे त्यातून मी देखील आज काँक्रीट विषयी वेगळ्या दृष्टीने विचार करण्यास प्रवृत्त झाली आहे.


 अनुक्रमणिकेमध्ये प्रत्येक भागामध्ये छोटे छोटे प्रकरण आहेत. जसं वाळू हे तीन प्रकरणात आहे.

 एक होमो फेबर, दुसरं वाळूवरची घरं आणि तिसरं सर्वात लांबचा प्रवास. ही शीर्षकच खरं बघायला गेलं तर खूप उत्सुकता चाळवतात हे पुस्तक वाचण्याची. आणि यात काल्पनिक असं काही नाही. जे काही लिहिलं आहे ते तथ्यांवर, अभ्यासावर, मानवी इतिहास आणि भूगोलाला मध्यवर्ती ठेवून  लिहिलं गेलं आहे. आणि ही माहिती इतकी रंजक आणि अशी आहे की ज्यापासून सामान्य माणूस फार अनभिज्ञ असतो आणि म्हणूनच ती वाचताना विस्मयकारक हा भाव येतो!!


 अतिशय अभ्यासपूर्ण आणि माहितीचा प्रचंड खजिना असलेलं हे पुस्तक आहे. त्यात लेखकाने प्रत्यक्ष ती माहिती गोळा करण्यासाठी किती संशोधन आणि प्रवास केला असेल याची गणती नाही. आपल्या आजूबाजूचं जग समजून घेताना हे सहा पदार्थ किती महत्त्वाचे आहेत आणि त्यावर आपण किती अवलंबून आहोत, हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या संग्रही असावाच असावं असं हे पुस्तक!


लेखका विषयी: एड कॉन्वे हे लेखक आणि प्रसारक आहेत. ते स्काय न्यूजचे डेटा आणि अर्थशास्त्र विषयक संपादक आहेत; आणि द टाइम्स आणि संडे टाइम्स मध्ये नियमितपणे स्तंभलेखन करतात. त्यांच्या दोन पुस्तकांना गौरवलं गेलं आहे. ती 'बेस्टसेलर्स' ही आहेत त्यांना पत्रकारितेसाठीचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते लंडन येथे स्थायिक असतात


धन्यवाद!! 🙏🏻


शुभदा. 😊

Comments

Popular posts from this blog

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ९. चिरतरुण आशा (ताई)

मृदा