पहिली दुर्गा - प्रतिभा

 *नवरात्र....नऊ दिवस.....नऊ कथा.....* 

                          *---- शुभदा जगताप*


आज नवरात्रीचा पहिला दिवस. घटस्थापना झाली आहे.  दुर्गेच्या नऊ रूपांपैकी पहिले रूप हे शैलपुत्री समजल्या जात.  शैल म्हणजे पाषाण.  तर पाषाणासारखं खंबीर, निडर आणि शांत व्यक्तिमत्व जिच आहे ती ही शैलपुत्री.  त्या रूपाशी  साधर्म्य असणारी  ही  स्त्री माझ्या आजच्या पहिल्या कथेची नायिका.... 


*पहिली दुर्गा -  प्रतिभा*

*(१७/१०/२०२०)*


त्या माळरानावर आता येऊन चांगली पाच वर्षे झाली होती.  उजाड आणि उनाड अशा त्या जमिनीच्या तुकड्याचं  एका चांगल्या हिरव्यागार प्रदेशात तिने रूपांतर केलं होतं.  बसली होती आज हात टेकून डोळे लावत लांबवर व क्षितिजाकडे बघत! छान संध्याकाळची वेळ वाऱ्याच्या गाण्यासोबत गुणगुणत त्याच्याशी संवाद साधत संध्याकाळचा थोडासा वेळ तरी त्या निसर्गाच्या सानिध्यात एकांतात घालवणं हा तिचा आता छंदच झाला होता. वय वर्ष काय तर नुकतीच साठ पूर्ण केली होती. साठीच्या मानाने केस मात्र सगळे पांढरे झाले होते.  खूप थकल्यासारखं  झालं  होत तिला.  तसं बघायला गेलं तर तिथीप्रमाणे आज  जन्मदिवस होता.  माळरानावर मोठ्या जिद्दीने बांधलेल्या त्या छोट्याशा घरात ती आणि तिचा जीवन साथी दोघेजण राहत होते.  नाही म्हणायला शहरात तिची स्वतःची दोन मोठी घरं आणि भरपूर प्रॉपर्टी होती. निसर्गाचे प्रेम आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द कायम तिच्या मनात लहानपणापासून असायची आणि ते  पूर्ण करायची जिद्द काही तिला स्वस्थ बसू देईना.  आपल्या सासर्‍यांची आणि त्यांच्या पूर्वजांची  जमीन इकडे आपल्या मूळ गावी आहे आणि तिथे आपण गेले पाहिजे हे तिला सतत वाटायचं; पण योग काही येत नव्हता.  तिच्या दुसऱ्या मुलीच्या लग्नानंतर हा योग असा काही जुळून आला आणि अशी काही नियतीची चक्र भराभर फिरत गेली की इथे आले काय तो शेताचा आणि जमिनीचा तुकडा मिळाला काय, सगळंच आश्यर्यचकित करणारं! जवळच एका छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर घर बांधल काय आणि आज गेली पाच वर्ष त्या पडीक जमिनीला उभारी देऊन तिला पुन्हा सुपीक करून तिच्यात पीक घेतो काय हा सगळा  प्रवासच अगम्य अद्भुत विलक्षण होता.  आज हे सगळं काय मनात चालू आहे माझ्या, इथे बसल्या बसल्या मला हे सगळं काय आठवतंय? मनाशीच ते बोलू लागली.  साठ वर्षाची  झाले म्हणून काय साठीला असताना सगळं सिंहावलोकन सुरू आहे की काय माझं असा विचार ती  मनात करत होती आणि झटकन ती भूतकाळात गेली.  भूतकाळात म्हणजे इतकी मागे की ती आठ दहा  वर्षांची असलेली तिला दिसली. 


विदर्भातल्या एका छोट्याशा खेडेगावात मोठा चौसोपी वाडा तिच्या आईवडिलांनी बांधलेला. तीन भावांमध्ये ती एकटी.  पारंपरिक घरचा व्यवसाय म्हणजे शेती. संपूर्ण गावात त्यांच्या इतके श्रीमंत कोणीच नव्हते.  घरगडी शेतातले गडी घरकाम करणाऱ्या स्त्रिया इत्यादी अनेक नोकरचाकर असताना देखील ह्या मुलीचं लक्ष मात्र कायम दोन पैसे कसे वाचवता येईल, चांगल्या चांगल्या गोष्टी कशा शिकता येतील आणि वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला कसं चांगलं ज्ञान ग्रहण करता येईल आणि कुठून घेता येईल याकडे तिचं लक्ष लागलेलं असायचं. घरच्याच गाई-म्हशी दूध दुभतं! श्रीमंती मनाची आणि पैशांचीही.  कशाला म्हणून कमतरता नव्हती.  पण हिचे व्यक्तिमत्व हे कायम हसतमुख, शांत, खंबीर नि निडर! वडिलांची  अत्यंत लाडकी  आणि आई-वडिलांवर जीवापाड प्रेम करणारी,  भावांना नेहमी सांभाळून घेणारी, मोठ्या भावाला वडिलांप्रमाणे मानणारी, अशी ही वयात आली तेव्हा फार सुंदर दिसायला लागली. आणि दहावीची परीक्षा झाल्यानंतर लगेचच तिला स्थळ चालून आलं.  ते ही असलं तर तिच्यापेक्षा अकरा वर्षे वयाने मोठ्या असलेल्या मुलाचं. पण तो पुरुषही श्रीरामाचा दुसरा अवतार हे मात्र तिच्या आजोबांच्या नजरेतून सुटलं नाही.  घरची परिस्थिती अत्यंत सामान्य परंतु सरकारी नोकर आहे महिन्याला काही पगार घेतो आणि आपल्या आई-वडिलांवर अत्यंत प्रेम करतो, अतिशय सरळ प्रामाणिक आणि आपल्या आईवडिलांवर अत्यंत श्रद्धा असणारा हा मुलगा आपल्या नातीसाठी आजोबांनी पसंत केला आणि त्यांच्या शब्दाबाहेर जायला तेव्हा तीही काही उद्धट नव्हती आणि तिच्या आईवडिलांनी ह्या गोष्टीला नकार दिला नाही. थोरामोठ्यानी हा मुलगा आपल्यासाठी पसंत केला म्हणजे नक्कीच योग्य असेल, असा विचार मनाशी करून ती बोहल्यावर चढायला तयार झाली.  यथावकाश लग्न झालं लग्न होऊन सरकारी नोकरीच्या बदल्या होतात त्याप्रमाणे अनेक गावे बदलत बदलत ती संसार करू लागली.  अकरा वर्ष मोठा माणूस म्हणजे पोटात धडकीच भरायची, ती घाबरायची पण तरीही  निभावून नेलं.  आपल्या घरची श्रीमंती आपल्या बोलण्यातून वागण्यातून कुठेही दिसू  नये यासाठी नेहमी  दक्ष  असायची. तरीदेखील नवरा अतिशय शिस्तप्रिय आणि स्वच्छता प्रिय असल्यामुळे कायमच घाबरायची. 

 दहावीचा  निकाल येण्याआधीच तिचं शुभमंगल झालं होतं.  दहावीचे मार्क बघून आणि तिची सगळ्या गोष्टीतली नवनवीन प्रकार जाणून घेण्याची उत्सुकता बघून तिच्या जीवनसाथीच्या लगेच लक्षात आलं की पुढे शिक्षण घेण्याची संधी  दिली तर नक्कीच स्वतःच्या मेहनतीने शिक्षण घेऊ शकेल.  यथावकाश तिला तीन मुले  झाली.  अतिशय गोंडस सुदृढ अशी बाळं जन्माला घातली.  त्यांच्या संगोपनात लग्नानंतरची आठ वर्ष कशी  निघून गेली ते  तिचं तिलाही कळलं नाही.  मग मात्र गावाकडचे  शांततेचे जीवन सोडून त्यांना सरकारी बदली मुळे मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी यावे लागले.  मुंबईत घर काही परवडणार नाही परंतु त्याच्या आजूबाजूच्या ठाणे जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी हे स्थिरस्थावर झाले आणि मग खरं सांगायचं झालं तर तिथून सुरू झाला तिचा हा अत्यंत खडतर प्रवास. आपल्या एकट्याच्या पगारात तीन मुले आणि आपण दोघं, हे काही भागणार नाही आणि भाड्याच्या घरात जास्त दिवस राहणे आपल्याला काही जमणार नाही हे जेव्हा त्या पती-पत्नीच्या लक्षात आले तेव्हा त्या दोघांनी मिळून एक निर्णय घेतला की तिचं पुढचं शिक्षण पूर्ण करण्याचा. आणि या निर्णयाला तिने दुजोरा दिला कारण शिकण्याची ऊर्मी इच्छा ही पूर्वीपासूनच होती आणि ती अतिशय मेहनती होती खंबीर होती निडर होती.  स्वभावाने खूप शांत होती.  कुठल्याही गोष्टीवर पटकन चिडणे किंवा आदळआपट करणे हे तिच्या स्वभावातच नव्हतं.  शांतपणे एखाद्या गोष्टीचा विचार करून ती कशी जास्तीत जास्त फायदेशीर होईल आणि त्यातून आपला विकास कसा साधता येईल या एकाच दिशेने तिचा विचार चालायचा.  आपल्या इतक्या शिस्तप्रिय आणि कडक  स्वभावाच्या  नवऱ्याने आपल्यासमोर पुढील शिक्षणाचा प्रस्ताव मांडला आणि जी काही मदत लागेल (घर कामात व  मुले सांभाळण्यासाठी करण्याची) याची  तयारी दर्शवली यातच तिला अर्धी लढाई जिंकल्यासारखे वाटलं.  आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला तो केवळ अद्भुतच! दुरुस्थ शिक्षण या पद्धतीने तिने अकरावी आणि बारावी पूर्ण केलं. त्यानंतर बीए ला ॲडमिशन घेतलं.  मराठी इतिहास हे तिचे  अत्यंत आवडते विषय.  मराठी विषयात बीए च  शिक्षण झाल्यानंतर मग छोट्या शाळेमध्ये नोकरी करून पुन्हा बीएड आणि एमए  हेही शिक्षण घेतलं. हे सगळं करताना घरातली सगळी कामं, तीन मुलांचा खाणं-पिणं आणि आपली स्वतःची तब्येत आणि त्यातूनही स्वतःचं घर करण्याचे स्वप्न हे  उराशी बाळगून तिने स्वतःचे शिक्षण चांगल्या मार्कांनी पास करून पूर्ण केलं.  पुढे जाताना दमछाक होत होती, खूप त्रास होत होता पण तिने जिद्द सोडली नाही.  घेतला वसा सांडला  नाही.  यथावकाश तिचे सगळे शिक्षण पूर्ण झाले.  एका साध्या शाळेत नोकरीही मिळाली,  परंतु सगळ्या ठिकाणी असतो जो भ्रष्टाचार तो तिला इथेही जाणवला.  मानसिक त्रास व्हायचा, कारण प्रामाणिकपणा आणि सचोटीने काम करणं या दोन तत्त्वांवर काम करणाऱ्या व्यक्तींना सगळीकडेच तोंड द्यावे लागत, तसं तिलाही द्यावं लागायचं आणि तिच्या जीवनसाथीला ही. पण तिने हार मानली नाही. 

आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळायला पाहिजे, मुलींच्या लग्नामध्ये कुणासमोर हात पसरण्याची वेळ आली नाही पाहिजे आणि आपलं स्वतःचं घर होऊन पुढे जास्तीत जास्त आपण प्रगती करू शकलो पाहिजे या एकाच विचाराने या एकाच ध्येयाने ती प्रेरित होती. कायम आपली मुले, आपले घर, आपला पती, आपला संसार, आपली स्वतःची प्रगती ह्या एकाच ती तिचं जीवन गुंतलेल असायच.  कधी मित्र-मैत्रिणी नाही,  चकाट्या पिटायला कुणाकडे जायचं नाही की फालतू वस्तू खरेदी नाही.  हा कुठला विचार तिच्या मनाला शिवायचाच नाही. सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे तिचे विचार नव्हते.  तिला साडी खरेदी करणे किंवा उगाच दागिन्यांमध्ये पैसा घालवणे या गोष्टींमध्ये कधीच स्वारस्य नव्हतं. पण त्यापेक्षा संपूर्ण जग फिरून बघू,  एखादी जागा घेऊ, शेतीसाठी काहीतरी करू, एखादा उद्योग धंदा करू,असेच विचार तिच्या  मनात कायम.  यायचे धाडसी निर्णय घ्यायला ती कधीच मागेपुढे बघायची नाही.


एक घर घ्यायचं ज्याची किंमत तेव्हा केवळ सव्वा लाख रुपये होती, तर कुणीही मदत केली नाही.  अशा वेळी लंकेची पार्वती होऊन तिने ते घर जिद्दीने घेतलं आणि साध्या कोचिंग क्लासेस मध्ये पंधरा रुपये/ वीस रुपये प्रति तास इतक्या कमी मानधनावर सुद्धा काम करून तिने आपल्या पतीला साथ दिली आणि मालकीच्या घरासाठी  घेतलेल्या कर्जातून ती मुक्त झाली. आता खरं बघायला झालं तर तिचे उत्कर्षाचे  दिवस आले होते.  हा सगळा प्रवास होता या प्रवासामध्ये तिच्या माहेरची श्रीमंती तिने कधीही आपल्या सासरच्या लोकांसमोर किंवा  आपल्या नवऱ्या समोर सुद्धा येऊ दिली नाही आणि तितक्याच हुशारीने 'झाकली मुठ सव्वालाखाची' या उक्तीवर लढणारी ती कधीही तिने तिच्या अडचणी आपले आई-वडील किंवा भाऊ यांच्यासमोर मांडले नाही.  कायम चांगलेच करणार आणि करून दाखवणार असेच सकारात्मक शब्द तिच्या तोंडात असायचे. 


यथावकाश मुले मोठी झाली.  मोठ्या मुलीच्या लग्नाची वेळ आली आणि त्याच वेळी तिच्यासाठी बनवून ठेवलेलं सगळं सोन चोरीला गेलं.  तरीही ती डगमगली नाही.  तितक्यात जिद्दीने पुन्हा पैसे जमा करून होती नव्हती त्या सगळ्या बचतीमधून  लग्न थाटामाटात पार पडलं.  त्यात सोबत दुसऱ्या मुलीचं उच्च शिक्षण सुरू होतं, त्यासाठी ही तिने खूप पाठिंबा दिला आणि उच्च शिक्षणासाठी आपल्या राज्याबाहेर जाण्यासाठीच्या तिच्या निर्णयाला तिने दुजोरा  देऊन आपल्या पतीला समजावले.  मुलगाही मोठा होता. वाईट संगतीमुळे त्याच्यावर होणारे परिणाम हळूहळू तिच्या लक्षात येत होते आणि लवकरात लवकर या वस्तीतून निघून चांगल्या वस्तीत राहायला जाण्याचा निर्णय तिने घेतला.  हा निर्णय घेतानाही खूपदा भांडणं झाली पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती.  नेहमी माणसाची प्रगती होत राहिली पाहिजे आणि चांगल्या गोष्टींचा विचार करून त्या कडे जाण्यासाठी धडपड आपण ही केलीच पाहिजे,  या मताची ती होती आणि  तिचा जीवनसाथी मात्र आहे त्याच्यामध्ये समाधान मानून शांततेत जीवन जगणाऱ्या विचारांचा होता.  यामुळे खटके कायमच उडायचे परंतु तिचे निर्णय हे नेहमीच योग्य ठरत आले होते.  याही वेळेस मुलीने तिला साथ दिली आणि वडिलांना समजावून नवीन घर घेण्यासाठीची धडपड होती त्यासाठी आईला पाठिंबा दिला.  त्याचे योग्य परिणाम जे व्हायचे तेच झाले आणि तिचं सगळ्यांनीच अभिनंदन व कौतुक केलं. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात काय करायचं, काय नाही करायचं, हे कसं वाईट, हा माणूस योग्य नाही किंवा आपण हे करू शकतो ह्या सगळ्या निर्णयांवर ठाम राहून प्रत्येक वेळी आपल्या  पतीला साथ, पाठिंबा देणारी ही एक अतिशय खंबीर आणि निडर स्त्री होती. 


आपल्या पतीच्या वाडवडिलांची जमीन आहे आणि ती जमीन आता दुसरेच कोणीतरी वापरत आहेत हे तिला माहिती होते परंतु त्याबद्दल काही योग येत नव्हता. योगायोगाने जे सगळं घडलं त्यामध्ये तिने पुन्हा मनाचा हिय्या केला आणि आपल्या पतीच्या पूर्वजांची जमीन परत मिळवून ती आपल्याच घरात कशी राहील या बाबतीत तिचे प्रयत्न सुरू झाले.  आणि ती जमीन नुसतीच घ्यायची नाही तर कसायची आणि सेंद्रिय शेती करून त्यात पिकणारं अन्न - धान्य  आपण खायचं हे ठरवलं. त्यातून मिळणारं समाधान अतिशय लाख मोलाचं होतं, पण कोणी समजू शकत नव्हतं.  तरीही अतिशय खंबीरपणे निर्णय घेतला आणि तो अमलात आणला.  


आज पूर्वजांच्या त्या जमिनीवर बांधलेल्या घराच्या ओट्यावर बसून संध्याकाळच्या वाऱ्यासोबत ती हा संवाद साधत होती आणि  ऐकायला कोण? आपले पती देव तिकडे गप्पा मारण्यात दंग.  आपल्यापेक्षा अकरा वर्ष मोठा माणूस पण अजूनही आपली काळजी घेतो,  त्याबद्दल मी तुझी अत्यंत ऋणी आहे परमेश्वरा,  या विचारातच ती गर्क होती आणि तेवढ्यात पती महाशयांनी आवाज दिला - अगं पाच वाजलेत चहा करतेस ना? आणि ती  खाडकन तिच्या विचार तंद्रीतून जागी  झाली.  'अरे देवा मला तर वाटत होतं की माझा हा प्रवास संपवून मी येते की काय तुझ्याकडे आणि बरं झालं पती महाराजांनी आवाज देऊन मला माझ्या वास्तवाची जाणीव करून दिली, अजून माझ्या बऱ्याच जबाबदाऱ्या बाकी आहेत नाही का?  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता संध्याकाळचा त्यांना चहा करून द्यायला हवा. चला आपल्या कामाला लागा आणि उद्या आपण अजून काही वेगळे करू शकतो त्याविषयी विचार करा', *असे म्हणत ती पुन्हा आपल्या उत्तर- आयुष्याच्या संसारात रममाण झाली!!!

Comments

  1. खूप सुंदर व सहज लिखाण 👌🏼

    ReplyDelete
  2. खूपच छान लिहिलं आहे शुभदा तुम्ही...

    ReplyDelete
  3. धन्यवाद आपल्या अभिप्रायांबद्दल 😊

    ReplyDelete
  4. फार सुरेख लिहिता तुम्ही...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडक्यात ..... थोडस काहीतरी .... ८. असामान्यातली सामान्य

आपल्यातल्या चारचौघी आणि अनुत्तरीत प्रश्न.....