पाचवी दुर्गा -- मेघना

 नवरात्र....नऊ दिवस.....नऊ कथा.....

                  ---- शुभदा जगताप

21/10/2020

आज नवरात्रीची पाचवी माळ! या दिवशी देवीच्या स्कंदमाता या रूपाची आराधना केली जाते. स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे. बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे.  सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे.स्कंद म्हणजे तज्ञ, निष्णात. सामान्यपणे जे तज्ञ,प्रविण असतात ते उद्धट असतात. पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे. देवीच्या याच रूपाशी मिळतीजुळती अशी माझ्या आजच्या या कथेची नायिका आहे मेघना. 


पाचवी दुर्गा -- मेघना

मेघनाच्या मुलाचा षडानन चा  जाहीर सत्कार होता अतिशय मान्यवर व्यक्तींच्या हस्ते. त्याचे देश-विदेशातील जवळपास सर्वच घट्ट मैत्री राखलेले मित्र-मैत्रिणी या सोहळ्याला भारतात आवर्जून आले होते.  सगळेच बॅचलर तिशीच्या पस्तिशीच्या आतले.  त्या निमित्ताने त्या सर्वांची ठरलेल वार्षिक destination get together ही होणार होतं.  महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे ठिकाण त्यांनी निवडलेल.  मेघना आपल्या लेकाचं  अतिशय आत्मविश्वासाने वावरणं बोलणं आणि देहबोलीतला नम्रपणा आपल्या डोळ्याने टिपत होती अर्थात कोणालाही न कळेल या बेताने आणि मनोमन कौतुकही करत होती. षडानन च्या त्याच्या क्षेत्रातील निष्णातपणाचं ! खूप कमी वयात खूप मोलाचे संशोधन त्याने  केलं होतं जे भारत देशाला वैज्ञानिक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यास उपयोगी पडणार होतं.  त्याने तसेच स्वतःच्या शोधाच पेटंटही मिळवले होतं आणि आजचा हा सरकारी सत्कार सोहळा त्यासाठीच होता. 


यथावकाश सगळा सोहळा उत्तम पार पडला. षडाननचं  कौतुक आणि अभिनंदन करून सगळे जण पांगले  होते. त्याचे उद्या ट्रीपला सोबत निघणारे सगळे मित्र-मैत्रिणीही जवळच्या हॉटेलवर निघून गेले होते आणि षडानन आपल्या आईला मेघनाला घेऊन घरी निघाला होता. तिचे आनंदाश्रू तरळले होते जे षडाननने नेमकेच हेरले.. दोघा मायलेकरांचं ट्युनिंग इतकं सुंदर होतं की काही बोलायची गरजच पडली नव्हती.  त्याने फक्त तिचा हात दाबला आणि तिच्याकडे बघितलं दोघांची नजरानजर झाली आणि एकमेकांना काय सांगायचं ते दोघांनीही न बोलताच सांगितलं.  दोघेही घरी पोहोचले षडानन खूप दमला होता.  तिला वाटत होतं लहानपणी काढायची तशी याची दृष्ट काढू की काय पण तिने स्वतःला आवरलं, वैज्ञानिक होता ना तो! आणि षडानन  आपल्या खोलीत झोपायला गेला तशी मेघनाही गेली पण आज झोप मात्र येईना. आजचा हा कौतुक सोहळा खरं म्हटलं तर षडाननच्या बुद्धीचा आणि त्याच्या मेहनतीचा सत्कार होता पण त्यामागे तिची मेहनत आणि तिने घेतलेला तो धाडसी निर्णय हा अति महत्वाचा होता. ती तसं कधीही बोलून दाखवत नसे आणि त्याची गरजही तिला वाटत नव्हती कारण एका गोष्टीवर ती ठाम होती की आपल्याला जे काही सांगायचंय ते आपल्या कृतीतून दिसल पाहिजे.  फार बोलायची गरज नाही पडली पाहिजे आणि षडानन इतका समजूतदार आणि सालस मुलगा होता की तोही हे जाणून होता.  शेवटी आईची धाडसी वृत्ती आणि ठामपणा आणि तितकेच करुणामय मन त्याने लहानपणापासून बघितले  होते.  त्यामुळेच की काय त्यांचं न बोलता एकमेकांशी संवाद साधण्याचं कौशल्य इतरांच्याही नजरेत भरत अस.


झोपू म्हटलं तर झोप येईना आज भूतकाळातल्या आठवणींनी इतका काही पिंगा घातला होता तिच्या  डोक्यात की झोप लागणं शक्यच नव्हतं शेवटी तिला लक्षात आलं की आज झोपण्या  पेक्षा आपण त्या आठवणींना उजाळा दिला तर?  तशी ती उठली आणि कपाटातून सगळ्यात वरच्या रकान्यात ठेवलेला आणि लाल कापडात गुंडाळलेला तो जुना अल्बम घेऊन बसली.  फोटोंच एक बर असतं नुसते  समोर आले  तरी त्याच्या  अवतीभवती आणि मागे पुढे घडलेल्या सगळ्या घटना जशाच्या तशा मात्र आठवतात.  म्हणूनच तर फोटो आपण आठवण्यासाठी काढून ठेवतो नाही का, असं म्हणत मेघना अल्बम चाळू लागली.

मेघनाला आठवत होतं की ती शाळेत आणि कॉलेजमध्ये ही अतिशय हुशार मुलींमध्ये गणली जायची.  नुसतीच हुशार नव्हती तर अतिशय बिनधास्त स्वभावाची आरे ला का रे  करणारी आणि धाडसी वृत्तीची होती.  डोंगरांवर  भटकणे हा तिचा आवडता छंद होता. तिचा शाळेतला सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे मल्हार. दोघेही एकाच शाळेत दहावीपर्यंत होते पण दोघांची जागा मात्र नेहमीच मागे पुढे!  म्हणजे मेघना पहिल्या बेंच वरची तर मल्हार हा सगळ्यात लास्ट बेंचवर चा.. पण तरीही त्यांची मैत्री अशी काही घट्ट होती की सगळ्यांनाच आश्चर्य  वाटे. मेघा अपहील्या णनराने पास होणारी  तर मल्हार फक्त पास होणारा. मल्हार मध्ये नक्की काय बघतेस ग असं जेव्हा तिच्या मैत्रिणी तिला चिडवायच्या  तेव्हा ती एकच उत्तर द्यायची की ते तुम्हाला नाही कळणार माझ्या नजरेने बघावे लागेल. दहावीत असताना तर जवळपास सगळ्यांनी ठरवूनच टाकलं की यांची जोडी बहुदा  जमलेली चाहे फक्त आता रीतसर लग्नपत्रिका येण्याची वाट बघायची. मैत्री इतकी घट्ट आणि सारखाच एकमेकांच्या सहवासाने  घरच्यांनीही  जवळपास ते ठरवून टाकलं होतं पण दोघेही या बाबतीत  मात्र खूप समंजस  होते.  पुढे जाऊन आपल्या दोघांनाही जर कोणी वेगळ आवडलं आणि आपण त्या वेगळ्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर एकमेकांना सांगायचं आणि ते एकमेकांनी स्वीकारायचं याप्रमाणे त्यांचा संवाद घडत होता.  परंतु मनात दोघांनाही माहीती होतं की हे दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहेत कसं माहिती होतं ते देवालाच ठाऊक.

 

 मल्हारच अभ्यासात फार लक्ष नसायचं कसं बसं त्याने डिप्लोमाला ऍडमीशन घेतलं पण मेघनाला प्रॉपर अकरावी-बारावी करून इंजिनिअरिंग करण्याची इच्छा होती त्यानुसार तिचा प्रवास सुरु होता आणि मल्हारचा एका बाजूला. मल्हार प्रॅक्टिकल मध्ये जास्त इंटरेस्ट घेणारा त्यामुळे त्याला कॉलेजमध्ये बसणे लिहून काढणं परीक्षा देणे हे खूप कंटाळवाणं वाटायचं त्यापेक्षा एखाद्या लाईव्ह प्रोजेक्टवर काम करून त्यांतुन  ज्ञान घेण्यावर त्याचा भर जास्त असायचा. म्हणजे इथेही मेघना आणि मल्हार विचारांच्या बाबतीत एकदम विरुद्ध होते तरीदेखील त्यांची मैत्री ही कॉलेजच्या शेवटच्या दिवसापर्यंत टिकली.  दोघे एका कॉलेजमध्ये नसतानादेखील. दोघांचेही शिक्षण पूर्ण झालं मल्हार ने तर शिक्षण सुरू असतानाच एका छोट्याशा कंपनीमध्ये नोकरी पकडली होती जेणेकरून त्याला शिकायला मिळेल.  त्याला खूप वेळ वाया घालवायचा नव्हता आणि त्याला स्वतःला स्वतःचा उद्योग सुरू करायचा होता.  मेघना मात्र आपलं अकरावी-बारावी यानंतर इंजीनियरिंग आणि नंतर पद्युत्तर शिक्षण  हे सगळं करत बसली.  तोपर्यंत वयाची पंचविशी येऊन ठेपलेली. आता  भेटण  कमी होत होत  पण तरीही फोन इमेल एसएमएस आणि कधी तरी प्रत्यक्षात भेटण हे होतं होतं.  खरं बघायला गेलं तर हा त्यांचा कसोटीचा काळ होता एकमेकांना जास्त न भेटताही जर एकमेकांविषयीचा प्रेम कायम राहणार असतं तर आपण लग्नाचा विचार करायचा आणि ते लवकर उरकून टाकायचं असं दोघांचा ठरलेला होत.  संपूर्ण शिक्षण झाल्यानंतर मेघना घरी आली तेव्हा यथावकाश ती दोघे  भेटली आणि दोघे एकमेकांशी बोलले.  इतक भरभरून बोलले आणि त्यांच्या लक्षात आलं की शाळेच्या दिवसापासूनच जे घट्ट प्रेम आणि मैत्री होती ती आजही तशीच आहे त्यात कुठेही तसूभरही कमतरता नाही उलट वाढीस लागलेल आहे.  त्यामुळे दोघांनाही दिलासा मिळाला आणि शेवटी घरच्यांना सांगून त्यांचे लग्न थाटामाटात पार पडल.  शाळेच्या दिवसांपासून त्यांच्या लग्नपत्रिकेची वाट बघणारे सगळे शाळेतले मित्र-मैत्रिणी झाडून या लग्नाला उपस्थित होते. 

संसार सुखाने सुरू झाला मेघना तशी दिसायला चारचौघींसारखी पण नाकी डोळी तरळ असून आकर्षक मात्र खूप होती . त्यामुळे मल्हारच्या घरच्यांनी इतकी छान शिकलेली सून बाई मिळाली याचा सगळीकडे खूप गाजावाजा केला. लग्नानंतरच्या समारंभामध्ये मल्हार कडच्या एका पाहुण्या स्त्रीने खोचकपणे मेघनाला विचारलं इतकी तू शिकलेली आणि या घरात कशी काय पडलीस? पण तिने दुर्लक्ष केलं कारण ती स्त्री अनोळखी होती आणि सुरुवातीलाच कुणाबद्दल गैरसमज करून घेणे योग्य नाही या मताची ती होती.  आपण स्वतः अनुभव घ्यावा आणि मगच मत बनवावं हे तिचे विचार असायचे.


 हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागलं की मल्हार जरी आपला लहानपणापासूनचा मित्र असला आणि आपल्या दोघांचे स्वभाव एकमेकांना न बोलताही कळत असले तरीदेखील लग्न झाल्यानंतर आजूबाजूची परिस्थिती आपल्याला सांभाळून घ्यावी  लागते. मल्हार ने त्याच्या उद्योगाची  जागा राहता शहरापासून जवळच एका ठिकाणी घेतली होती त्यामुळे त्याचं ट्रॅव्हलिंग फार कमी असायचं.  पण मेघना एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होते आणि तिला दररोज मुंबईत जावे लागायचे रोज जवळपास सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास अगदी पिक हवर ला ट्रॅव्हलिंग असायचं.  या सगळ्यात ती इतकी  थकून जायची की घरी आल्यानंतर कधी बॅग  टाकते आणि झोपी जाते अस तिला व्हायचं. मल्हार मुळातच खूप उत्साही माणूस होता त्यामुळे कितीही काम बाहेर पडलं आणि किती वेळा गाडी ने इकडे तिकडे चकरा माराव्या लागल्या तरी देखील त्याची एनर्जी टिकत असे.  आणि तशीही पुरुषांचा शारीरिक बळ हे स्त्री पेक्षा नक्कीच उजव असतं निसर्गानेच ते दिलेल आहे.  पण मेघना मात्र प्रचंड तर टाकायची.  लग्नाआधी स्वयंपाक घरात कधी घुसण्याचा काम पडलं नाही.  पण आता मात्र दर शनिवार रविवार तिचा बराचसा वेळ स्वयंपाक घरात जाऊ लागला.  हळूहळू सासुबाई मधली  खरी सासू जागी होत होती  हे तिला छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून जाणवत होतं. ज्यांना लहानपणापासूनच ओळखत होती, आत्या म्हणून प्रेमाने हाक मारत होती त्यांचं आपलं लग्नाआधीच कौतुक करणं आणि लग्नानंतर आपल्याला सूनबाईच्या रूपात बघणं यामध्ये फरक असतो हे आता समजू लागलं होतं.  त्यातच त्या फार शिकलेल्या नव्हत्या.  कधी नोकरी निमित्त प्रवास केला नव्हता.  आपलं घर आपली मुलं आपला नवरा आपला संसार येणारे सण समारंभ लग्न अटेंड करणे इत्यादी गोष्टीत त्यांचा संपूर्ण वेळ जायचा.  स्वभाव त्यांचा खूप चांगला होता परंतु नोकरी करणारी स्त्री घरी आल्यानंतर किती थकलेल्या अवस्थेत येते आणि तिची काय अपेक्षा असू शकते किंवा तिला आरामाची खरच गरज आहे हे काही त्यांना उमजायचं नाही.  कळतं पण वळत नाही अशी काहीतरी अवस्था होत असावी  कदाचित.  मेघना तशी खूप समजदार मुलगी होती त्यामुळे कधीही शब्दाने दुखावलं नाही पण तिची आताशा दमछाक व्हायला लागलेलि.  त्यातच लग्न होऊन काही दिवस नाही झाले तर पुढचा विचार करा हे टोमण तिच्या मागे लागलेलं.  मुळातच एका मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर होती आणि तिच्या हातातला प्रोजेक्ट हा खूप महत्त्वाचा होता तिच्यासाठी तिच्या करिअरसाठी ह्या गोष्टी ती  कुणाशी बोलून दाखवू शकत नव्हती.  मल्हार तिचा मित्र असला तरी आता तो तिचा नवरा झाला होता आणि त्याच्या शी हे सगळे बोलणे म्हणजे त्याला खरंतर सँडविच सारखं बनवणे असं तिला नेहमी वाटायचं.  कारण इकडे आई तिकडे बायको कसे ऐकणार कसं समजणार कुणाला बोलणार कुणाला समजून घेणार ह्या पेचात त्याला पाडण्यापेक्षा न  बोललेलेच बरे, अस ती  नेहमी विचार करायची आणि बोलण टाळायची. अशातच एकदा असा प्रसंग झाला की ती खूप दमून आली होती आणि पाहुणे घरात आलेले होते आणि त्यांच्या समोर आल्यानंतरच सासूबाईंनी सरळ सरळ टोमणा हाणला. पाहुण्यांनी विचारल्यावर मुंबईत जाते असं कळलं तेव्हा त्या म्हणाल्या मुंबईला जाऊन काही फार थकायला होत नाही हो. आमच्या सुनबाई खूप उत्साही आहे आणि बघा आता छानशी पोहे आणि चहा तीच करून आणेल. मेघनाच अवसानच गळालं. आज सकाळपासून तिच्या ऑफिसमध्येच तीन मीटिंग झाल्या होत्या आणि संध्याकाळी एक क्लायंट मीटिंग करून ती भरपूर प्रवास करून घरी पोहोचली होती. तरीदेखील चारचौघांसमोर उगाचच त्यांचा शब्द पडू नये म्हणून तिने सगळ पटकन आवरून उसने अवसान आणून पाहुण्यांची सरबराई केली.  त्यानंतर 'आहेच आता किचनमध्ये तर स्वयंपाकही करून घे' असे सासुबाईंचे म्हणणे कानावर  पडल्यानंतर तेही  जेवणाची इच्छाच मरून गेली तिची.  तशीच काही न खाता झोपी गेली. मल्हार ला कळलेच नाही काय झालं कारण स्त्री च्या भूमिकेत जाऊन पुरुष खरंच काही समजू शकत नाही.  तिला मात्र खूप त्रास व्हायला लागला. काय करावे सुचेना. हा तर एकच प्रसंग झाला पण मल्हारच्या घरी पाहुण्या -राहुण्यांची  कायमच वर्दळ असायची. कधीही उठ सुठ निघून यायचे घर काही फार मोठं नव्हतं त्यामुळे खूप गर्दी व्हायची.  मेघनाला मात्र थोडसं एकांतवास फार आवडायचा. सासरेबुवांचा फार काही स्वभाव आग्रही नसला तरीदेखील प्रत्येक सणावाराला आणि पाहुणे येताना प्रेझेंटेबल मोडमध्ये राहायला हवं हा त्यांचा खाक्या असायचा.

हे सगळं सांभाळता सांभाळता मेघनाची खूपच दमछाक व्हायला लागली.  ऑफिसमध्येही डोकं ठिकाणावर ठेवून निर्णय घेणे हे फार महत्त्वाचं होतं.  त्यात घरच्या ह्या सगळ्या आघाड्यांवर लढणे आणि ह्या सगळ्या धबडग्यात मेघना आणि मल्हारला एकमेकांसाठी निवांत क्षण मिळतच नव्हते. तरीही त्यात सगळ्या बाजूने तडजोड करून यांचा गाडा पुढे चालला होता. हळूच त्यांच्या आयुष्यात एका नवीन पाहुण्यांचे आगमन होण्याची चाहूल लागली आणि सगळेच आनंदले. मेघनाला ही आई व्हायचे होते पण थोडं थांबून कारण ते हातात खूप मोठं महत्त्वाचं काम सुरू होत आणि ते पूर्ण करून मग या गोष्टी कडे वळूया असा तिचा विचार होता.  पण तिनेही ईश्वराची ही भेट आनंदाने स्वीकारली.  यथावकाश त्यांच्या घरात पहिला मुलगा जन्माला आला. नाव ठेवले मयांक. नोकरीतून मेघनाने दोन वर्षांची निवृत्ती  घेतली आणि नव-मातेने  अगदी बाळाच्या जन्मापासून ते किमान दीड-दोन वर्षांचा होईपर्यंत तरी त्याच्या सोबत संपूर्ण वेळ घालवावा करिअर हे मागूनही करता येतं या विचारांची ती होती. मल्हारचाही  उद्योग धंदा व्यवस्थित चालू असल्याकारणाने आणि मेघनाला ही या निमित्ताने थोडा आराम मिळेल असा विचार करून आनंदाने मेघनाला पाठिंबा दिला. बाळाचं संगोपन इतर गोष्टी यातच मेघनाचा  संपूर्ण वेळ जाऊ लागला.  पण म्हणतात ना अतिपरिचयात अवज्ञा! अगदी तसंच काहीसं सासू आणि सून घरात एकत्र जास्त वेळ राहू लागल्यावर सुरू झालं.  विचारांची बैठक दोघांची  जुळत नसल्याकारणाने अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ही मेघनाने कितीही समजून घेतलं तरी सासुबाई मात्र खूप गैरसमज करून घेत. आता घरीच आहेस ना ऑफिसचा काम नाही पैसे कमवत नाहीस तर सगळं काही तूच बघ मला आपला आता आराम करू दे, असा काहीसा त्यांचा विचार होता आणि हळू तरी तो अमलात आणायला सुरुवात केली. प्रेमाने दोघी मिळून करणे आणि घरात आनंदी वातावरण ठेवणे हे काही केल्या मेघनाला साधत नव्हतं आणि एके दिवशी तिच्या सहनशक्तीचा अंत झाला अगदी शुल्लक कारणावरून सासूबाईंनी जो काही गोंधळ घातला तो अगदी मल्हार घरी येईपर्यंत आणि सासरे बुवा बाहेरून घरात येईपर्यंत चालू होता. मेघना काहीच बोलत नव्हती फक्त रडत होती आणि मनातल्या मनात विचार सुरू होता की इतकी शिकलेली मी आणि दुनियाभर प्रवास केलेली बाहेर, करिअर इतक स्ट्रॉंग आणि ह्या अश्या शुल्लक कारणासाठी मला चार शब्द ऐकून घ्यावे लागत आहेत.  आणि घरातील संपूर्ण वातावरण गढूळ होत चालल आहे. मल्हार कितीही चांगला मित्र असला तरी देखील त्याला काही ठोस निर्णय घेता येईना किंवा कुणाचीच बाजू घेता येईना.  त्याच्याबद्दल तिने तिथेच अपेक्षा सोडून दिली होती कारण मधल्या मध्ये त्याचा खोळंबा होईल हे ती  जाणून होती.  आईवर जितक प्रेम तितकच बायकोवर ही!  कुणाला बोलू आणि काय करू अशी त्याची अवस्था करण्यापेक्षा आपणच काहीतरी निर्णय घेतलेला बरा,  असे ठरवून तिने थोडीशी शांतता पसरल्यानंतर सासरेबुवासमोर आपला प्रस्ताव मांडला. मल्हार आधीच खूप हिरमुसला  झाला होता आणि त्याला काहीच सुचेना.  सासुबाई काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.  ऐकणारे फक्त सासरेबुवा कारण ते कसेही असले तरी उदारमतवादी होते आणि सुनेची बाजू थोड्याफार प्रमाणात तरी समजून घेऊ शकतील अशी मेघनाला खात्री होती.

मेघना बोलू लागली. 

गेली पाच वर्षे मी सगळं काही बघत आली.  माझ्या परीने सगळं सांभाळत आली परंतु नोकरी आणि घर या दोन्ही गोष्टी लीलया सांभाळणाऱ्या स्त्रीची किती दमछाक होत असेल, तिही  मनाने आणि शरीरानेही किती थकत असेल याचा विचार कोणीही करू शकत नाही कुणी समजूही शकत नाही आणि कुणी तो समजून घ्यावा अशी अपेक्षा नाही.  परंतु एक घर हे सगळ्या सदस्यांचे मिळून बनलेल आहे त्यामुळे सर्वांनीच घरची कामं  आणि घरात खेळत वातावरण राखण्यास मदत करावी ही खूपच रास्त अपेक्षा आहे. साध्या बोलण्यातही गैरसमज होत असेल आणि शब्दागणिक माझ्या शिक्षणाचा उद्धार होत असेल तर त्याला मी काय करू? उत्तर दिल्यानंतर उद्धटपणा वाटून सासूबाईंना त्यांचा अपमान केल्याचा नेहमी भास होतो त्याला मी काय करू? अगदी गावंढळ आणि बुरसटलेली विचारही सतत त्या माझ्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करतात त्याला मी कधीच थारा देत नाही तर त्यांना राग येतो त्याला मी काय करू?  उद्या उठून या सगळ्या गोष्टींचा येणाऱ्या पिढीवर म्हणजेच आमच्या मुलांवर काय परिणाम होईल? त्यांनी अभ्यासात आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यायचं चांगल्या गोष्टी शिकायच्या की सतत आपली अशी ही भांडणं आणि तमाशे बघत राहायचे? हे मला पटत नाहीये. कुठेतरी माझा खूप खूप कोंडमारा होतोय आणि मला मोकळी वाट हवी आहे. याचा अर्थ असा होत नाही की मी मल्हार पासून पूर्णपणे स्वतःला तोडण्याचा प्रयत्न करते . नाही.  मी मल्हार शिवाय जगू शकणार नाही आणि सासरे बुवा तुम्ही आणि सासुबाई या दोघांबद्दलही माझ्या मनात प्रेम आणि आदर आहेच पण म्हणतात ना प्रेम टिकवायचं असेल तर थोडे लांब राहणं फार गरजेचं असतं आणि ती वेळ आता येऊन ठेपली आहे.  माझ्या सहनशक्तीचा अंत झालेला आहे आणि मी असेच पुढे चालू शकत नाही. यावर मी असा निर्णय घेतला आहे की माझ्या आई बाबांजवळ मी काही दिवस राहील आणि तिथेच एक घर घेईन. जे मी  आणि मल्हार मिळून  घेऊ. तिथे मी आणि मयंक राहतील आणि येणार दुसरे पिल्लू ही राहील. नातवंडांना तुमच भेटणं हे माझ्या कडून  कधीही रोखल जाणार नाही याची खात्री.  तसंच मल्हार लाही आई-वडिलांपासून दूर गेला किंवा बायकोपासून नही दूर गेला अशी अवस्था होणार नाही.  दोन्ही घर आपलीच आहेत पण आपण थोडं तरी लांब राहूया.  एकमेकांना आपापली जागा देऊया विचार करण्यास थोडासा वेळ देऊया आणि आपलं प्रेम आहे ते निदान तेवढ टिकून राहण्यासाठी हा निर्णय योग्य आहे असं मला वाटतं.  हा खूप विचारअंती तुमच्यासमोर  मांडलेला आहे आणि यावर मी ठाम आहे.  आता माझा निर्णय बदलणार नाही.

मल्हार हे सगळं ऐकून अवाक झाला.  मेघना असा काही निर्णय घेईल हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं.  सासूबाईंचा राग दुसऱ्या पिल्लूच्या उल्लेखबरोबर तो थोडासा निवळला.  पण सासरेबुवा मात्र तटस्थ होते त्यांनी खूप शांतपणे मेघनाचा संपूर्ण ऐकून घेतलं आणि तिच्या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शवला.  त्यानंतर या निर्णयावर बऱ्याच वेळा घरात चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु मेघना तिच्या निर्णयापासून ढळली नाही. लवकरच तिने आपला निर्णय आई वडिलांना कळवला आणि मयांक ला घेऊन ती निघून गेली. तिकडे मल्हारला त्याच्या  बाबांनी  सावरून धरलं आणि सांगितलं की खूप समजूतदारपणे तुझ्या बायकोने हा निर्णय घेतलेला आहे.  तिच्या निर्णयाचा तटस्थपणे विचार करा आणि त्यानुसार वागा.  तु आमच्या पासूनही दूर जाणार नाहीस.  तुला जी भीती वाटते की लोक काय म्हणतील ते घडणार नाही आणि तुम्ही सगळे आनंदात राहाल. मेघना इथून फार लांब राहत नाही ही दोन्ही शहरं अगदी जवळ जवळ आहेत . आपण सगळे पुन्हा आनंदाने राहू शकतो मात्र तिला आता इकडे बोलवू  नकोस.  तिला तिची जागा दे. दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकत्र कधीच राहू शकत नाही आणि त्यात जर त्या दोन स्त्रिया असल्या त्यातली एक शिकलेली दुसरी न शिकलेली एक कमावती दुसरी फक्त घरी बसणारी आणि एक तरुण आणि दुसरी वार्धक्याकडे झुकणारी.  या सगळ्या कॉम्बिनेशनचा  खूप बारकाईने विचार करून बघ आणि मग मल्हारला ते पटलं. 


 सुरुवातीला लोकांनी आणि नातेवाईकांनी खूप खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला परंतु मेघना आणि मल्हारचे विचार ठाम होते व कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडायची नाही या विचारांवर ते  अडिग  असल्याकारणाने पुढे काही फार झाले नाही आणि आपोआप सगळ्यांची तोंडं बंद झाली. यथावकाश षडानन चे ही  आगमन त्यांच्या आयुष्यात झाले. आता करिअर मधून गॅप  घेऊन मेघनाला जवळपास चार- पाच वर्षे झाली होती. कुठेतरी तिला त्या गोष्टीची सतत आठवण व्हायची परंतु मोठ्या लेकाला दोन वर्ष आणि लहान लेकराला दोन वर्ष असा तिने चार-पाच वर्षांचा गॅप  घेण्याचा विचार फार आधीपासून करून ठेवला होता आणि त्यानुसार ती वागत होती. आता घरामध्ये सतत चांगल्या गोष्टी,  विज्ञानाच्या गोष्टी,  आजूबाजूला घडणाऱ्या नवनवीन आणि सकारात्मक गोष्टी ह्यांची चर्चा व्हायची. मेघना स्वतः वाचक वेडी  असल्यामुळे खूप चांगली पुस्तकं तीही वाचायची आणि तीच  सवय हळूहळू दोन्ही मुलांना लागत गेली. मल्हार चा उद्योग आता बर्‍यापैकी स्थिरस्थावर झाला होता आणि आपली प्रिय मैत्रीण मेघना हिला करिअर मध्ये खूप गॅप पडलाय  हे त्याच्याही लक्षात होते आणि त्यांनी हळूच विषय काढला की मेघना तुझ्या निर्णयाला माझा नेहमीच पाठिंबा असतो.  माझं प्रेम तुझ्यावर खूप मनापासून आहे पण त्याहीपेक्षा जास्त एक माणूस म्हणून मी जेव्हा तुझ्याकडे बघतो तेव्हा तुझी हुशारी तुझी बुद्धिमत्ता तुझं शौर्य हे सगळं घरातच आहे आता त्याला कुठेतरी बाहेर पडुदे.  आणि तो पुन्हा करिअरला सुरुवात कर.  मुले आपले मोठी झाली आहेत आणि मीही आता कामे लावून देऊन मुलांकडे लक्ष देऊ शकतो.  मेघना म्हणाली अरे नोकरी खूप वर्ष केली आणि पैसाही छान कमावाला. आता ती इच्छा राहिली नाहीये.  आता असं वाटतं की काहीतरी समाजासाठी करावं. ज्या विषयात माझं शिक्षण झालेला आहे ते शिक्षण होतकरू आणि गरीब मुलांना उपयोगी पाडाव यासाठी  ज्ञानयज्ञ  हे व्रत मी हाती घेण्याचे ठरवले आहे. तुला काय वाटतं? 

 मल्हार ने लगेचच तिला शाबासकी दिली आणि त्यानुसार तिच्या विचारांची घौड  दौड सुरु झाली. लवकरच तिने ज्ञानसंपदा ह्या नावाने स्वतःच  शिक्षणालय  सुरू केलं. अडचणी होत्या पण त्यावर मात करत मार्ग काढत पुढे चालत राहिले. तिच्या या संस्थेचा मुख्य उद्देश असा होता की अतिशय गरीब परिस्थितीत बुद्धीने चाणाक्ष असणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांचं पैशांअभावी शिक्षण अडू नये आणि त्यांनी शिक्षणात प्रगती करून उच्च स्थानी पोहोचल पाहिजे आणि त्यानंतर त्यांनीही समाजासाठी काहीतरी करावं.   यासाठी संपूर्ण आर्थिक मदत करणे व तो मुलगा किंवा मुलगी स्वबळावर पैसे कमवू लागेपर्यंत त्याला पाठिंबा देणे असं तिच्या संस्थेचं उद्दिष्ट होतं. अशी मुलं शोधणे हेही एक महाकठीण काम होतं.  कारण अशा योजनांचा गैरफायदा घेणारे ही लोक बरेच असतात म्हणून तिने स्वतः जातीने खेडोपाड्यात जाऊन  सर्वेक्षण करून त्या मुलांची एक प्राथमिक चाचणी घेऊन त्यांना निवडलं व एकेक करून त्यांना आपल्या सोबत या संस्थेमध्ये घेऊन आली. सुरुवातीला त्या मुलांचा खाण्यापिण्यावर आणि शिक्षण या सगळ्या गोष्टींकडे तिला बघावं लागायचं मग हळूहळू तिच्या या कार्यात बरेच जण सामील होत गेले आता सर्वेक्षणात तिची सर्वेक्षण करणारी एक स्वतंत्र टीम होती आणि संस्थेसाठी शहरापासून जरा लांब मोकळ्या जागेत जागा घेऊन तिने इमारतही बांधून काढली होती.  आता त्यामध्ये मुला-मुलींचं ती  निवासी शाळा इमारत झाली होती. आपल्या दोन्ही मुलांना ही गरीब मुलं कशा परिस्थितीतून मार्ग काढत इथपर्यंत येऊन पोहोचली आहे हे समजावं म्हणून ती मयांक आणि षडानन लाही  जमेल तेव्हा आपल्या सोबत घेऊन जायची.  त्यांना खऱ्या परिस्थितीची जाणीव व्हावी जग कळावं हा तीचा उद्देश होता.  त्यातून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकासही होणार होता याची तिला खात्री होती. त्या मुलांच्या मनात निरागसपणा करुणा आणि शौर्य या गुणांचा विकास व्हावा याकडे तिचा  कटाक्ष असायचा.  आपली मुलगा काय  आणि आपल्या ज्ञानसंपदा शिक्षणालयात शिकणारी मुले काय, सगळ्यांना एकाच नजरेने बघायची. मेघना सारख्या तल्लख बुद्धीचा आईच्या पोटी आलेली मयांक आणि  षडानन दोघेही बुद्धीने तल्लख  होतेच परंतु स्वभावनेही धाडसी होते आणि या ज्ञानसंपदा च्या कार्यामध्ये आईसोबत तेही वावरल्यामुळे त्यांचा खूप चांगला सर्वांगीण विकास झाला होता. यथावकाश मयांक ने आपल्या आवडीची शाखा निवडली आणि ज्ञानसंपदा तील मुले मुली ही चांगली शिकुन  कुणी इंजिनिअर कुणी आर्किटेक्ट तर कोणी हाडाचा शिक्षक तयार झाले होते. आता मोठी होऊन पैसा कमवू  लागलेली हीच मुले दुसऱ्या नवीन येणाऱ्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी संस्थेमध्ये पैसे देऊ  लागली आणि आणि जमेल तसे या नवीन मुलांसाठीच्या प्रशिक्षणासाठी वेळही देऊ लागली. त्यामुळे एका मागे एक अशी नवनवीन भक्कम फळी तयार होत होती. यथावकाश मयांक परदेशी निघून गेला होता काही वर्षांसाठी, पण षडाननला मात्र आपल्या आईजवळच आपल्या भारतातच राहायचे होते. या संपूर्ण प्रवासात मल्हार आपला उद्योग-धंदा सांभाळून मेघना आणि तीच्या कार्याला पूर्ण पाठिंबा देत होता आणि मुलांना वडिलांच प्रेम ही आहे देत होता.


बघता बघता ज्ञानसंपदा चा पसारा खूप मोठा झाला होता आणि आता फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांतूनही काही गरीब मुलांचे पालक मुलांना घेऊन येत आणि तिथे आपल्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी मेघनाची भेट घेत. ज्ञानसंपदा च्या दुसऱ्या शाखा इतर काही राज्यातही मेघनाला सुरू कराव्या लागल्या . समाजाच्या विविध स्तरांमधून याला मदत तर मिळत होतीच परंतु सुरुवातीला स्वतःच्या कष्टाचं आणि पैशांच खतपाणी घालून ज्या मुलांना तिने शिक्षणाची संधी देऊन मोठं करून आपल्या पायावर उभं केलं होतं तीच मुलं आता हा भार संभाळायला सज्ज होती आणि तेही अगदी स्वखुशीने. 

 षडानन ला  आपल्या आईचा आणि वडिलांचा ही डोळ्यासमोर आदर्श होता आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द खूप मनात होती हे मेघनाने वेळीच ओळखलं होतं आणि त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठीच वातावरण निर्मिती तिने करून ठेवली होती.  त्याचाच परिपाक म्हणजे षडानन एक वैज्ञानिक होता आणि त्याने अतिशय युनिक असं संशोधन केलं होतं. 


 अल्बम चा शेवटचा फोटो तिने बघितला आणि बंद केला. मल्हार ची आठवण येत होती, कामानिमित्त तो परदेशी गेलेला होता. संपूर्ण जीवन प्रवास डोळ्यांसमोरून तरळून गेला होता. नुसतच तडजोड म्हणून सगळ्या ठिकाणी तडजोड करून स्वतःचा कोंडमारा कोणीही करून घेऊ नये आणि धाडसीपणे  आपले निर्णय घ्यावेत आणि त्यानुसार चालावे या ठाम मताची ती होती आणि आपल्या मतानुसार आज ज्या ठिकाणी ती पोहोचली होती त्याचा तिला अभिमान तर नाही पण समाधान मात्र जरूर होतं!!

Comments

  1. खुपदा आपण मनातलं बोलतच नाही त्यामुळे आपणच कुढत राहतो. वेळप्रसंगी हो किंवा नाही हे बोलता यायला हवं. छान आहे ही गोष्ट.👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....