नदी आणि मी 


वाट कुठे दिसेना 

जाऊ कुठे? कशी?

 प्रवाहीच  जीवन माझे

 सांग ना, थांबू कशी? ।।१।।


नदी बोलती झाली 

उभी ठाकली माझ्या दारी 

अचंबित मी, रूप शांत 

रौद्र जरी दिसे बाहेरी ।। २।।


निमिषात सावरले गं 

कशी मिळाली शक्ती 

नमस्कार तिला आधी 

मग धाडस संभाषणी ।।३।।


 गे माये, मी वदले

 तू नसता जीवन संपेल 

 पण दारी आमुच्या आलीस 

तर हा संसार उधळेल ।।४।।


 इतुका वेळ ती शांत 

मात्र, आसवे ढळली 

रडू येते लेकरांसाठी 

पण आता निश्चये  खचली ।।५।।


 तुम्ही काय विकास साधला?

 लक्ष्मणरेषा पार केल्या

 अतिक्रमण ते माझ्याच उरी 

नाईलाज! आले तुझीया दारी ।।६।।


मज हवा तो मार्ग 

तीरावर फुलवून चैतन्य

असते मी सदा प्रसन्न

 मार्गक्रमण समुद्राकडे ।।७।।


पण हाय! काय सांगू?

माझीच अडचण झाली जणू 

सैरभैर माझे जल आता 

नुरली जागा, माझा नाईलाज ।।८।।


पातळी धोक्याची, माझी?

नाही ओलांडली असती मी

पण उल्लंघन तुमचेच 

आज उलटले पूररुपी।।९।। 


वेळ ना गेली अजूनही 

तुम्ही उद्याचे नायक 

नतमस्तक व्हा निसर्गाला 

आणि मर्यादा सांभाळा तुमच्या  ।।१०।।


असे म्हणूनी ती माय

माझे दार सोडूनी गेली

 मी मात्र नि:शब्द खंत करीत 

झाले नतमस्तक तत्क्षणी ।।११।।


हाहाकार माजला सर्वत्र 

जलमय झाली अवघी भूमी 

आमच्यावर कृपादृष्टी तिची 

वाचलो करण्या सृजन काही ।।१२।।


प्रलय थांबला, आसमंत  शांत 

वळून एकदा बघे माय 

माझी तिची नजरानजर 

सांगून गेली सर्वकाही ।।१३।।


ठरविले मनोमन जगण्याचे इप्सित 

मानवा तू तुच्छ निसर्गापुढती 

धरु कास शाश्वत विकासाची 

आनंदे नाचू कुशीत तिच्या ।। १४।।


- कल्याणी ( शुभदा जगताप)

३१ जुलै २०२१

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य