थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ३. खिचडी


थोडक्यात ..... थोडस काहीतरी ....

३. खिचडी - कल भी थी आज भी है और कल भी रहेगी

आता शीर्षक वाचून म्हणाल - हे काय आता नवीन? तर नवीन अस काहीच नाही तर तिच्याबद्दल लिहावस वाटतय बरेच दिवसांपासून (स्पेशली लॉक-डाउन सुरु झालय तेव्हापासून) जी आपणा बहुतेक स्त्रियांची लाडकी सखी आहे ..... हो तीच जी काही मिनिटात तयार होते आणि सखी गृहिणी ला स्वयंपाकघरात अत्यंत कठीण परिस्थितीत उपयोगास पड़ते .......  हो तीच ती आपली आवडती - खिचड़ी !  
- बर आता कोणकोणत्या कठीण परिस्थितीत ही मदतीस धाऊन येते, तर बघा हां ----
--- नोकरी करणारी सखी जी सकाळी ५:३०-६ पासून उठलेली असते आणि दोन्ही वेळा लोकल च्या गर्दीचे धक्क्के खाऊन दिवसभर मेंदूचा भुगा करुन थकून घरी पोहोचलेली असते आणि रात्रीच जेवण तिलाच बनवायच असत
---- एक उद्योजिका / स्वतःचा व्यवसाय करणारी, लोकल चा नाही पण प्रवास आहे; सगळा व्यवसाय एकटीच चालवणारी, क्लायंटस ला तोंड देऊन थकून गेलेली घरी आलेली असते आणि दोघांपुरता का होईना रात्रीच जेवण बनवायच असत
---- चौकोनी कुटुंब, सपोर्ट सिस्टिम नाही, नवरा बाहेरगावी कामानिमित्त गेलेला, ती आजारी पडलीये आणि दोन्ही चिमुकले जेवायला मागताय
---- आज दोघेच चित्रपट पहायला गेलेले, बाहेर जेवायच्या बेताने पण सगळी हॉ टेल्स फुल आणि ती घरी आल्याआल्या तणतणतच किचन मध्ये घुसते
---- ते तिघे बेचलर आणि जिवलग मित्र, नोकरी साठी गावापासून लांब एक खोली घेऊन राहताय,बाहेरच खाऊन खाऊन कंटाळा आलाय आणि घरच्या जेवणाची प्रचंड आठवण येतेय ....

असे कितीतरी प्रसंग आपण सर्वजण दैनंदिन जीवनात अनुभवत असतो, खरंय ना? ज्यात ही खिचडी आपल्याला झटकन आठवते आणि हसतच पटकन बनवून आई / ताई / बायको / मुलगी / मुलगा आपल्या ताटात वाढतात. जठराग्नी भयंकरच भडकलेला असताना कमीत कमी वेळात हीच खिचडी रसना तृप्तीचेही पुण्य पदरात पाडून घेऊन आपली क्षुधा भागवते, अजून काय हवे?
बर प्रकार तरी किती? तर-
- साधी मुगाची डाळ घालून केलेली फिक्की खिचडी त्यावर साजूक तुपाची धार आणि तोंडी लावायला उडीद पापड व लोणचे, बस्स झाले!
- नाहीतर विदर्भातल्यासारखी तुरीची डाळ घालून केलेली फडफडीत खिचडी त्यावर जिरे-मोहरी-सुकलेली लाल मिरची-लसूण यांच्या फोडणीने युक्त असे कढवलेलं तेल, तोंडी लावायला मस्त कैरीचे पन्हे आणि असलया तर खारोड्या किंवा भातोड्या
- अगदीच रसना कुरबुर करत असेल आणि चवदारच मागणी असेल तर मस्त लसूण, उभा चिरलेला कांदा बटाटा, एखाद दुसरं टमाट आणि लाल मिरची पावडर व घरी बनवलेल्या गरम मसाल्याची फोडणी, अहाहा... .. चव तरी काय वर्णावी? सोबत चोकायचा आंबा असेल सीजन चा तर उत्तमच!
- अगदीच काही नाही तर एकदम सपक पातळ खिचडी आजारी माणसासाठी
- दाल-खिचडी ही आहेच आपली!
आता कल भी थी - असं का? तर वाचनात आलं होत की कुठेतरी उत्खनन झालेलं (माझ्याकडे पूर्ण तपशील नाहीये) तिथे जुन्या मातीच्या भांड्यात तांदूळ आणि मुगाची डाळ सापडली होती जी दर्शवते की डाळ-तांदळाची खिचडी हा पदार्थ फार पुरातन काळापासून आहे. आजही खिचडीच प्रस्थ आपल्या स्वयंपाकघरात ठाण मांडून आहे आणि भविष्यातही तिची बहुगुणी-बहुरंगी उपयुक्तता बघता ती तितकीच प्रिय राहील, यात मला तरी काही शंका वाटत नाही!
पुन्हा लेखाच्या पहिल्या ओळींकडे वळते - स्पेशली लॉक-डाउन सुरु झालय तेव्हापासून खिचडी जरा अतिच प्रिय झालिये, निदान आमच्याकडे तरी! कारण या काळात दिवसभर बनवणे आणि खाणे - खाऊ घालणे या प्रकाराला नकीच आराम (?) देण्यासाठी माझ्यासारखाच तुम्हीही खिचडी चा उत्तम मार्ग धरलाय का, संध्याकाळच्या जेवणासाठी??

-  कल्याणी (शुभदा जगताप)
११ मे २०२०

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

सहावी दुर्गा - पद्मजा