थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ५. एक मोठा ब्रेक, आपण आणि थांबलेली मुंबई…


थोडक्यात ..... थोडस काहीतरी ....

५. एक मोठा ब्रेक, आपण आणि थांबलेली मुंबई
                                                      - शुभदा जगताप

अरे यार खूपच दगदग होतेय सध्या....नोकरी घर नोकरी घर .... घरी फक्त झोपायला आणि वीकएंड तर कसा येतो आणि जातो ते कळतही नाही. अस वाटत की संपूर्ण इंडिया मध्ये फक्त मुंबईच्याच लोकांना घाई असते, सतत पळापळ .... बोर हो गया यार ... एक बडा ब्रेक चाहिये ! desperately yaar!!!
  - इति .... एक मित्र दुसऱ्या मित्राला .... मुबई लोकल प्रवासात ... हिंदी मराठी इंग्रजी यांची सरमिसळ होऊन तयार झालेल्या पण प्रत्येकाला खूप जवळच्या वाटणाऱ्या एकदम एक्सप्रेसिव्ह भाषेत.... आपली आगतिकता व्यक्त करतोय आणि दुसराही मान डोलावून आणि आपलं जीवन किती व्यर्थ आहे चा टिपिकल लूक देऊन दुजोरा देतोय.

अरे अरे हो..... मला माहिती आहे अजून मुंबई लोकल बंद आहेत आणि महिनाभर तरी सुरु होणार नाहीयेत .... हा जो प्रसंग आहे ना तो जागतिक महामारी संकटामुळे झालेल्या लॉकडाऊन च्या आधीचा बरं का.... कित्येक वेळा तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवलेला, बघितलेला .... वर्षानुवर्षे हाच प्रकार चाललेला आणि आपण ही तो जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारलेला. मुंबईचा चाकरमानी जो मुळात मूळ मुंबईकर कमी पण जवळच्या उपनगरांतून येणारा,  मुंबईस रोज लोकल ने अप डाऊन करणारा, आणि यात काही बदल होणे नाही या ठाम मतावर जगणारा... हो तोच... आणि अविरतपणे धावणारी, २४ पैकी अवघे काही तासच बंद असणारी, अगदी उर फुटेपर्यंत मुंबई/चर्चगेट ते कर्जत-कसारा-पनवेल-बोरिवली व पुन्हा मुंबई असा कितीतरी किलोमीटर चा प्रवास करणारी ती आपली सर्वांचीच लाडकी मुंबई लोकल ट्रेन .... बसलेत की हो शांत दोघे ही. आपापल्या घरात / कारशेड ला. लॉकडाऊन ला धन्यवादच नको का द्यायला?  

खरंच एक मोठा ब्रेक गरजेचाच होता नाही का? किती किती ते धावणार? आपलयापैकी बहुतेक जणांच्या आई वडिलांनी मुंबईत नोकरी लागल्यापासून ते पार रिटायर होईपर्यंत हेच केलय ना..... आजही कित्येक जणांच हेच रुटीन आहे..... मुंबई सोडून इतर ठिकाणी बस / वाहन यांच्या वेळा १५ किंवा २०-३० मिनिटांच्या अंताराने. कल्याण ला १५ डब्यांची ७:४७ किंवा ८:०३ फास्ट लोकल पकडायची असायची. मैत्रिणी आणि कधी कधी नातेवाईक ही चिडवायचे --- हे असले टायमिंग कसे काय लक्षात राहतात बुवा तुमच्या? हे खूपच मिश्किल आणि उपहासात्मक असायचं. आता त्या पामरांना कोण सांगत बसणार की सकाळचा आमचा हा काही मिनिटांचा लांबलेला वेळ पुढे काय काय दाखवतो ऑफिस ला पोचेस्तोवर, ते आमचं आम्हालाच ठाऊक. पण त्यांच्याकडे म्हणजे  मुंबई बाहेरच्यांकडे पाहून कधी कधी हेवा ही वाटायचा --- किती आरामात असतात ना ही लोकं?

तर .... म्हणणं एकच की मुंबईकरांना, मुबंईत नोकरी करायला येणाऱ्या आम्हा कल्याण-डोंबिवलीकराना (इतरही शहरे यात गृहीत धारा बर का - अंबरनाथ टिटवाळा इ.) आणि मुंबई लोकल ला ही एक मोठ्ठा ब्रेक खूपच गरजेचा होता..... थोडा स्वतःसाठी, कुटुंबासाठी, लेकरांसाठी, आमच्याच सहवासास आसुसलेल्या आमच्याच घरासाठीही ! शांत बसून श्वास घेणे जणू काही विसरुनच गेलेलो ना आपण? सगळं उभ्या उभ्याच करायच, बोलणे, पाणी पिणे....नुसती धावपळ... ते घड्याळाचे काटेही आ वासून बघत असतील आपल्याकडे! गेले दोन महिने जबरदस्तीने का होईना .... माणूस घरात थांबला..... उसंत मिळाली की हो त्याला जरा तरी!
काही अंतर्मुख झाले, काहींचे चिल्ले-पिल्ले खूप खूप आनंदित झाले, काहींनी जुने छंद आठवून पुन्हा चित्रे रेखाटली, गाणी गायली, जुन्या दोस्तांना फोन केले.... काय काय नि काय काय.... वेळ मिळाला हो भरपूर .... न भूतो न भविष्यति असा .... आजारी कमी पडले, हे ही छानच झाले नाही का?
ही थांबलेली मुंबई आणि लोकल.... आणि आपणही .... काही काळासाठी ... खरंच गरज होती ना याची? आपण कुणीच स्वतःहून थांबलोच नसतो कधी, छे, मुंबईला ते मान्य नव्हतच कधी .... पण गरज होती ... बोलली नाही मात्र कधीच ... अहोरात्र ही आपली जागीच.... तिची सतत धावणारी लेकरं बघत .... आज ती ही थोडीशी विसावली आहे काही दिवस झाले.... हलकेच गालात हसत बघतेय सगळा खेळ ....
माहिती आहे तिलाही आणि आपल्यालाही .... हे सगळं काही कायमच नाही .... उद्या परवा होईल सगळं पुन्हा सुरळीत... माणसं धावू लागतील...  पण कदाचित थोड्या कमी गतीने ... कारण ते गरजेचं आहे .... बरच काही शिकवलंय आपल्याला या दोन महिन्याच्या काळाने .... ते नेहमी लक्षात ठेऊनच पुढील वाटचाल .... होय ना ?

- कल्याणी (शुभदा जगताप)
२१ मे २०२०

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य