थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ६. सहजीवनाचा सोहळा ....


थोडक्यात ..... थोडस काहीतरी ....

६. सहजीवनाचा सोहळा  ....
                                - शुभदा जगताप

सहजीवनाची दशकपूर्ती  - अक्षरश: याच शब्दात सकाळी सकाळी वडिलांनी फोन करून शुभेच्छा दिल्या .... ते दोन शब्द ऐकून खूप वेळ हसू आलं मला ... पण खरंच की .. सहजीवनाची १० वर्षे पूर्ण केली आज आम्ही! खूप साऱ्यांच्या शुभेच्छांचा पाऊस पडला ..... आणि गेल्या १० वर्षातील अनेक लहान सहान घटना डोळ्यासमोरून तरळून गेल्या. नाही म्हणता म्हणता एक दशकाचा टप्पा ओलांडला की हो आज आम्ही !

सहजीवन - काय अर्थपूर्ण शब्द आहे नाही? एकमेकांना समजून घेऊन, गुण - दोषांसकट सांभाळून घेणे, रुसवे भुगवे, लग्नानंतरची दोघांचीही बरीचशी धडपड एकमेकांचा स्वभाव नीट कळेपर्यंतची .... किती काय काय असत ना या संसारात? वाटतो इवलासा....सुरुवातीला .... पण कठीणही असतो तो बरेचदा... निभावता निभावता दमछाक होते काही जणांची ....  तारेवरची कसरत ही असते कधी कधी .... संतुलन खूप महत्वाचे ! काही काळ खूप अडचणींचा ही येतो, जिथे खरी कसोटी लागते एकमेकांना दिलेल्या वचनांची!

१० वर्षातही बरच गाठोडं भरलं आहे आठवणींच! २५ - ३५-४० वर्षे पूर्ण होतात खरंच सलाम. किती दिव्यातून गेले असतात ते त्यांचं त्यांनाच माहिती.
सुरुवातीचे काही मजेचे दोघांचेच दिवस सरले आणि ते दोघे आई बाबा होण्याची चाहूल लागली की येणारी अस्वस्थता, बाळाचा सांभाळ, रात्रीची जागरणे त्यातून होणारी चिडचिड, बाळाला मोठं होताना बघाना मिळणारा आनंद आणि वाढलेल्या जवाबदारीची जाणीव .... सगळंच कस एकात एक गुंतत जाऊन आपली प्रत्येकाची कधी एक छान छोटीशी गोष्ट तयार होते ते कळतच नाही ना .... एक वेगळच जग ... बाहेरच्या जगापासून कधी अलिप्त तर कधी पूर्ण जगात गुंतलेलं!!

आपल्याकडे हिंदीत एक म्हण आहे - शादी का लड्डु जो खाये पछताए जो ना खाये वो भी पछताए  :)

सर्व लग्न झालेली जोडपी माझया या वाक्यावर नक्कीच सहमत होतील. कारण मला वाटत की लग्नाच्या वाढदिवसाचा  रौप्यमहोत्सव साजरा केलेले जोडपेही ( नवरा आणि बायको दोघेही हा ) खरंतर हे सांगू शकतील का की ते खरंच पस्तावले की नाही? जर तो लाडू न खाताही पस्तावणाराच असेल तर खाऊन का बघू नये, हा एक खूपच लॉजिकल वाद- चर्चा, फार गमतीशीर असते ऐकायला. आपल्या आधीच्या पिढीत लग्नाचे वय १८/२१ ते जास्तीत जास्त २२-२५... मग वाढत वाढत ते २७-२८-३० वर कधी येऊन पोहोचल ते कळलंच नाही. सध्या तर थर्टी (३०) अँड सिंगल .... हाच ट्रेंड दिसतोय. लग्न करावं की नाही इथपासून काहींचे प्रश्न आहेत. त्यातच भारतातही live-in ला मान्यता मिळाली आहे . यात कुठेतरी आपले संस्कार आणि लग्नसंस्था तर मागे पडणार नाही का, असाही विचार येऊन जातो मनात.
पण खर सांगू, आपली कुटुंव्यवस्था आणि लग्नसंस्था, या दोन्ही गोष्टी समाजाच्या संतुलनासाठी आणि उत्तम मानसिक आरोग्यासाठी खूप महतवाच्या आहेत आणि इतकी वर्षे त्या टिकल्या आहेत आणि  येणारे पिढी ही (अर्थात ज्यांना पटेल तेच ) ती पुढे नेईल असे वाटते. आज या लोकडाऊन च्या कठीण काळातही आपण सर्व भारतीय अजूनही आपली मानसिक स्थिती बर्यापैकी टिकवून आहोत त्याच श्रेय आपल्या कुटुंबाना आणि मित्र -परिवाराला जात, अस माझं ठाम मत आहे. एकमेकांशी भांडू, रुसू - अबोला धरू, पण कुटुंब टिकवू, हीच आपली मानसिकता होती आणि आजही आहे. भारत इतर देशांपेक्षा आणि इतर संस्कृतींपेक्षाही याबाबतीत उजवा ठरलाय, गेल्या अनेक वर्षांपासून....

आईसोबत झालेला तो ११ वर्षांपूर्वीचा वादरूपी संवाद आजही आठवतो मला - मी, प्रेमविवाहालाच काय तो अर्थ आहे आणि अनोळखी व्यक्तीशी काय लग्न  करायचं, हा मुद्दा घेऊन बसलेली. तेव्हा आईने फार मार्मिक उत्तर दिलेलं - अग प्रेमाचे अनेक पैलू आहेत, फक्त तुम्ही जो समजता तो नाही. आज नुसतं एकमेकांना बघून आणि काही दिवस ओळख झालेल्या प्रेमापेक्षाही दोन अनोळखी व्यक्तींचं एकमेकांविषयीच सहजीवनातून निर्माण झालेल प्रेम खूप वेगळं असत आणि ते तुम्हाला सहजासहजी एकमेकांपासून वेगळं होऊ देत नाही.

आईच उत्तर पटल नव्हतं तेव्हा, यथावकाश इच्छेप्रमाणे प्रेमही झालं (कस ते आजतागायत न सुटलेलं कोड आहे, परमेश्वरी लीला, अजून काय) आणि प्रियकराशी मग विवाहही. खूप धन्यवाद दिलेले देवाला त्यासाठी! पण आज १० वर्षांनी हे खरंच जाणवतंय की या १० वर्षाच्या आमच्या सहजीवनानातून जे काही प्रेम निर्माण झालाय ते आमाच्या त्यावेळेच्या कल्पनांपेक्षा खूप वेगळं आहे, प्रगल्भ आहे! शब्दात वर्णन नाही करता यायचं सहासहजी ! ज्याने त्याने आपापलं अनुभवायचं असत ते!!!

- कल्याणी (शुभदा जगताप)
२३ मे २०२०

Comments

Popular posts from this blog

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य