मी पण न देगा देवा

 'मी' पण न देगा देवा


मी 

कायमच आशावादी 

सहसा 

लवकर हार न मानणारा 

जिद्द धैर्य बुद्धीची चुणूक 

ही माझीच मापदंड!

कायम वरचढ!!


हो 

अहंकार तर आहेच की  

होताच 

तो माझा दागिना मोठा 

अगदी माझ्या निर्मितीपासूनच 

मला चिटकलेला!

गर्वाने मिरवलेला!!


मग 

मग काय मी उन्मत्त 

इतर 

माझ्यापुढे तुच्छ ही मग्रुरी 

वाढला मग मनमानीपणा 

 मलाच नेणारा!

माझ्याच अधोगतीकडे!!


बुद्धी 

गहाण ठेऊन प्रगती केली 

प्रगती 

म्हणतात खरे सगळेच 

पण मनास माझ्या पक्के ठाऊक 

विनाश अटळ!

माझा स्वहस्ते!!


कसा?

शतकापूर्वी महामारी 

आजही 

तीच अवस्था आमची 

नजरकैद आम्ही आमचेच 

कोंडले श्वास! 

जगणे भकास!!


प्राणी 

इतर ज्यांना तुच्छ मानिले 

यातही 

हिंडती मात्र स्वत्रंत 

निसर्गाची उधळण सर्वत्र 

आणि आम्ही!

हतबल गात्र!


आता 

ठरविले एकच निर्धाराने 

समान 

दर्जा प्रत्येकाचा इथे 

माणूस म्हणून आपणही थिटे 

निसर्ग महान!

गुरु आपुला!!


येत्या 

नवीन वर्षात सारासार विचार 

केवळ 

भौतिक आभासी जग नोहे 

माणुसकी भूतदया हेचि दान  

मोकळा श्वास!

जोडू हात ....जोडू हात !!



-कल्याणी (शुभदा जगताप)

३१ डिसेंबर २०२०


टीप: सरत्या वर्षात मानवाला मिळालेला धडा व येत्या वर्षांसाठीचा त्याचा निर्धार .... हा एक विचार मांडण्याचा अल्पसा प्रयत्न!

मुक्तछंदातली कविता आहे. कवितेत प्रत्येक कडव्यात ७ ओळी आहे.

पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत केवळ १ शब्द, वरचा २अक्षरी व खालचा ३ अक्षरी, अशी रचना झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

सहावी दुर्गा - पद्मजा